Sunday, July 4, 2010

नावात काय नाही?

नावात काय नाही?


मी जेंव्हा मनोगतावर टग्या, उद्धट,विसोबा खेचर, कोंबडी अशी नावे वाचते तेंव्हा मला बँकेतल्या माझ्या सहकाऱ्यांच्या टोपण नावांची आठवण होते. फरक एवढाच की मनोगतींनी ही नावे स्वेच्छेने धारण केली आहेत आणि माझ्या सहकाऱ्यांना ती नावे त्यांच्या इच्छेविरुद्ध बहाल करण्यात आली होती. माझ्या एका सहकाऱ्याची, शेखरची समर्पक नावे ठेवण्याची  हातोटी वाखाणण्याजोगी होती. या नावांच्या उद्गम कथा सुरस आहेत.
     
स्वामिनाथन् कपाळावर भस्माचा पट्टा ओढून यायचा म्हणून तो भस्मासुर तर गणेशन् कपाळाच्या मधोमध लाल गंधाची उभी रेघ लावून यायचा म्हणून तो वन लिमिटेड. ( मुंबईत लिमिटेड बसचे नंबर लाल रंगात असतात.) नेहमी 'यस सर'करणार राममूर्ती अलबत्या(अलबत् म्हणणारा) तर त्याचा गोल मटोल साहेब गलबत्या.आमच्याकडे दोन सीता होत्या. एक होती सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी 'अपनी सीता' आणि दुसरी होती ऐन तारुण्यात विरक्ती आलेली, बिन इस्त्रीच्या कपड्यातली, पदर दोन्ही खांद्यावरून घट्ट लपेटून घेणारी. ही सीता फावल्या वेळात पोथ्या पुस्तके वाचायची, महिना, महिना रजा घेऊन सत्संगाला जायची. ती झाली 'दुसरी सीता'. (आठवा जया भादुरीचा चित्रपट -दुसरी सीता.)
     
मीनाच्या पायातल्या पैंजणांना छोटे छोटे घुंगरू होते. ती चालू लागली की घुंगरू किणकिणायचे म्हणून तिला नाव पडले छमछम. प्रभू आडनावाच्या ऑफिसरच्या हाताखाली मीरा नावाची  एक मुलगी होती. शेखर त्याला नेहमी 'मीरा के  प्रभूम्हणायचा. (शेखरची वाचासिद्धी एवढी जबरदस्त की पुढे तो खरोखरच त्या मीरेचा प्रभू झाला) ज्ञानेश्वरला तर त्याने नावाने कधी हाकच मारली नाही. तो त्याला नेहमी माउली म्हणायचा. हे नाव ज्ञानेश्वरला एवढे फिट्ट बसले की तो सगळ्यांचाच माउली झाला.पुढे त्याची बदली झाल्यावर तो नवीन शाखेत पोहोचण्यापूर्वी त्याचे टोपणनाव पोहोचले होते. त्यामुळे तिथेही तो सर्वांचा माउली झाला. त्याच्या लग्नाची पत्रिका हातात पडल्यावर त्याच्या अमराठी चीफ मॅनेजरला त्याचे नाव ज्ञानेश्वर असल्याचा साक्षात्कार झाला.
          
शशीच्या डोक्याचा आकार अगदी तंबोऱ्यासारखा म्हणून तो शशी तंबोऱ्या आणि त्याच्याबरोबर सतत असणारा रवी सताऱ्या. राजाराम सतत तारेत म्हणून तो डोलकर. तो दिसला की शेखरला हमखास 'मी डोलकर डोलकर दर्याचा राजा' हे गाणे म्हणायची ऊर्मी यायची. राधाला आंबा अतिशय प्रिय. आंब्याच्या दिवसात तिच्या डब्यात फक्त आंबा आणि चपाती. ती घरून अख्खा आंबा घेऊन यायची.दुपारी जेवणाच्या वेळी त्याचा रस काढायची आणि बाठा पार पांढरा होईपर्यंत दातांनी तासून तासून खायची. तिचे आंबा खाणे प्रेक्षणीय होते म्हणून तिला नाव पडले अंबाबाई.
     
नावे ठेवताना शेखर बँकिंग टर्म्सचाही आधार घ्यायचा. एका मोकळ्या ढाकळ्या मुलीला तो 'बेअरर चेक' म्हणायचा. एका खाऊन पिऊन फैलावल्या मुलाला तो 'ओवरड्रॉन अकाउंट' म्हणायचा. एका प्रौढ कुमारिकेला 'रेफर टू ड्रॉवर'आणि एका सुंदर पण विवाहित मुलीला 'अकाउंट पेयी' म्हणायचा.अर्थात ही सगळी नावे खासगीतली. मला ती केवळ अपघातानेच कळली.
     
एकदा दुपारी जेवताना हास्य विनोद चालू होते. अचानक मस्करीची कुस्करी झाली आणि गणेशन् आणि दुबे हमरीतुमरीवर आले. लंचरूममधली परिस्थिती तणावग्रस्त झाली. गणेशन् ताडकन उभा राहून त्वेषाने दुबेला म्हणाला,"यू शट अप." दुबेही ताडकन उभा राहिला आणि तितक्याच त्वेषाने गणेशनला म्हणाला,"यू डबल शट अप". हे ऐकताच मोठा हास्यस्फोट झाला. मजा म्हणजे दुबे आणि गणेशन् ही आमच्या बरोबर हसू लागले. वादळ जेवणाच्या डब्यात निवळले पण त्या क्षणापासून दुबे 'डबल शट अप' झाला.
     
आमच्याकडे एक नवीनं मॅनेजर बदलून आले.बदल्यांचा मोसम नव्हता. शिरस्त्याप्रमाणे बदलीचा हुकूमही आला नव्हता. अशा तडकाफडकी बदलीच्या मागे तसेच जबरदस्त कारण असले पाहिजे असा विचार करून शेखरने संशोधन केले तेंव्हा त्याला असे कळले की हे मॅनेजर जुलमी आणि पक्षपाती आहेत. 'आमचीग्येल्लीं'वर यांची विशेष कृपादृष्टी. आमच्या बँकेची स्थापना मंगलोरमध्ये झाली होती त्यामुळे आमच्या बँकेत मंगलोरी कोंकणी लोकांचा जास्त भरणा. ते स्वजातीयांचा आमचीग्येल्ली ( आपल्यापैकी ) असा उल्लेख करतात म्हणून आम्ही उपरेही त्यांना आमचीग्येल्लि असेच म्हणत असू. तर त्या शाखेतल्या उपऱ्यांचा मराठी बाणा जागृत झाला. या साहेबांना उकडीच्या मोदकांतून जमालगोटा खिलवण्यात आला. या गनिमी काव्याचा खूप बोभाटा झाला‌‌.साहेबांची ताबडतोब आमच्याकडे रवानगी झालीआता एवढे सांगितल्यावर साहेबांचे नाव 'जमालगोटा' पडले हे वेगळे सांगायला नकोच.
     
यादी खूप मोठी आहे पण कुठेतरी थांबायला नको का? हां. एक सांगायचंच राहिले. शेखरच्या या नावे ठेवण्याच्या सवयीमुळे सगळे त्याला 'शेखर आत्या' म्हणत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive