Saturday, July 3, 2010

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु-

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु-

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु | मी म्हणें गोपाळु आला गे माये |
चांचरती चांचरती बाहेरी निघालें | टकचि मी ठेलें काय करूं || ||
मज करा कां उपचारू अधिक तापभारु | सखिये सारंगधरू भेटवा कां || धृ. ||
तो सावळा सुंदरु कासे पीतांबरु | लावण्य मनोहरु देखियेला |
भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी | तंव कोठे वनमाळी गेला गे माये || ||
बोधुनी ठेलें मन तंव जालें आन | सोकोनी घेतले प्राण माझे गे माये |
बापरुखमादेविवरु विठ्ठल सुखाचा | तेणें कायामनेंवाचा वेधियेलें || २७५. ||

सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, आपल्या भगिनी श्रीसंत मुक्ताबाई महाराज यांना, आतुन ज्ञानोत्तर-प्रेमाचा अनिवार गहिवर येऊन, श्रीभगवंताचे एक अप्रतिम सुंदर, मनवेधक वर्णन करत आहेत.

श्रीमाउली म्हणतात,

मुक्ताई माये ! अचानकच,अवचितच सुंदर,मोहक,दिव्य अशा सुगंधाची झुळुक आली.ह्या नित्य परिचयाच्या चंदन,तुलसी,केशर,कस्तुरीचा भास देणार्यापरिमळामूळे मी जाणले,की ते श्रीभगवंतच कृपाळू होऊन आलेले आहेत.

अनिवार आनंदाने,अत:करणात सात्विकतेचा पूर येऊन,चाचरी मुद्रा होऊन दृष्टीशी-जाणीव तदाकार झाली आणि ही जाणीव चांचरत-चांचरत श्रीभगवंताना बघू गेली,अन काय सांगू सगळ्या जाणिवाच लोभावून त्या रुपात दृष्टीद्वारे स्थिर झाल्या.
श्रीभगवंत समोर असूनही विरहतापाने सर्वांग पोळू लागले,हृदय भेटीसाठी तडफ़डू लागले, ' कूणीतरी तो शारंगधर मला भेटवा हो ! '
हृदय असे आक्रंदत असतानच परत जाणीव त्या सावळ्या सुंदर,लावण्यमनोहर अशा, पीतांबर नेसलेल्या श्रीस बघू लागली.
सगळ्या जाणिवा एकवटून जेव्हा ते अनुपम रुप दृष्टी अनुभवत होती, तेव्हाच अचानक ते वनमाळी कोठे गेले तेच कळेना.

त्यांच्याशी मन तदाकार होऊन स्थिर झाले आहे, तोच त्या अद्वयबोधासहित ते वेगळे होऊन परत विरह अनभवू लागले.माझे सर्व प्राणच जणू त्यांनी शोषून घेतले.

माये तुला कसे सांगू ! श्रीसद्गुरुकृपेने श्री भगवती उर्ध्व होऊन, जीवासकट सुषुम्नेत प्रवेशल्यामूळेच सुखस्वरूप अशा श्रीभगवंताचा अनुभव सहज आला.आता तर त्यांनी माझे कायावाचामन संपूर्णच वेधून घेतले आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive