Friday, July 2, 2010

दया तिचे नांव

दया तिचे नांव

 

 

कोणीही साधुवृत्तीने वागू लागला , संतपदाच्या मार्गावरुन वाटचाल करु लागला की त्याची इच्छा असो वा नसो हळूहळू त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडण्यास सुरुवात होते. ह्या भवसागरात गटांगळया खाणारे लोक पुष्कळ. त्यांना अशा साधुसंतांचा मोठा आधार वाटू लागतो. ते त्याच्यापासून काही मार्गदर्शन , काही उपदेश अशा अपेक्षा बाळगू लागतात. अर्थात यात चूक काहीच नाही , किंबहुना परमार्थ मार्गावर सर्वांची प्रगती व्हावी म्हणून हे म्हटले तर आवश्यकच आहे. असे संसारपीडांनी त्रस्त झालेले लोक त्याच्या अवतीभोवती जमा होतात , त्याला ते आपला गुरु मानू लागतात आणि गुरु म्हणजे काय ? ' गुरुर्बह्मा गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म , तस्मै श्रीगुरुवे नमः॥ गुरुची महती ही ब्रह्मा-विष्णु-महेश ह्यांच्याएवढी फार मोठया समर्थ्याची आहे. त्यामुळे जे आपल्याला कळत नाही किंबहुना जे कोणालाही आकळत नाही ते आपल्या गुरुला कळते , असा ठाम विश्वास सच्छिष्याला वाटत असतो. त्यामुळे प्रत्येक लहानमोठया समस्येवर तो आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाची अपेक्षा बाळगीत असतो.

श्रीस्वामी रामकृष्ण परमहंसांचा असाच एक शिष्य होता. तो प्रत्येक लहानमोठया प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्या गुरंच्चे म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंसाच्या मार्गदर्शनाची वाट पाही. अगदी लहानसहान गोष्टीतसुध्द आपल्या गुरुंना काय वाटेल , हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्यात त्याला अधिक रस असे. एकदा काय झाले , तो ज्या ठिकाणी राहात होता तिथे डास , चिलटे यांचा उपद्रव अतिशय वाढला. डासांमुळे रात्री झोप येईना म्हणून हैराण झाला. पण डासांना मारावयाचे कसे , ती तर हिंसा होईल. त्याने अनेक उपाय करुन पाहिले पण डासांच्या त्रासापासून त्याची काही सुटका होईना.

डासांना मारले नाही तर आपला जीव हैराण होतो आणि मारले तर अहिंसेच्या तत्त्वाचा भंग होतो. काय करावे ते त्याला कळेना. तो नेहमीप्रमाणे रामकृष्ण परमहंसांकडे मोठया अपेक्षेने गेला. रामकृष्ण परमहंस हे अंतज्र्ञानी त्रिकालदर्शी. त्याच्या मनातला प्रश्न रामकृष्ण परमहंसांनी बरोबर ओळखला. ते ह्या शिष्याबरोबर अंगणात बसले होते. तेथून उठले आणि घरात गेले. घरातून त्यांनी एक सुंभाने विणलेली बाज-खाटले-बाहेर आणली आणि अंगणातल्या मोकळया जागेत ते ती बाज जमिनीवर जोरजोरात आपटू लागले. बाज आपटल्यावर पहिल्या झटक्यात तिच्यातून पाच-पंचवीस ढेकूण बाहेर पडले. पुन्हा आपटल्यावर आणखी दहा-पंधरा बाहेर पडले. असे पाच-सहा वेळा आपटल्यावर बरेचसे ढेकूण बाहेर पडले. स्वामी त्या ढेकणांना चिरडू लागले आणि स्वतःशीच म्हणू लागले , ' आज कालीमातेला आपल्या भक्तांच्या रक्ताचे टिळे लावून पुजा हवी आहे असे दिसते. हे टिळे लावून मी कालीमातेला प्रसन्न करु इच्छितो , पाहुया माता काय आशीर्वाद देते. ' असे म्हणून स्वामी रामकृष्ण परमहंस ती बाज पुनःपुन्हा अंगणातल्या जमिनीवर आपटू लागले.

त्यांचा शिष्य गुरुंच्या ह्या कृतीकडे मोठया औत्सुक्याने आणि आदराने बघत होता. स्वामींनी स्वतःच्या हाताने चिरडलेले ढेकूण पाहाताच त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर मिळाले होते. स्वामींनी आपल्या कृतीने त्याला उत्तर दिले होते.

त्रासदायक ठरणा-या रक्तपिपासू प्राण्याला नष्ट करणे हा अधर्म नसून धर्मच आहे. ते एक आवश्यक कृत्य आहे , ही गोष्ट श्रीरामकृष्ण परमहंसांनी आपल्या कृतीने त्या शिष्याला दाखवून दिली. शिष्याने आपल्या गुरुचे पाय धरले आणि भावपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहिले. गुरुंनी त्याच्या मस्तकावर थोपटले आणि , '' मिळाले ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर! '' अशा आविर्भावाने प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे एक कृपाकटाक्ष टाकला.

तुकोबांनी म्हटलेंच आहे , दया तिचे नांव , भूतांचे पालन। आणिक निर्दळण। कंटकांचें॥ आपल्याला त्रास देणा-याचा नायनाट करणें , हे एकप्रकारें सत्कृत्यच आहे. दुष्टांचा विनाश करणें हे दैवी कार्य आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive