साक्षीविनायक
Sakshivinayak Devsthan Mandir, Kolhapur |
कोल्हापूर शहराच्या पूर्वेस दक्षिणोत्तर वाहणाऱ्या जयंती ओढ्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सिद्धिविनायक मंदिर आहे. मुळात हे मंदिर कोल्हापूरच्या छत्रपतींचे. संस्थानच्या सेवेत असलेले ज्योतिषी बाळ जोशीराव यांनी ते बांधल्याची व तेथे गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची इतिहासात नोंद आहे. साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.
राजज्योतिषींची भक्ती
संगमेश्वर मुक्कामी बेसावध असताना छत्रपती संभाजी महाराज यांना तकरीब खान या औरंगजेबाच्या सरदाराने कैद करून कोल्हापुरात आणले. त्यानंतर तेथून दिल्लीस औरंगजेबाच्या ताब्यात दिले. संगमेश्वर येथे मुघलांच्या हल्ल्याने घबराट पसरली. मुघल सैन्याने लुटालूट सुरू केली. तेव्हा आता येथे राहणे योग्य नाही असा विचार करून बाळ जोशीराव यांनी संगमेश्वर सोडले व ते चिपळूणमार्गे साताऱ्यास वास्तव्यास आले. तेथेही ते फार काळ रमले नाहीत. अखेर त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकातील चंद्रीकडे, जे जिंजी या नावानेही ओळखले जाते, तेथे वळवला. दरम्यान, कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून करवीर म्हणजेच आजच्या कोल्हापुरात केली होती. यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या राजधानीत कायमचा मुक्काम करावा असा विचार जोशीराव यांनी केला. तेव्हापासून ते संस्थानचे ज्योतिषी म्हणून कोल्हापुरातच राहिले. प्रख्यात ज्योतिषी असलेल्या जोशीराव यांची कोल्हापूर छत्रपतींचे ज्योतिषी व धर्मकार्य सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात जोशीराव यांनी कोल्हापुरात सुमारे २९ गणेश मंदिरांची स्थापना केली, त्यापैकीच एक म्हणजे ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर.
मंदिराची रचना
हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला आहे. मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. उमा आणि पार्वती टॉकीजच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य गाभारा सहा बाय सहा चौरस फुटांचा आहे, तर प्रवेशद्वार तीन फुटी आहे. चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मुख्य गाभाऱ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर परिसरात राधाकृष्ण, हनुमान आणि महादेव यांचीही मंदिरे आहेत. मंदिराच्या भव्य आवारात मोठे वृक्ष असल्याने भाविकांना गारवा जाणवतो. मूळ मंदिर म्हणजे सध्या असलेला मुख्य गाभाराच होता. पाऊणशे वर्षांपूर्वी ते बांधले, तर १९९० साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करून सध्याचा मंडप व शिखर बांधले. कोरीव कमानी हे मंडपाचे वैशिष्ट्य आहे. जुन्या काळातील मुख्य मंदिर मात्र दगडी आहे. अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न परिसर हे या मंदिराच्या वैशिष्ट्यांपैकी एक.
प्रसन्नतेची अनुभूती देणारी मूर्ती
छोट्या गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंदरी रंगाने रंगवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून, उजव्या हातात परशू व दत्त तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मस्तकावर पाच फण्यांच्या शेषनागाची छाया आहे. पंचतत्त्वाचे प्रतीक म्हणूक पाच फण्यांच्या नागाची फण ओळखली जाते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या एका बाजूला बालगणेशाची मूर्ती आहे, जी वरदविनायकाचे प्रतीक मानले जाते. बाळ जोशीराव यांनी छत्रपतींना वेळोवेळी जे भविष्य सांगितले आहे, ते याच गणपतीला साक्षी ठेवून. त्यातूनच या गणपतीला साक्षीविनायक असे संबोधले जाते.
नावाचा महिमा
सध्या जयंती ओढा असे रूढ असले तरी पूर्वीच्या काळी जयंती हा नदीचाच एक प्रवाह होता. त्यामुळे नदीकाठीच या मंदिराची स्थापना केली. मात्र, कालांतराने जयंती नदीचा उगम कमी झाल्याने त्याला जयंती ओढा असे म्हटले जाऊ लागले. त्यामुळे या मंदिराला कोल्हापूरकरांनी ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर असेच नाव दिले. बाळ जोशीराव यांचे वंशज याठिकाणी ध्यानासाठी येत होते, असा उल्लेख करवीर माहात्म्य या ग्रंथात आढळतो.
धार्मिक महत्त्व
सध्या मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित आहे.
मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, विनायकी चतुर्थी, गणेश जयंती, अंगारकी संकष्टी, संकष्टी या दिवशी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. दुर्वांकूर पूजा, पाद्यपूजा आणि अलंकार पूजा यांसह अभिषेकासाठी भाविकांची गर्दी होते. शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची जी पालखी शाही लवाजमा व पारंपरिक वाद्यांच्या निनादात त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते, तेव्हा या मंदिरात आवर्जून पालखी आणली जाते. येथे पालखीपूजन होऊन देवीची खणा-नारळाने ओटी भरल्याशिवाय पालखी मार्गस्थ होत नाही, असे या मंदिराचे महत्त्व आहे. तसेच रोज पहाटे, सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळी सात वाजता मंदिरात आरती केली जाते. भाविकांच्या इच्छेनुसार दुर्वांकूर पूजा, पाद्यपूजा व अभिषेक करण्यात येतो. मंदिरात विविध पारंपरिक उत्सव, सण, शिवरात्री, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी भक्तिभावाने साजरे केले जातात. यावेळी मंदिराची आकर्षक सजावट केली जाते.
नवसाला पावणारा गणपती
मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती, अशी या सिद्धिविनायकाबाबत कोल्हापूरकरांची श्रद्धा आहे. आपल्या मनातील इच्छा श्रद्धेने या गणपतीसमोर मनात व्यक्त करून नित्यनेमाने २१ प्रदक्षिणा घातल्यास इच्छापूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. शहरातील विविध क्षेत्रांतील, विविध वयोगटातील आणि स्तरातील अनेक भक्त रोज सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊनच आपल्या नित्यव्यवहारांना सुरुवात करतात.
मंदिराचे उत्पन्न आणि खजिना
दररोज साधारण एक हजार भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टीदिवशी हीच संख्या तीन हजारांच्या घरात जाते. अंगारकी संकष्टीदिवशी सुमारे पाच हजार भाविक सिद्धिविनायकासमोर नतमस्तक होतात. मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवारीही गर्दी असतेच. सध्या मंदिराच्या खात्यात दर महिन्याला एक लाख रुपयांची रोख देणगी जमा होते, तर इच्छापूर्ती झालेल्या भाविकांकडून गणपतीसाठी सोन्याच्या दुर्वांची जुडी, सोन्याचा मोदक, चांदीची आभूषणे, चांदीच्या पानाचा विडा, कलश अर्पण केलेले २१ लाख रुपयांचे दागिने आहेत.
रोजगाराचे साधन
मंदिरात रोज व औचित्याने येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असल्याने नारळ, दुर्वा, फुले यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परिसरातील काही निराधार महिला, बेरोजगारांना पूजेच्या साहित्याची विक्री करून उदरनिर्वाह करणे सोपे झाले आहे.
धार्मिक उपक्रम
मंदिरात सातत्याने धार्मिक प्रवचने व व्याख्यानांचे आयोजन केले जाते. दरमहा अथर्वशीर्षपठण होते. यापूर्वी येथे शालेय विद्यार्थ्यांच्या उच्चारावर काम करणाऱ्या एका संस्थेने सलग एक महिना अथर्वशीर्ष पठणाचे शिबीर घेतले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशी शिबिरे, धार्मिक उपक्रम येथे सातत्याने होतात. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे. धार्मिक उपक्रमांतून समाजोपयोगी कार्यासाठी मंदिर व्यवस्थापन कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment