Sunday, July 18, 2010

नॉनव्हेजच्या संगे कॅन्सरच्या गावे

नॉनव्हेजच्या संगे कॅन्सरच्या गावे

 

कॅन्सर म्हणजे जीवघेणा आजार. कॅन्सरची लक्षणं वेळेवर लक्षात आल्यास यावर उपाय होऊ शकतो हे नक्की. मागच्या लेखामध्ये आपण पोटाशी संबंधित अन्ननलिकेचा

 

आणि जठराचा कॅन्सर या दोन प्रकारांची माहिती घेतली होती. या भागात आपण मोठं आतडं, स्वादुपिंड आणि लिव्हर यांच्या कॅन्सरविषयी जाणून घेणार आहोत, पोटविकारतज्ज्ञ डॉ. अमित मायदेव यांच्याकडून

मोठ्या आतड्याचा कॅन्सर

मोठ्या आतड्याचे सगळेच आजार नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये अधिक आढळतात. शाकाहारी असणाऱ्यांना ते होतच नाहीत असं नाही. परंतु, नॉनव्हेज खाणाऱ्यांना हे आजार होण्याची शक्यता तुलनेत जास्त असते. वारंवार नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या मोठ्या आतड्याच्या कार्यात बदल व्हायला लागतात. त्याच्या लायनिंगमध्ये बदल होतात. लायनिंगला एका प्रकारचे फुगे येतात. त्यामुळे आतड्यातला मळ फुग्यांमध्ये अडकून बसतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो. त्यामुळे इन्फेक्शन होतं. वरचेवर लूज मोशन्स होऊ लागतात. हे इन्फेक्शन वाढलं, तर यापैकी एखादा फुगा फुटून त्याभोवता पस तयार होतो. मग, या पेशंटवर ऑपरेशन करावं लागतं.

दुसऱ्या प्रकारात अशाच प्रकारे वरचेवर नॉनव्हेज खाल्ल्याने मोठ्या आतडीत पॉलिप (मशरुमसारख्या गाठी) तयार होतात. त्यातून रक्तस्त्राव होतो. शौचावाटे रक्त बाहेर पडतं. हे पॉलिप्स आत राहिले, तर त्याचं रुपांतर कॅन्सरमध्ये होण्याची भीती असते. त्याला कोलानिक पॉलिप्स म्हणतात.

काही वेळा मोठ्या आतडीचा कॅन्सर अनुवांशिक असतो. कुटुंबातल्या कुणाला जर हा कॅन्सर असेल, तर त्यांच्या मुलांनी वेळीच चेकअप करून घ्यावं. त्यासाठी शक्यतो वयाच्या चाळीशीनंतर कोलनोस्कोपी करावी.

लक्षणं :

>
मध्येच बद्धकोष्ठता तर मध्येच लूज मोशन्स असा त्रास वारंवार होत राहतो.

>
शौचावाटे रक्त पडतं.

>
मळाचा रंग काळा दिसू लागतो.

>
कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होऊ लागतं.

ही लक्षणं आढळून आल्यास वेळीच डॉक्टरकडे जाऊन कोलानोस्कोपी करून घ्यावी.

स्वादुपिंडाचा कॅन्सर

स्वादुपिंडाचा कॅन्सर हा सर्वात खतरनाक कॅन्सर. हा कॅन्सर होण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण ज्यांना तंबाखू, दारु, धुम्रपानाची सवय आहे तसंच जे लोक कॉफी भरपूर पितात त्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. स्वादुपिंडाचा कॅन्सर वाढेपर्यंत लक्षात येत नाही. त्यासाठी एण्डोस्कोपी सोनोग्राफी केली जाते. या कॅन्सरचं निदान लवकर झालं, तर त्यावर लवकर उपाय सुरू करता येतात. ७५ टक्के पेशंटमध्ये या कॅन्सरचं निदान लवकर होत नाही आणि मग इलाज अशक्य होतो.

>
वरचेवर पोट फुगतं.

>
पोट आणि पाठदुखी.

>
कोणत्याही विशेष कारणाशिवाय वजन कमी होतं.

लिव्हर कॅन्सर

लिव्हर कॅन्सरला हिपॅटोमा असंही म्हणतात. हेपिटायटीस 'सी'ला कारण ठरणाऱ्या व्हायरसमुळे हा होण्याची शक्यता असते. या कॅन्सरचं प्रमाण तसं कमी प्रमाणात आढळते. खूप दारु पिण्याची सवय असलेल्यांना हिपॅटोमा होऊ शकतो. कॅन्सर झालेला तेवढाच भाग काढून टाकता येतो. जर तो अधिक वाढलेला असेल तर त्यावर एम्बोलायझेशनची ट्रीटमेण्ट करतात.

असा टाळा कॅन्सर :

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी खाण्यापिण्याची पथ्यं पाळली पाहिजेत. आहारातलं नॉनव्हेजचं प्रमाण कमी करून त्याऐवजी भरपूर भाज्या आणि फळांचा समावेश करावा. कॅन्सरचा धोका ओळखण्यासाठी वर दिलेली लक्षणं वारंवार आढळून येत असल्यास वेळीच डॉक्टरकडे जाऊन चेकअप करणं महत्त्वाचं. कॅन्सरचं निदान लवकर झाल्यास त्यावर उपाय करणं शक्य होतं हे पेशंटने लक्षात ठेवलं पाहिजे.

अॅसिडिटीपासून सावधान

आताच्या बऱ्याच तरुण-तरुणींना पोटाशी संबंधित अनेक तक्रारी जाणवतात. केवळ कॉलेजियन्सच नव्हे तर नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणं अशा तक्रारी असतात. अॅसिडिटीचा त्रास अनेकांना रोज जाणवतो. बऱ्याचदा त्यावर थातुरमातुर उपाय करून वेळ मारुन नेली जाते. रोजच्या धावपळीत त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. परंतु अॅसिडिटीने कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला आमंत्रण मिळू शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive