गणपतीविषयक माहितीचा खजिना
ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रख्यात लेखक व व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे 'बाप्पा मोरया' हे गणपतीवरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रस्तुत पुस्तकात गणपतीबद्दलची शक्यतो सर्व माहिती साध्या, सोप्या व रंजक भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी मुद्दामच सर्वसाधारण लोकांना माहिती नसलेली स्तोत्रे व कवने दिली आहेत. अगदी छ. संभाजीराजांचे खड्या हिंदीतील कवन आणि स्वा. सावरकरांचे गणेशावरील काव्य यांचा समावेश आहे. आबालवृद्धांसाठी अर्थासहित 'अथर्वशीर्ष' दिले आहे. आद्य शंकराचार्यांची श्रीगणेश पञ्चरत्नं आणि गणेश भुजङ्गम् ही स्तोत्रे अर्थासहित दिली आहेत.
वेदकाळापासून या देवतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न पूर्वसुरींनी लिहिलेल्या ग्रंथांद्वारे घेतला आहे. विदेशातील गणेशांबद्दल माहिती दिली आहे. प्रत्येक युगात बदलत गेलेल्या गणेश स्वरूपाचाही आढावा घेतला आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरेचा थोडक्यात पण, रंजक भाषेत इतिहास दिला आहे. काही कथा थोडक्यात सांगितल्या आहेत आणि काही उपासनाही दिल्या आहेत. अष्टविनायकांची माहिती व तत्संबंधी कथाभाग यांचाही या पुस्तकात समावेश आहे. स्त्रिया आणि गणेश याबद्दलची माहिती अनेकांना नवीन वाटेल. जनमानसातील गणेशदैवत व पुजनादिबद्दल असलेल्या सर्वसाधारण शंकांचेही यात लेखकाने समाधान केले आहे. थोडक्यात म्हणजे हे पुस्तक झटपट माहितीचा खजिना पुरविणारे झाले आहे. 'मोरया प्रकाशन'ने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता अत्यंत उपयुक्त संदर्भ पुरविणारे हे पुस्तक प्रकाशित करून केली आहे.
बाप्पा मोरया
डॉ. सच्चिदानंद शेवडे
प्रकाशक : मोरया प्रकाशन, डोंबिवली
पृष्ठं : ८०, किंमत : ५० रु.
No comments:
Post a Comment