Monday, September 2, 2013

सख्य भक्तीचे रहस्य

आपले एखाद्याशी संबंध चांगले असले किंवा जिव्हाळ्याचे असले म्हणजे त्याला व्यवहारात सख्य असे म्हणतात. अनेकदा प्रेम या अर्थानेही सख्य हा शब्द वापरला जातो. भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेम अवर्णनीय असते. येथे द्वैत संपुष्टात येते. खरे म्हणजे भक्ताला स्वत:ची इच्छा, स्वत:ची आवड, स्वत:चे वेगळे अस्तित्व, असे शिल्लकच राहत नाही. उर्दूमध्ये एक शेर आहे. 'खुद भुखा मर मगर माशुकको राजी कर'. याचा अर्थ ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला आवडेल असे वागणे. हे सख्य भक्तीचे लक्षण आहे. आपल्याला भगवंतावर प्रेम करायचे असेल, तर ज्या गोष्टी भगवंताला आवडतात त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. समर्थ म्हणतात-

' देवास जयाची अत्यंत प्रीती। आपण वर्तावे तेणें रीतीं।

येणे करिता भगवंती। सख्य घडे नेमस्त।।

आपण तैसेंचि वर्तावें। आपणासि तेच आवडावें।

मनासारिखे होता स्वभावें। सख्य घडे नेमस्त।।

व्यवहारात आपण प्रेम हा शब्द फार संकुचित अर्थाने वापरतो. एखादा मनुष्य आपल्या मनासारखे वागू लागला म्हणजे आपण त्याला प्रेम म्हणतो. भक्तीमध्ये आपण दुसऱ्याच्या मनासारखे वागायचे असते. यालाच शरणागती म्हणतात. नदी समुदाला मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे तिचे स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे भक्ताला स्वत:च्या स्वतंत्र इच्छा शिल्लक राहत नाहीत. असा भक्त केवळ प्रेमाने भगवंताला बांधून टाकतो. त्यालाच समर्थ प्रेमप्रीतीने बांधावे असे म्हणतात. भगवंत फक्त प्रेमानेच बांधला जाऊ शकतो, अन्य कशानेही त्याला बांधता येणार नाही. महाभारतातील एक गोड कथा आहे.

पाचही पांडव दौपदीसह त्यावेळी वनवासात होते. कुंती हस्तिनापुरात होती. भगवान श्ाीकृष्ण वरचेवर पांडवांना भेटायला वनवासात जात. जाताना ते हस्तिनापुरात कुंतीची भेट घेत. 'पांडवांना काही निरोप आहे का?' असे कुंतीला आवर्जून विचारीत. प्रत्येक वेळी कुंती सांगे- 'कृष्णा पाचही पांडवांना सांग की दौपदीच्या मनासारखे वागत जा.' कुंतीच्या या निरोपाचे सत्यभामेला फार आश्चर्य वाटे. तिच्या हेही लक्षात येई की सारे पांडव कुंती सांगेल त्याप्रमाणे वागतात. एक दिवस तिने दौपदीला एकांतात गाठून याचे रहस्य विचारले. तेव्हा दौपदी म्हणाली- 'सत्यभामे, पांडवांपैकी कुणीही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल माझा सल्ला मागतात, तेव्हा मी त्यांना काय अपेक्षित आहे ते आधीच जाणते आणि त्यानुसार माझे मत सांगते. वस्तुत: ते माझे मत असतच नाही. आता मला माझे मनच राहिले नाही, तर माझे मत कुठून असेल? शुद्ध प्रेमात प्रेम करणारा स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व शिल्लकच ठेवत नाही. तो आपल्या प्रेमास्पदामध्ये विलीन होऊन जातो. समर्थ म्हणतात-

देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगांसी तुटी।

सर्व अर्पावे सेवटीं। प्राण तोहि वेचावा।।

आपलें आवघें चि जावें। परी देवासी सख्य राहावें।

ऐसी प्रीती जिवें भावें। भगवंती लावावी।।

देव म्हणिजे आपुला प्राण। प्राणासी न करावें निर्वाण।

परम प्रीतीचे लक्षण। ते हें ऐसे असें।।

ऐसें परम सख्य धरितां। देवास लागे भक्ताची चिंता।

पांडव लाखाजोहरीं जळता। विवरद्वारें काढिलें।।

याचा अर्थ भक्त जेव्हा भगवंतावर एवढा विश्वास ठेवतो, तेव्हा त्या भक्ताच्या रक्षणाची सर्व जबाबदारी भगवंत स्वीकारतो. भगवान रामकृष्ण परमहंस छान दृष्टांत देत. ते म्हणत- तान्हे मूल सर्वस्वी आईवर अवलंबून असते, तेव्हा आई त्याच्यासाठी खास वेळ देते. हेच मूल मोठे झाले की, मित्रांबरोबर खेळण्यात रमू लागते. तेव्हा आई अशा मुलाची फार काळजी करत नाही. सख्य भक्तीत भक्ताला भगवंताखेरीज कोणाचाही आधार नसतो. महषीर् नारद म्हणतात-

तद् विस्मरणे परम व्याकुलता।

तदपिर्त अखिल आचारिता।।

कृष्णाने पांडवांसाठी काय केले नाही? याचे कारण पांडव कृष्णाशी अनन्य होते. अनेकदा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की, आपल्या मनात सर्वात पहिल्यांदा हा विकल्प येतो की देवाने असे कसे केले? काही लोकांची मजल तर इथपर्यंत जाते की ते म्हणतात- 'भगवंताला आमचे चांगले पाहवले नाही.' खऱ्या भक्ताची भगवंताबद्दल कधीही तक्रार असत नाही. आपल्याला जे मिळाले आहे, ते भगवंताच्या कृपेने मिळाले असून, आपल्या पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे, अशी त्याची धारणा असते. ढग आले नाहीत म्हणून चातक पक्षी ढगावर रागवत नाही. अमावस्येला चंद दिसला नाही म्हणून चकोर पक्षी काही भांडत बसत नाही. खरा भक्त भगवंताशी असा अनन्य असतो. एखादी गोष्ट न मिळाल्यास 'आपल्या हिताची नसावी म्हणून भगवंताने दिले नसेल' असा त्याचा भाव असतो. हे सख्य भक्तीचे रहस्य आहे.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ४९

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive