Monday, July 26, 2010

पावलो पंढरी, वैकुंठभुवन!


पावलो पंढरी, वैकुंठभुवन!

एकनाथमहाराजांनी ' माझे माहेर पंढरी ' अशी पंढरपूरची अगदी आगळी-वेगळी ओळख करुन दिली. तीच ओळख मग इतर संतमंडळींनीदेखील त्याच आपुलकीने सतत करुन दिली. पैठणपेक्षा देहूहून पंढरपूर तसे अधिक जवळ! पण तुकोबांनाही पंढरपूरच्या माहेराचीच ओढ होती. कधी निमित्त मिळते आणि माहेरी जाता येते ह्याची ' आस ' तुकोबांना सदान्कदा लागलेली असे. असेच एकदा वारीच्या निमित्ताने तुकोबा पंढरपुरी येऊन पोहोचले. विठुरायाला भेटले आणि पुन्हा एकदा कृतार्थतेची अनुभूती घेते झाले. तिथे भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागले- पावलों पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा॥ पावलों पंढरी आनंदगजरें। वाजतील तुरे शंख भेटी॥ पावलों पंढरी क्षेम आलिंगनी। संत या सज्जनीं निवविलें॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा। भेटला हा सखा मायबाप॥ पावलों पंढरी येरझार खुंटली। माउली वोळली प्रेमपान्हा॥ पावलों पंढरी आपुलें माहेर। नाहीं संवसार तुका ह्मणे॥ माझ्यासाठी आजचा दिवस अगदी सोन्याचाच आहे. कारण ह्या पंढरपुरात म्हणजेच ह्या भूवैकुंठाला मी येऊन पोहोचलो आहे. शंख , भेरी , तुतारी अशा नाना वाद्यांचा गजराने दुमदुमलेल्या आनंदी वातावरणाने मी अगदी धन्य झालो आहे. माझा आनंद द्विगुणित झाला आहे. ह्या पंढरीत आल्या आल्या नाना संतमंडळींनी प्रेमभराने मला आलिंगन दिले. आम्ही उभ्या-उभ्या एकमेकांना उरा-उरी भेटलो. त्यामुळे माझा प्रवासाचा शीण नाहीसा झाला आहे. ताजातवाना होऊन मंदिरात गेलो. तर तिथे माझा सखा , माझा मायबाप मला भेटला. त्या सुखाचे वर्णन करता येणार नाही. ते माझे सुख शब्दातीत आहे. ' शब्दांच्या पलिकडले ' आहे. पंढरीत आल्याचा फायदा काय झाला म्हणून सांगू! येथे आल्याने माझ्या जन्म-मृत्यूच्या येरझारा चुकल्या आहेत. माझ्या विठाईने मला प्रेमाचा पान्हा दिला आहे. पंढरी हे आम्हा सर्वांचेच माहेर आहे. आता पुन्हा संसार करण्याचा प्रश्नच येत नाही.

 

माझे अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतो ,'' नाहीं त्रिभुवनीं सुख या समान। म्हणऊनि मन स्थिरावलें॥ धरियेलीं जीवीं पाऊलें कोवळीं। कंठीं एकावलीं नाममाळा॥ शीतल होऊनिं पावलों विश्रांती। न साहें पुढती चाली चित्ता॥ तुका म्हणे झाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें॥ ह्या विठ्ठलाच्या चरणीं जे सुख आहे तसे सुख त्रिभुवनात हिंडलात तरी सापडणार नाही. माझें मन त्याच्या चरणांवर स्थिर झाले आहे. आता माझ्या जीवनाचे सारसर्वस्व श्रीहरीचे हे कोमल चरण आहेत. मी माझ्या गळयामध्ये त्याच्याच नावाची माळ घातली आहे. त्यामुळे त्रिविध तापातून , संसाराच्या व्यापा-तापातून मी मुक्त झालो आहे. एक अनिर्वचनीय शांती मी अनुभवीत आहे. आता माझ्या मनाला इतर कुठलीच चिंता उरलेली नाही. राग , लोभ , द्वेष , मत्सर , दंभ , मोह ह्या साऱ्यांपासून ते दूर गेले आहे , मुक्त झाले आहे. माझ्या सगळया इच्छा पांडुरंगाने पूर्ण केल्या असल्यामुळेच हा सुखसोहळा मी अनुभवू शकलो ह्याची मला जाणीव आहे. त्याने मनावर घेऊन हे केले नसते तर मी ह्या सुखाचा धनी झालो नसतो. हे झाले तुकोबांचे स्वानुभवाचे बोल! पण तुकोबांना तुमची-आमचीही काळजी आहे. तुकोबा सांगतात , आषाढी निकट। आला कार्तिकीचा हाट॥ पुरे दोन्हीच बाजार। न लगे आणिक व्यापार॥ आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने जो यात्रारुपी बाजार भरतो , त्या दोन बाजारांना वारकऱ्यांनी जावे. इतर ' व्यापार ' करण्याची गरज नाही. तिथे हरिनामाची ' देव-घेव ' करावी. मोक्षसुखाच्या राशी तिथे मिळतात. तिथे सारेजण केवळ विठोबालाच ओळखतात.

 

ह्या वारीवरुन आठवण होते ती सखारामबुवांची! खानदेशात जन्मलेल्या सखाराममहाराजांना साक्षात्कारी संत म्हणूनच ओळखले जाते. वारकरी संप्रदायात त्यांचे नाव आजही मानाने घेतले जाते. काही सांसारिक अडीअडचणींनी कंटाळून महाराजांनी घर सोडले आणि घराजवळच एक झोपडी बांधून पत्नीसह राहू लागले. पुढे त्यांना मुलगा झाला. पण काही काळाने तो मुलगा आणि पत्नी दोघेही निधन पावले. मुळचेच वैराग्याकडे असलेल्या त्यांच्या वृत्तीने पुन्हा उचल खाल्ली. ते विठ्ठलाची वारी नेमाने करीत. विशेष म्हणजे दरवेळी वारीला जाण्यासाठी निघताना ते आपल्या झोपडीतील सर्व चीज-वस्तू गोरगरीबांना घेऊन जाण्यास सांगत , आणि मग स्वतःच ती झोपडी पेटवून टाकत. देवाकडे जाताना देवाच्या भक्तीत पाठीमागे आपल्या संसाराची काळजी कशाला करायची ? आपली काळजी देवाला आहे अशी त्यांची श्रध्दा होती. एका वारीच्या वेळी गोदावरीला महापूर आला होता. पण नेमान खंड कसा पडू द्यायचा ? सखाराम महाराजांनी त्या पुरातून पोहत जाऊन पंढरपूर गाठले. महाराज स्वतः अतिशय सुंदर कीर्तन करीत. दुसऱ्या बाजीरावाला त्यांच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले होते , असे नमूद आहे. महाराजांनी अनेक अखंड नामसप्ताह केले. अगणितवेळा अन्नदान केले. त्यांच्या पश्चात् त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या झोपडीच्या जागी फार मोठे विठ्ठल मंदिर बांधले. पंढरपुरातही त्यांचा एक मठ आहे. अजून आठ वर्षांनी सखाराम महाराजांची दोनशेवी पुण्यतिथी येणार आहे.

 

उद्या आषाढी एकादशी आहे. मनाने आपण आजपासूनच पंढरपुरात आहोत. विशेष म्हणजे आज आपल्याबरोबर तुकोबांबरोबर सखाराममहाराज अमळनेरकरही आहेत.

जय हरि विठ्ठल!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive