Saturday, September 28, 2013

सायबर सेल

मोबाइल कॅमेरे ‘झूम’ आणि व्हिडीओ क्लिप्स शूट करकरून ते शेअर करणार्‍या काही तरुण मुलांचे विकृत हात आणि नजरा कोण आणि कसे रोखणार?
तिला एका जवळच्या मित्रानं हळूच सांगितलं तुझा फोटो पोर्नसाईटवर आहे.तिला धक्काच बसला.
माझा फोटो..तोही पॉर्नसाईटवर.? शक्यच नाही असं तिला वाटलं, पण तरी तो म्हणतो म्हणून तिनं लगेच ‘ती’ साईट उघडलीच. एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठय़ा हुद्यावर ती काम करत होती. त्यामुळे पॉर्नसाईटचा अँड्रेस टाईप करत असतानाही कुणीतरी मुद्दाम आपली थट्टाच चालवली आहे, असा तिचा भ्रम होता. पण त्या साईटचं कव्हर पेज उघडलं आणि भूमिका उडालीच. तिचा नग्न फोटो त्या पेजवर होता. त्या खाली अलि मजकूरही लिहिलेला होता. आता मात्र ती पुरती हादरली होती. हा फोटो कोणी कोणी पाहिला असेल, कंपनीत, जवळच्या नातेवाईकांनी पाहिला तर किती नाचक्की होईल कुणाला काय सांगायचं?
या प्रश्नांनी ती अर्धमेलीच झाली. पण स्वत:ला सावरून तिनं मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली. अशा प्रकारच्या तक्रारींना सरावलेल्या सायबर सेलने झटक्यात या गुन्ह्याचा छडा लावला.
आणि समोर आलं ते सत्य भयानकच होतं. त्याच कंपनीत काम करणार्‍या तिच्याच एका तरुण सहकार्‍यानं तिचा तो फोटो मॉर्फ करून (म्हणजेच फोटोत अदलाबदल करुन ) तो पॉर्नसाईटवर अपलोड केला होता. चौकशी केल्यावर पोलिसांना त्यामागचा हेतू समजला. त्यानं तिला प्रपोज केलं होतं, ती नाही म्हणाली. त्या नकाराचा बदला घ्यायचा, तिला मनस्ताप द्यायचा म्हणून त्यानं हा उद्योग केला होता.

ती आणि तो
एकाच वेळी नोकरीला लागले.
एकाच कॉलेजातही होते.ती मात्र हुशारीच्या जोरावर पटकन प्रमोशन मिळवू लागली, सगळीकडे दिसू लागली. तिला पगारवाढही त्याच्यापेक्षा जास्तच मिळाली. आणि त्याला वाटू लागलं की, आपण मागे पडतोय म्हणून ती आपल्याला डिवचते. त्यानं तिच्या फेसबुक पेजवरून तिचा फोटो डाऊनलोड केला. आणि एका ‘तसल्या’ साईटवर तो तिच्या नंबरवर डकवून टाकला. तिला घाणेरडे फोन यायला लागले. सायबर पोलिसांनी नीट शोधलं, तेव्हा तो सहकारी सापडला.

मुलुंडमध्ये झालेली एक घटना नुकतीच वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा विषय ठरली. एका एक्स-रे लॅबमध्ये त्या लॅबच्याच कर्मचार्‍याने आपला मोबाइल चेंजिंग रूममध्ये लपवून ठेवला होता. एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांच्या देहाचं शुटिंग तो त्या मोबाइलमध्ये करत होता. मात्र एका सतर्क महिलेला संशय आला आणि तिने या कर्मचार्‍याचं भांडं फोडलं. पोलिसांनी त्याला अटक केली, त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी धाडला. तपासादरम्यान, पोलिसांनी निरीक्षण नोंदवलं की, हा आरोपी सराईत नाही. कारण त्याने क्लीप काढण्यासाठी दडवलेला मोबाइल चपखलपणे दडवला नव्हता. म्हणून तो लक्षात आला. पण सराईत गुन्हेगार बेमालूम असे मोबाइल कॅमेरे लपवून ठेवू शकतात.

ठाण्याच्या एका मॉलमधल्या लेडीज टॉयलेटमध्ये असा प्रकार सुरू होता. कुणी महिला टॉयलेटमध्ये जाण्यासाठी निघाली की सफाई कर्मचारी तिला अडवे, टॉयलेटची साफसफाई सुरू असल्याचे सांगे. त्यानिमित्ताने आत जाई आणि मोबाइल लपवून यायचा. त्यानं काही महिलांच्या व्हिडिओ क्लिप्सही तयार केल्या होत्या. मात्र हा प्रकारही उघड झाला आणि पोलिसांनी त्या कर्मचार्‍याला अटक केली.

काही महाभाग तर असेही आहेत की, जे चालता बोलता महिलांचे फोटो काढतात. सायबर पोलिसांच्या नजरेत असे अनेक बिलंदर आहेत जे रस्त्यावरून चालणार्‍या, बस-ट्रेनची वाट पाहात स्टॉप-स्टेशनवर ताटकळणार्‍या, समोर बसून प्रवास करणार्‍या, भाजी मार्केटमध्ये खरेदी करणार्‍या, दारासमोरच्या व्हरांडयात केर काढताना खाली वाकलेल्या महिलांचे नेमके क्षण आपल्या मोबाइलमधून क्लीक करतात.

पिकनिकमध्येही तेच. धबधबा असो की समुद्रकिनारा. की फक्त पाऊस, भिजलेल्या मुलींचे, समुद्रकिनारी असलेल्या मुलींचे फोटो काही जण काढतात. काही जण तर व्हिडिओ शूटही करून ठेवतात.

प्रेमात पडलेल्या काही जोडप्यांमध्ये सध्या एक नवीन फॅड आहे. आपल्या पहिल्यावहिल्या नाजूक क्षणांचे फोटोच नाहीतर व्हिडिओ शुटिंगही मोबाइलवर करून ठेवण्याचे. पण सायबर पोलीस असंही सांगतात की, पुढे एकमेकांचं नाहीच पटलं तर त्याच व्हिडीओ क्लिप्स वापरून काही मुलं मुलींना ब्लॅकमेलही करतात. त्यातून त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचेही प्रकार सर्रास सुरू होतात. अशा काही केसेसमध्ये सायबर पोलिसांनी अटक करून गुन्हेही दाखल केलेले आहेत.
मोबाईलवर पाहण्याचा चाळा
टेक्नॉलॉजीच्या चुकीच्या आणि चावट वापरातून उद्भवणारी अशी अनेक प्रकरणं सध्या सायबर पोलिसांकडे येऊन धडकताहेत. शाळा-कॉलेजात रोजच्या रोज शिक्षा करणारी शिक्षिका, अल्पावधीतच कर्तबगारीने आपल्या पुढे निघून गेलेली सहकारी, प्रेमसंबंध नाकारणारी तरूणी या अशा विकृतीची शिकार बनतात. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधले अनेक आरोपी हे त्या मुलींच्या परिचयातले आहेत.
निदान हे आरोपी सापडतात तरी.
पण आता एवढे सोपे हे प्रकरण उरलेले नाही. आपल्याला रोजच्या रोज फेसबुकवर फॉलो करणार्‍या लाखो-करोडो अपरिचितांचं काय? त्यांच्या नजरा रोज आपले फोटो छोटे-मोठे करून पाहतात, काही जण तर ते सेव्ह करून ठेवतात. काही विकृत तर एक खेळ खेळतात, एक नाव मनात धरून त्याचा सर्च मारायचा आणि त्यातून जे प्रोफाईल दिसतील त्या मुलींचे फोटो ‘पाहत’ बसायचे.
काही जणांच्या हातात असतातच मोबाइल. हे मोबाइल ८ ते १0 पिक्सल किंवा त्याहूनही अधिक क्षमतांचे कॅमेरे असलेले असतात. ते प्रचंड झूम होऊ शकतात. असे कॅमेरे झूम करकरुन, वाईड अँगलने कुणी लांबून आपला फोटो काढला तर ते कळणारही नाही. व्हिडीओ शूट करत असेल तर लक्षातही येण्याची शक्यता नाही.

कशासाठी? थ्रिल मॅनलिनेस आणि शान

बाइक चालवताना तंग कपडे घातलेल्या मुली, पावसाळी पिकनिकच्या जागा, समुद्रकिनारे, तिथं बसलेले कपल्स, ट्रेन-बस, प्लॅटफॉर्म, एसटी स्टॅण्डस या ठिकाणी काही मुलं असं विकृत चित्रण करतात. काही जण त्याचा दुरूपयोग करतात, काही आपल्यापुरतं काही दिवस फोनमधे ठेवतात.
काही आपल्या मित्रांबरोबर व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल्सवरून हे सारं शेअरही करतात.
असं शेअर करणं ही सध्याच्या काळात मोठी फॅशन काही तरुण मुलांमध्ये आहे. इतके दिवस ते फक्त ‘तसले’ चावट फोटो पहायचे, नट्यांचे मॉर्फ केलेले फोटो पहायचे, एडल्ट जोक्स, हॉट व्हिडीओ क्लिप्स एकमेकांना फॉरवर्ड करायचे.
पण आता ते तसं ‘उधारी’चं काही तरुणांना नकोय, कारण त्यांच्या हातात आहेत मोबाइल कॅमेरे.
कुठंही क्लिक करता येऊ शकतील असे.
मग ते आपल्याला आवडलेल्या, हॉट किंवा फनी वाटलेल्या, किंवा निव्वळ भंकस घटकाभर म्हणून मुलींचे फोटो त्यांच्याही नकळत काढतात. ते व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतात. सगळा ग्रुप त्याच्यावर चावट-अलि चर्चा करत बसतो दिवसभर. आणि आपण कसा भारी फोटो शेअर केला, तो फोटो स्वत: काढला, कसा काढला, यात ‘शान’ मारत काढणारा त्यादिवशी ग्रुपमध्ये भाव खाऊन जातो. ज्याच्या मोबाइलमध्ये असा साठा जास्त, तो ‘पठ्ठय़ा’ भारी असा एक अत्यंत भयाण ट्रेण्डही सध्या मुलांच्या काही ग्रुप्समध्ये आहे. त्यातून त्यांना घटकाभराचं ‘रिअल’ थ्रिल मिळतं, असंही काही जण सांगतात.
पुढे अशा मुलींनी काढलेल्या काही फोटोंचं खासगीत प्रदर्शन भरतं. त्यात आंबट चर्चाही घडते. आणि चढाओढही लागते. काही जण तेवढय़ापुरती गम्मत म्हणून शूट करतात, मग डिलीटही करून टाकतात.
काही जण आपण काढलेल्या क्लिप्स-फोटो कुणाला दाखवतही नाहीत, पण ते एककटे सतत ‘तेच’ पाहत असतात, असाही एक पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनीच कशाला पण घराघरात पालकांनी आपल्या लेकाच्या मोबाइलमधलं मेमरी कार्ड तपासलं तरी काही मुलांच्या मोबाइलमध्ये हॉट क्लिप्सबरोबर अशा काही ‘रिअल’ गोष्टी सापडू शकतील.

सायबर पोलिस काय म्हणतात डोळे उघडे ठेवा
मुलींची खबरदारी घ्यायची कशी?
१) सध्या फेसबुकवर सगळी खासगी माहिती देण्याची चढाओढच सुरू आहे. सकाळी
उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरात काय काय केलं ही सर्व माहिती विथ फोटो फेसबुकवर काही जणी टाकतात. ते टाळा. आपली सिक्युरिटी सेटिंग अधिक मजबूत करा. पिकनिक असो की हनिमून, घरी परतण्याआधी फेसबुकवर माहितीसह फोटो यातूनच विकृतांना खाद्य मिळतं, त्यामुळे खासगी तपशील चव्हाट्यावर देणं थांबवा.
२) फेसबुकमध्ये कुणाच्याही प्रोफाईलमधल्या फोटो ऑप्शनवर क्लिक केलं तर ते फोटो स्वत:च्या कॉम्प्युटरवर सेव्ह करण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. एखाद्या तरूणीचा साधा फोटो आणि त्याखाली तिचा मोबाइल नंबर जाहीर केल्याची अनेक प्रकरणे सायबर पोलिसांनी तपासली आहेत. त्यामुळे रोजच्या रोज आपले प्रोफाईल फोटो बदलणं, जास्तीत जास्त फोटो अपलोड करणं महागात पडू शकतं. अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्याआधी विचार करा.
३) आपल्याला किंवा दुसर्‍या एखाद्या मुलीला कुणी शूट करतोय असा जरा जरी संशय आला तर लागलीच त्याला हटका, मोबाईल दाखव म्हणून आरडाओरडा करा.
४) जिथे कुठे चेंजिंग रूमचा वापर करावा लागेल तिथे सतर्क रहा, चेंज करण्यासाठी घाई न करता थोडा वेळ ती रूम नीट पाहा. कुठे काही संशयास्पद दिसले तर विचारा.
५) आरसे पहा, आरशाला अंगठा टेकवून पहा. तसं करताना आरसा आणि अंगठा यात काही गॅप आहे, असं वाटलं तर जरा सावध व्हा.
६) सार्वजनिक शौचालय, बस-रेल्वेस्टेशन इथली शौचालयं वापरताना काळजी घ्या.
७) आपले खासगी क्षण मोबाइल कॅमेर्‍यात कुणी शूट करत असेल तर त्याला विरोध करा.
८) कुणी कितीही इमोशनल ब्लॅकेमल केलं तरी खासगी क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिप काढू देऊ नका.
९) काढले असतील आणि त्यावरुन कुणी ब्लॅकमेल करत असेल तर त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून करणार्‍याच्या मनासारखं वागू नका. थेट पोलिसांकडे तक्रार करा.
१0) पोलीस तुमचं नाव गुप्त ठेवतील याची खात्री बाळगा.
११) बदनामी टाळण्यासाठी अनेक मुली वारंवार ब्लॅकमेलिंगला बळी पडून स्वत:चं शोषण ओढवून घेतात, ते टाळा. हिमतीनं पोलिसांत तक्रार करा.

सायबर पोलिस सेल म्हणजे काय?

२000 साली माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायद्याची निर्मिती झाली. त्याच वर्षी देशभरातल्या मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २000 रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला. हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करतोय. मुंबई पोलीस आयुक्तालयात या सायबर सेलचं सुसज्ज कार्यालय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा प्रत्येक गुन्हा या सेलकडून तपासला जातो. त्यासाठी या सेलमध्ये तज्ज्ञ, प्रशिक्षित अधिकारीवर्ग आहे.

सायबर पोलिस स्टेशन म्हणजे काय?

२00९ साली मुंबई पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्याची स्थापना केली. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्याच्या आवारात सायबर पोलिसांचं ठाणं आहे. इथेही प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. सायबर सेल आणि सायबर पोलीस ठाणं यांच्या काम करण्याच्या पद्धती सारख्या आहेत. मात्र फक्त पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करून घेण्याचा अधिकार आहे.
किरकोळ, साध्या, सोप्या प्रकरणांमध्ये सायबर पोलीस तांत्रिक मदत देऊन पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यालाच करायला लावतात. मात्र प्रकरण गंभीर, संवेदनशील, गुंतागुंतीचं असेल तर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याचा संपूर्ण तपास सायबर सेल, पोलीस ठाण्याकडून केला जातो. सायबर पोलीस आधी तक्रारीतली तथ्यता पडताळतात. त्यानंतर आरोपीने वापर केलेल्या ईमेल अकाउन्टचा पाथ, आयपी, आयएसपी शोधून प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहोचतात. त्याने ज्या कॉम्प्युटरवरून गुन्हा केलाय तो ताब्यात घेऊन त्यातून पुरावे गोळा करतात. हा संपूर्ण तपास अत्यंत गोपनीयपणे केला जातो.

तक्रार कशी करायची

इंटरनेट किंवा मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक, बदनामी, ईल मजकूर-फोटो-क्लीप, धमक्या यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी थेट सायबर सेल किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करता येऊ शकते. मात्र प्रसंगी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करता येऊ शकते. तांत्रिक मदतीसाठी सायबर पोलिसांकडे ही तक्रार येते. बाकीचा तपास स्थानिक पोलीसच करतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive