Monday, September 2, 2013

श्रेयस-प्रेयस विचार

अध्यात्म शास्त्रात श्रेयस आणि प्रेयस विचार फार महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट आचरणात आणताना देहाला आणि मनाला कष्ट होतात. पण परिणामी ती गोष्ट हितकारक ठरते त्याला श्रेयस असे म्हणतात. एखादी गोष्ट आचरणात आणताना शरीराला आणि मनाला सुखाची वाटते, पण त्याचे परिणाम विनाशकारी असतात, त्याला प्रेयस असे म्हणतात. नोकरी करताना लाच घेतेवेळी झटकन मिळणारा पैसा दिसत असतो, पण त्याचे भावी दुष्परिणाम दिसत नाहीत. याउलट प्रामाणिकपणे नोकरी करताना प्रारंभी कष्ट होतात, पण शेवटी ते हिताचे आणि कल्याणाचे ठरते. माणूस श्रेयस आणि प्रेयस यात नेमके काय निवडतो त्यावरून तो पारमाथिर्क आहे की नाही ते ठरेल. जीवनात तुम्ही जर श्रेयसाची निवड करीत असाल तर तुम्ही मंदिरात जा अथवा जाऊ नका, तुन्ही धर्म जगत आहात. याउलट नाना तीर्थयात्रा आणि सत्संग करूनही तुम्ही प्रेयसाची निवड करीत असाल तर तुम्ही कितीही धामिर्क असलात तरी ते सारे नाटक आहे. हा श्रेयस-प्रेयस विचार समर्थांनी मनाच्या श्लोकांत अगदी सोप्या शब्दात सांगितला आहे.

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।

जनी वंद्य ते सर्व भावे करावे।

समर्थ 'जनी' हा शब्द सज्जन माणसाने या अर्थाने वापरतात. या जगात निंद्य काय आहे आणि वंद्य काय आहे ते बहुमताने ठरणार नाही. समाजातील साधू-संतांनी जी गोष्ट निंद्य ठरविली, ती निंद्य आणि जी गोष्ट वंद्य ठरविली ती वंद्य. व्यावहारिक जगतात खोटे बोलणे, निंदा करणे याला मान्यता मिळू शकेल, पण संतांच्या दृष्टीने ते निंद्यच होय. काही ठिकाणी नोकरीत प्रामाणिक माणूस अडथळा ठरू शकेल, पण संतांच्या दृष्टीने तो वंद्यच होय. अनेकदा तात्पुरता लाभ लक्षात घेऊन माणसे मोहाला बळी पडतात. खरा विवेकी मनुष्य आपल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा विचार करतो. कर्माद्वारे आपण आपले कल्याण आणि अकल्याण पेरत असतो. एकदा पेरून झाल्यावर उगवण्याबद्दल तक्रार करून चालणार नाही. ज्या गोष्टी हिताच्या आहेत त्या माणसाने नाईलाजास्तव रडत-खडत करू नयेत तर अंत:करणापासून आनंदाने कराव्या.

महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि कुंती यांच्यातील संवाद फार गोड आहे. कुंती विचारते- 'आपण एवढे सदाचाराने वागतो तरी देखील आपल्या वाट्याला वनवास आला. याउलट कौरव एवढ्या दुष्टपणे वागून ते आज राज्य करीत आहेत. मग आपल्या चांगल्या वागण्याचा उपयोग काय?' हा केवळ कुंतीचा प्रश्ान् नाही तर अवघ्या मानव जातीचा हा प्रश्ान् आहे. यावर युधिष्ठिराने छान उत्तर दिले. तो म्हणाला- 'आई, काही लाभ व्हावा म्हणून चांगले वागायचे असते, हे आज तुझ्याकडून मला प्रथमच कळले. चांगले वागणे हिताचे असते म्हणून चांगले वागायचे असते. कदाचित आपला आजचा वनवास हितकारक ठरेल आणि कौरवांचा राजभोग त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. 'सदाचार हा थोर सांडू नये तो। जगी तोचि तो मानवी धन्य होतो'। असे समर्थ म्हणतात याचे कारण सदाचाराने आपल्या चारित्र्याची जडण-घडण होते आणि या जगात चारित्र्यापेक्षा आणखी मोठी संपदा कोणतीही नाही.

जीवनाचे दोन स्तर समर्थ आपल्यापुढे ठेवतात. (१) श्रद्धा, प्रेम, माणुसकी, दया, क्षमा, शांती, भगवद्भक्ती यांनी भरलेले जीवन (२) स्पर्धा, द्वेष, निंदा, हिंसा, स्वार्थ, संघर्ष, कटकटी यांनी नटलेले जीवन. समर्थ स्पष्टपणे बजावतात-

' मना वासना दुष्ट कामा नये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे।

मना धर्मता नीति सांडू नको हो। मना अंतरी सार विचार राहो।।

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवी धरावा।

मना कल्पना ते नको विषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची।।

वाईट विचार प्रथम संकल्पाच्या रूपाने मनात उदीत होतो. त्याच मनात चांगले विचारही निर्माण होतात. समर्थांच्या मते वैचारिक स्तरावरच मनाचे नियमन केले पाहिजे. मनाने वाईट विचार करायचा आणि शरीराने चांगले वागायचा प्रयत्न करायचा हे शक्य नाही. स्पधेर्च्या आणि सत्तेच्या राजकारणापासून आपण स्वत:हून बाजूला झाले पाहिजे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद या महापुरुषांनी हे दाखवून दिले की चांगले वागूनही जीवनात यश मिळू शकते. त्यासाठी लबाडी किंवा दुष्टपणा केला पाहिजे असे नाही.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ७८

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive