सत्तरीच्या दशकात पाहिलेले कोकण रेल्वेचे स्वप्न १९९८ साली प्रत्यक्षात साकार झाले, तेव्हा निसर्गाच्या दडपून टाकणाऱ्या आव्हानांवर मात करणाऱ्या द
ुर्दम्य मानवी निर्धाराचा हा वस्तुपाठ मानला गेला होता. कोकण रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड या १९९० साली स्थापन झालेल्या कंपनीच्या माध्यमातून ई. श्ाीधरन यांनी कोकणातील डोंगर-दऱ्या, नद्या पार करीत कर्नाटक-केरळपर्यंत रेल्वेचा पर्यायी मार्ग केवळ आठ वर्षांत वास्तवात आणला, तेव्हा हा अभियांत्रिकी चमत्कारच ठरला होता. पुढच्या १२ वर्षांत प्रवासी आणि मालवाहतूक अशा दोन्ही क्षेत्रांत कोकण रेल्वेने भरीव कामगिरी करून दाखविली आहे. महाराष्ट्रातील कोकणी जनतेला तर हा प्रवास इतका भावला आहे की या मार्गावर अधिक गाड्या केवळ कोकणी जनतेची गरज भागविण्यासाठी सुरू करायला हव्यात, या मागणीसाठी आंदोलनेही होऊ लागली आहेत. कोकण रेल्वेची गरज अधोरेखित करणारीच ही घटना आहे. मात्र निसर्गाच्या रचनेत अवाजवी हस्तक्षेप झाल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम हे सोसावेच लागतात, याचा प्रत्यय कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून दर पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात येत होता; परंतु यावषीर् रत्नागिरीजवळच्या निवसर स्थानकाच्या परिसरात माती खचण्याच्या प्रकाराचे स्वरूप पाहता, 'अभियांत्रिकी चमत्कारा'पुढे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. प्रकल्पाच्या राबवणुकीत दरडी कोसळण्यासारख्या धोके गृहीत धरून, त्यांचे प्रमाण आणि तीव्रता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना योजल्या गेल्या. मात्र जमीन खचण्याचे प्रकार निवसरप्रमाणे नियंत्रणाबाहेर जातील आणि अरिष्टाचे स्वरूप घेतील, याची कल्पना कोकण रेल्वेची आखणी करणाऱ्या तज्ज्ञांना आलेली नसावी. कोकण रेल्वेच्या सुमारे साडेसातशे कि. मी. मार्गापैकी सुमारे सव्वादोनशे कि. मी.च्या मार्गावर दरडी कोसळणे, माती खचणे यासारखे धोके कायम उद्भवू शकतात. हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. शिवाय येथील मातीचे स्वरूप हे पाणी धरून ठेवणारे नाही. यात भर पडते ती मुसळधार पावसाची. येथे ताशी ८० मिमीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जमिनीची अधिक प्रमाणात धूप होते. माती वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे दरडी कोसळतात. दरडी कोसळून मार्ग बंद होण्याचे प्रकार पावसाळ्यात कोकण रेल्वे प्रशासनाच्या अंगवळणी पडले असले, तरी सन २००३ साली बोगद्याच्या तोंडावरच प्रवासी गाडीवर वैभववाडी स्थानकाजवळ दरड कोसळली आणि ५०वर प्रवाशांचे बळी गेले, तेव्हा पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास हा जीवावर उठणारा ठरू शकतो, याची सर्वांनाच तीव्रतेने जाणीव झाली. पुढच्याच वषीर् रेल्वेमार्गावरील दरडीला मत्स्यगंधा एक्सप्रेसने धडक दिली. त्यात दहा प्रवासी ठार झाले. त्यानंतर रेल्वेमार्गालगतच्या डांेंगराला जाळ्या लावण्याची उपाययोजना करण्यात आली. शिवाय विशिष्ट प्रकारचे गवत डोंगरउतारावर लावून मातीची धूप रोखण्याचा पर्यायाचीही तीन वर्षांपूवीर् घोषणा करण्यात आली होती. मात्र रेल्वेमार्गाखालील माती वाहून गेल्यामुळे, वाहतूक बंद करावी लागण्याच्या प्रकारांवर तात्पुरती उपाययोजनाच शक्य आहे. विशिष्ट जागी भर घातल्यानंतर भविष्यात तेवढा भाग वाहतुकीस सुरक्षित होईल, हे गृहीत निवसर रेल्वे स्थानकाच्या परिसरापुरते तरी खोटे ठरले आहे. सन २००५पासून अनेकदा या मार्गाखालील जमीन तीन ते चार फुटांनी खचली आहे आणि खडी तसेच काँक्रीटीकरण करून मार्ग वारंवार वाहतूकयोग्य करण्याची पाळी कोकण रेल्वेवर आली आहे. त्याला या परिसराची भौगोलिक रचना कारणीभूत आहे आणि गावकऱ्यांनी त्याची कल्पना देऊनही कोकण रेल्वेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. हे स्थानक ज्या जमिनीवर बांधण्यात आले, त्या जागी नैसगिर्क ओहोळ होता. हा ओहोळ नदीला जाऊन मिळत असे. या प्रवाहावर माती टाकून स्थानक बांधण्यात आले, असे गावकरी सांगतात. डोंगराकडून नदीला जाणारा पाण्याचा हा मार्ग बंद केल्याचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस झाल्यावर, जमिनीखालून पाण्याचा प्रवाह मार्ग शोधतो आणि माती वाहून गेल्यामुळे स्थानक तसेच रेल्वेमार्ग खचतो, या त्यांच्या निरीक्षणात प्रथमदर्शनी तरी तथ्य दिसते. याची अभियंत्यांनी दखल घेतली नाही की समस्येच्या तांत्रिक कारणाविषयीचे त्यांचे मूल्यमापन व त्या अनुषंगाने त्यांनी केलेली उपाययोजना परिणामकारक ठरली नाही, हे कळायला मार्ग नाही; कारण आपल्या देशात पारदर्शकपणे लोकांना विश्वासात घेण्याची पद्धत नाही आणि ते आपले कर्तव्य आहे, ही जाणीव तर त्याहूनही नाही. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक तात्पुरती बंद करावी लागली असली आणि हजारो प्रवाशांना त्यामुळे हालअपेष्टा भोगाव्या लागल्या असल्या, तरी कोकण रेल्वेने या समस्येवरील दीर्घकालीन उपाययोजनेविषयी अजून तरी जनतेला विश्वासात घेतलेले नाही. यावषीर् दहा ते १२ फुटांनी रेल्वे स्थानकासह बाजूच्या परिसरातील रूळाखालील जमीन खचल्याची वृत्ते पाहता, वरवरच्या उपायांनी हा परिसर रेल्वेवाहतुकीसाठी सुरक्षित करता येईल काय, याविषयीच शंका निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment