Friday, July 30, 2010

लग्न

लग्न

 

आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची (म्हणजे बायकोच्या वडिलांची नाही, आईची आईतब्येत फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय.

प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'काय झालं? '

तर माझी आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत'.

मला जाम टोटल लागेना, मी तोच प्रश्न परत रिपीट केला 'काय झालं? '

तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय'  

'कसली? '

'तुम्ही सगळं सोडून जाल'

'कशाबद्दल? '

'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला? ' अत्यंत भेदक संवाद आणि त्याला भावनेची डूब हे त्यांच्या संभाषण कौशल्याचं मर्म आहे.

'आहो पण इथे मी सी केलंय, काय कष्ट उपसलेत ते माझं मला माहिती, आता कुठे बरे दिवस दिसतायत, इतकं सुरेख घर घेतलंय,  मी कशाला सोडून जाईन? '

मी बायकोकडे आपला गडी म्हणून बघतोय तर ती त्यांच्यात कधी सामील झाली कळलंच नाही. ती म्हणाली 'हो यांचा काही भरोसा नाही'. मी परत चाट, आताच पार्टीहून आलोत हे विसरली का काय ही? आता सामना तीन विरुद्ध एक आणि दोन तटस्थ असा झाला.

'आहो पण बुद्ध शेवटी परत आलाच ना? ' मी त्यातल्या त्यात माझी आध्यात्मिक माहिती कामाला आणली.

'काय परत आलाआल्यावर स्वतःचा मुलगा म्हणाला 'माझ्यासाठी काय आणलं? ' तर त्याच्या हातात भिक्षापात्र दिलं! ' सासूमां सुसाट झाल्या होत्या. मला क्षणभर त्यांच्याकडून संसारदिक्षा घेतली असती तर एव्हाना कुठल्या कुठे पोहोचलो असतो असं वाटायला लागलं.

एवढ्यात आमचा मुलगा बाहेरून आला. वातावरणाचं गांभीर्य बघून त्याला मिश्किल हसू येत होतं, तो म्हणाला 'काय झालं? '

 मी प्रसंग सावरण्यासाठी त्याला म्हटलं 'जगातला एकमेव प्रश्न काय आहे? '

प्रसंगाची काहीही कल्पना नसताना देखील तो तितक्याच तप्तरतेनं आणि गंभीरपणे म्हणाला 'आता माझं कसं होणार? '

मला आणि त्याला इतकं कमालीचं हसू आलं की माझे तटस्थ आई वडील देखील त्यात सामील झाले आणि आम्ही सरळ सरळ चार विरुद्ध तीन असा तो सामना जिंकला!

तीन चार दिवसांनी बायको म्हणाली 'आपण प्रभातकडे केव्हा जायचं?' तो माझा वकील मित्र आहे, मी म्हणालो 'चल लगेच, पण आता त्याचं काय आहे?'

तुम्ही कधी बुद्धिबळ खेळला असाल तर निष्णात खेळाडू साधारण सहा चालींची एक स्ट्रॅटजी आखतो आणि त्याचं कौशल्य असं असतं की प्रतिस्पर्ध्याला अजिबात पत्ता लागू देता तो त्या सहा चाली अशा काही उलट सुलट खेळतो की त्याची स्ट्रॅटजी पूर्ण झाल्यावरच प्रतिस्पर्ध्याला काय प्रसंग ओढवला आहे ते समजतं. स्त्रियांना ही कला जन्मतःच प्राप्त असते म्हणून पुरुष विरुद्ध स्त्री असा बुद्धिबळाचा सामना जगाच्या इतिहासात कधी झाला नाही कारण जगज्जेत्या बुद्धिबळपटूला देखील स्त्रियांची स्ट्रॅटजी लक्षात येणार नाहीत्यातून या वर्तमानात राहण्याच्या आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे भूतकाळ जाम विसरायला होतो.

ती म्हणाली : 'मला डायव्होर्स पाहिजे! '

मी बावळटा सारखा म्हणालोः 'कुणा कडून? '

तीः 'उगाच सगळं माहीत असून नसल्या सारखं करू नका, तुमच्या कडून!'

मला तिच्या आवाजातला ठामपणा जाणवला. 'अग पण उगाच कशाला डिव्होर्स घ्यायचा आपला चांगलं चाललंय की, छान मुलगा पण आहे, घरात सगळं आबादी आबाद आहे' मी प्रसंग सावरायला लागलो.

'नाही आपण प्रभात कडे जाऊया' ती हट्ट सोडायला तयार नाही.

मग मी ट्रॅफिक जॅम मधून गाडी काढायचा प्रयत्न केला, 'त्यापेक्षा आपण छायाकडे जाऊया'

छाया तिची स्त्रीमुक्तिवादी मैत्रीण आणि माझी कॉलेजची कोप्रोफेसर आहे, ती सॉलिड कौन्सेलिंग वगैरे करते. तिचा नवरा तिला 'बाहेर दोरीवर घातलेले कपडे वाळले असतील का? मी आता ते घड्याकरून ठेवू का? असे प्रश्न विचारून तिनी हो म्हटल्या शिवाय काही करत नाही. आता छाया किती जरी स्त्रीमुक्तिवादी असली तरी माझा बिंधास्तपणा तिला आवडायचा, तिला मी माझ्या पार्टीत आणू शकीन असं मला वाटत होतंपण आपली स्ट्रॅटजी चालेल तर ना!

'नको, तुम्ही डायव्होर्सचे कागद घेऊन या, मी पुढचं बघते'. तिनी पुन्हा ट्रॅफिक जॅम केला!

आता काय बोलणार? मी म्हणालो 'चल फिरायला जाऊ'

'नको तुम्ही क्लायंटकडे जा, माझा मूड नाही' तिनी चेकमेट करून टाकला.

मग मला बाहेर जाववेना मी परत घरात आलो, ड्रॉवर उघडला सगळ्या एफ डीज् आणि पासबुक्स बाहेर काढली एक लिस्ट केली आणि तिच्या हातात ठेवली 'हे एवढे पैसे आहेत माझ्याकडे हे सगळे तुला घे आणि तुझा मुलात जीव आहे तो पण तू घे' मी इतका भावना विवश माझ्या आयुष्यात कधी झालो नव्हतो पण मी तिच्या समोर प्रामाणिकपणे मार्ग मोकळा करून दिला. ती लिस्टकडे बघून विचार करायला लागली. मी म्हणालो, 'माझ्याकडे मरेपर्यंत उपयोगी पडेल असं क्वालिफिकेशन आहे मी पैसे कसेही मिळवीन आणि तुला मुलगा हवा आहे मला मंजूर आहे उगाच कशाला कोर्टात जायचं. ती कसल्याशा विचारात पडली. मी म्हणालो चल फिरून येऊ.

बाहेर पडल्यावर मी तिला म्हणालो 'तुला हवं तेव्हा तू नीघ पण मला नीट विचार करून सांग कुठे जाणार तूतुला आता मिळणारी रक्कम मोठी वाटत असली तरी बरेचसे पैसे फ्लॅटमध्ये जातील, मुलगा मनातून दुभंगेल, काय साधशील यातून? 'ती विचारत पडली.

मी म्हणालो 'तुला एक मार्ग सांगू? '

ती म्हणाली 'काय? '

मी म्हणालो : 'लग्न जशी एक कल्पना आहे तशी डिव्होर्स पण एक कल्पना आहे. तू कमालीचा फिटनेस ठेव आणि एखादा माझ्यापेक्षा  उमदा नवरा शोध मी तुझं लग्न करून देईन. दरम्यानच्या काळात माझ्याकडे मैत्रीण म्हणून राहा.'

ती म्हणाली : 'चालेल'.

तिच्या मनाचा मला पत्ता लागेना पण मला ही रिलेशनशिप मजेशीर वाटायला लागली

ती म्हणाली 'आता मला आईकडे सोडा'.

तिला सोडून मी क्लायंटकडे गेलो.    

 

सुंदर तरुणी दिसल्यावर...

सुंदर तरुणी दिसल्यावर...

प्रसाद शिरगांवकर 

 

सुंदर तरुणी दिसल्यावर...

कळे मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'
तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले...
(
दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता...
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

 


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive