Sunday, September 15, 2013

महिमा कहे न जाय... Mahima Kae na jay, Mystery of Shree Ganeshamobile.jpg

हे गणराया! आतुरलेल्या मनाने आणि दर्शनासाठी उत्सुक असलेल्या डोळ्यांनी आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत. अधिक भाद्रपदामुळे तुझं आगमन यंदा थोडं लांबलं. नाहीतर प्रतिवर्षी भक्तांच्या 'पुढल्या वर्षी लवकर या!' या विनंतीचा मान राखून तू न चुकता ठरलेल्या वेळी येतोसच.

महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे तुझा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. पावसाळा संपता संपता येणारा तुझा उत्सव सर्वांठायी चैतन्याची निर्मिती करतो.

समर्थ रामदासस्वामींनी आणि गोसावीनंदनांनी तुझ्या दर्शनाला महत्त्व दिलं. समर्थांनी तर म्हटलं, 'दर्शन मात्रे मन कामना पुरती' आणि गोसावीनंदनांनी, 'धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता' असं म्हटलं आणि काय सांगू गणराजा! ज्या देवतेच्या दर्शनाला हिंदुंच्या सणवारात सर्वाधिक महत्त्व आहे असा तू एकच. मुंबईत ठिकठिकाणी 'राजे' म्हणून सार्वजनिक गणेशाचं महत्त्व प्रस्थापित केलं जातं. हे सगळे 'राजेरजवाडे' कालपरवा निर्माण झालेले. तू मात्र काही हजार वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरात भक्तीभावाने पूजला जातोस.

सार्वजनिक गणेशोत्सवाने देवघरातली मूर्ती मैदानात आणली म्हणून शंभर वर्षांपूर्वी मोठं काहूर उठलं होतं. प्रचंड विरोध झाला होता आणि त्याचदरम्यान प्लेगची मोठी साथ आल्यामुळे, सोवळं गुंडाळून ठेवलं, गणपती मैदानात आणला म्हणून ही साथ आली असा गहजब काही लोकांनी केला होता. गणराया! महाराष्ट्रातल्या राजकीय जागृतीला तुझ्या उत्सवाने चालना दिली. मेळे, भाषणं यामधून मनामनांत स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. पण धार्मिक क्षेत्रातही एक उदार दृष्टिकोन तुझ्या उत्सवामुळे मिळाला. आज ठिकठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकारी मंडळात इतर धर्मीयसुद्धा बहुमानाच्या जागी दिसतात. तुझ्या उत्सवात सगळे लोक जातीभेद, धर्म-पंथ विसरून मनोभावे सहभागी होतात.


 यंदाचा गणेशोत्सव १२० वा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने प्रारंभ झालेला गणेशोत्सव यंदा १२० वं वर्ष साजरं करत आहे आणि योगायोग असा की १२० आकड्यांमधले १, २ आणि ० हे आकडे या वर्षाच्या २०१२ या संख्येतही विलसताना दिसतात. हा योगायोग म्हटलं तर साधा, म्हटलं तर मोठाच.

तू तुझ्या अवतारात अनेक प्रकारची गूढं निर्माण केलीस. व्यास महर्षींनी महाभारतात सांगितलं ते तू लिहून घेतलंस. आपली देवनागरी लिपीही तूच निर्माण केलेली आणि या लिपीत आपलं नाव अशा शिताफीने गुंफून ठेवलंस की कोणीही आश्चर्यचकित व्हावं. 'ग', 'ण' आणि 'श' ही तीनच अक्षरं आपल्या बाराखडीत अशी आहेत की, या तीनच अक्षरांचा काना म्हणजे उभी रेघ वेगळी आहे. स्वतंत्र आहे. बाकी इतर जी व्यंजनं आहेत म्हणजे च, त, प, म त्या सगळ्यांना काना त्या अक्षरातच सामावलेला आहे.

पुन्हा ही तीन अक्षरं याच क्रमाने येतात! अशा गमती तू प्राचीन काळापासून करत आला आहेस. तुझे अवतार एकूण २४. पैकी भाद्रपदातला शिवपार्वतीचा पुत्र आणि माघातला कश्यप आणि अदिती या दाम्पत्याचा पुत्र हे दोन अवतार प्रमुख. प्रत्येक युगात तुझ्या हाताची संख्या बदलते. तुझं वाहन बदलतं. तुझ्या कर्तृत्वाची दिशा तीच असली तरी साधनं बदलतात. तू अनादि अनंत काळाला अंकित करतोस आणि त्याचं प्रतीक म्हणून गणल्या गेलेल्या उंदरावर स्वार होतोस. याचे दाखले किती द्यावेत!

गणराया! मुळात लेखनकला अस्तित्वात नसती तर जगाची प्रगतीच खुंटली असती. तू निर्माण केलेली देवनागरी ही जगातली आद्य लिपी. कारण वैदिक काळापासून प्रगत असलेली आपली धर्मसंस्कृती ही जगातली आद्य संस्कृती होय. त्यामुळे या संस्कृतीची लिपी म्हणून देवनागरी सर्वमान्य झाली. इतकी की सध्या कम्प्युटरच्या युगातही देवनागरी लिपी अधिक योग्यप्रकारे वापरता येऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. कम्प्युटरला 'संगणक' म्हणतात. त्याच्याशीही तुमचं पूर्वीपासूनचं नातं आहे.

'अथर्वशीर्ष' हे मंत्रमय स्तोत्र लिहिणारे ऋषी 'गणक' या नावाचे. याचा सं'गणका'शी संबंध आहेच आणि संगणक म्हणजे कम्प्युटर ज्या साधनाद्वारे चालवला जातो त्याला म्हणतात, 'माऊस' म्हणजे 'मूषक' म्हणजे तुझं वाहन.

तुझं काळाबरोबर चालणं, काळाबरोबर राहणं इतकं आश्चर्यकारक आणि मनोवेधक आहे की जो जो विचार करावा तो तो नवनवीन धागे उलगडत जातात. आता हेच बघ ना, तुझा १२० व्या वर्षाचा गणेशोत्सव आणि इसवी सनाचं हे वर्ष या दोन्हीमध्ये ०,१,२ हे तीनच अंक आहेत. त्यापैकी ० आणि १ हे संगणकाच्या भाषेत म्हणजे 'बायनरी'मध्ये वापरले जातात.

या दोनच आकड्यात सर्व काही सामावलेलं आहे. यातलं शून्य म्हणजे ब्रह्म. ब्रह्माचा निर्देश शून्य या अंकातून केला जातो आणि गणपते, तू तर ब्रह्मरूप आहेसच. 'गणेशो वै ब्रह्मः' असं गणेशोपनिषदात म्हटलं आहे आणि १ या अंकाबद्दल काय बोलावं? अरे, तुझं नावच 'एकदंत'! सर्व धार्मिक विषयात तुझा पहिला क्रमांक. पहिल्या स्थानाचा तू मानकरी. तेव्हा गणेशा, कम्प्युटर, त्याचा माऊस त्याची भाषा या सगळ्यात तुझी विविध रूपं एकत्र आली आहेत. आम्ही जे 'त्वं ज्ञानमयोसि, विज्ञानमयोसि' असं म्हणतो, ते काय उगाच?

बाप्पा मोरया तू बुद्धिदाता आहेस. तू दिलेल्या बुद्धीच्या आधारावरच आम्ही तुझं हे विराट, भव्य आणि सर्वगामी स्वरूप पाहू शकतो. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या प्रत्येकात असलेले सप्तलोक मिळून २१ संख्या होते. त्याचा अधिपती तूच आणि म्हणूनच २१ संख्येतले दोन्ही आकडे तुला किती प्रिय आहेत ते तू या १२० व्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपात दाखवून देत आहेस आणि २१ म्हणजे २ वर १, २ पुढे १. द्वैताकडून अद्वैताकडे! द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा संदेश जणूकाही तू या दोन अंकी आकड्यातून देत आहेस.

महाभारत लिहून घेताना तू व्यास महर्षींना असं सांगितलंस की, 'तुम्ही ज्या गतीने बोलाल त्या गतीने मी लिहून घेईन.' म्हणजे जगातला पहिली लघुलिपीकार तूच आणि व्यास महर्षींना तू असंही म्हटलंस, 'जिथे तुम्ही थांबाल तिथे मी माझ्या पदरचं काही लिहित जाईन.' असं सांगतात की ज्या ज्या ठिकाणी तू असा पदरचा मजकूर लिहिलास त्याचा नीट उलगडा भल्याभल्यांनाही झालेला नाही!

तुझ्या जन्मापासून सगळ्या उपलब्ध कथा पाहिल्या की त्यात बुद्धीच्या आकलनापलिकडचं काहीतरी आढळत राहतं. सर्वज्ञात कथेप्रमाणे माता पार्वतीने आपल्या अंगावरच्या मळापासून तुझी मूर्ती तयार केली आणि ती आपल्या स्नानगृहाच्या बाहेर ठेऊन 'कोणाला आत पाठवू नकोस' असं सांगितलं. साधी गोष्ट आहे, पार्वतीसारख्या विश्वसुंदरीच्या अंगावरच्या मळापासून वीतभरही मूर्ती होईल काय आणि एवढ्याशा मूर्तीला पार्वतीमाता द्वार रक्षक म्हणून कशी बसवणार? इथे कल्पक बुद्धीला पहिला धक्का!

पुढे शंकराने शिरच्छेद केल्यावर तिथे हत्तीचं मस्तक बसवलं. आता हत्ती केवढा, त्याचं मस्तक केवढं आणि ते या लहानसर मूर्तीवर कसं बसवणार? मनुष्य देहाचा आकार आणि हत्तीचं मस्तक यांचं प्रमाण कितीतरी व्यस्त आहे. हा दुसरा धक्का! पुढेसुद्धा अनेक वेळा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना तुझ्या चरित्रात अनेक गूढं आढळतात. ती प्रारंभी गूढे वाटली तरी विचार केल्यावर त्यांचा अन्वयार्थ ध्यानी येतो.

पार्वती म्हणजे पर्वताची कन्या. पर्वत म्हणजे मातीचा किंवा दगडांचा ढिगारा. कन्या बापासारखीच असणार. म्हणजे कन्येचा आणि मातीचा जवळचा संबंध. पार्वतीने मातीची मूर्ती बनवली एवढाच त्याचा अर्थ. आता हत्तीएवढं मस्तक. सर्व प्राण्यांमध्ये हत्ती मोठा, स्वाभाविकच त्याचं मस्तक मोठं. सर्व प्राण्यांमध्ये तो बुद्धिवान आणि आपण ज्याचं डोकं मोठं, भालप्रदेश विशाल तो सामान्यतः अधिक बुद्धिवान असतो असं मानतो आणि तसा अनुभवही येतो. तू असाधारण बुद्धिमान आहेत.

तुझ्या चरित्रात त्याचे अनेक दाखले मिळतात. ती असामान्य, अद्वितीय बुद्धिमत्ता विशाल मस्तकातून व्यक्त होते. कोणी म्हणेल, हा सूतावरून स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे. दहा हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांच्या नजरेतून हे असं वाटलं असण्याची शक्यता तरी मान्य कराल ना? सर्वसाधारणपणे आपण असं मानतो की जे ताकदीने मोठे असतात, रणझुंजार असतात ते जरा बुद्धीने कमी असतात. पण तुझ्या विषयात तसं घडलं नाही. तू 'वक्रतुंड महाकाय' म्हणून ओळखला जातोस आणि शक्ती आणि बुद्धी दोन्ही तुझ्याठायी एकत्र नांदतात.

'स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम्।
वासरमणि रिव तमसां राशीं नाशयति विघ्नानाम्।।'

असा तुझा प्रातःस्मरणातला एक श्लोक आहे. हे गणेशा! तुझ्या केवळ स्मरणाने जसा सूर्योदय होताच अंधाराचा नाश होतो, त्याचप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तुझा निरंतर विजय असो. गणराया, आज चहुकडे अंधार दाटला आहे. ज्यांच्याकडे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेने बघावं असं कोणी दिसत नाही. सारे स्वार्थाच्या चिखलात लडबडले आहेत. ए गणेशा! तुझ्या कोटी कोटी सूर्यतेजाने हा सगळा संकटांचा, भयभीतीचा अंधार दूर करून तुझ्या महाराष्ट्रावर आणि या देशावर सुखसमृद्धीचा तेजोभास्कर पुन्हा प्रकाशेल अशी स्थिती निर्माण कर.

- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email