Saturday, July 3, 2010

हाचि नेम आता न फिरे माघारी|

तुकोबा म्हणतात,

हाचि नेम आता फिरे माघारी| बैसले शेजारी गोविंदाचे||
घररिघी जाले पट्टराणी बळे| वरिले सांवळे परब्रम्ह||
बळीयाचा अंगसंग जाला आता| नाही भय चिंता तुका म्हणे||

आता मी गोविंदाच्या संगाची आस मनात धरली आहे, तेव्हां परत मागे फिरणे नाही. एकदा कृष्णाच्या प्राप्तीची ओढ लागली की तिचा विसर पडू देणे हाच माझा नेम. हेच माझे कर्तव्य.
ज्याच्या घरात येऊन मी बळेच पट्टराणी झालेय, त्या सावळ्या परब्रम्हांला मी माझे सर्वस्व मानून बसले आहे.
हा बळाचाच संग झाला खरा, पण त्याने माझे भय, चिंता पूर्ण दूर झाल्या आहेत.

नीट पाहील्यांस तुकोबांनी इथे परमार्थ सुरू केल्यापासून पुढच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. बळियाचा अंगसंग म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय. परमार्थाची सुरूवात आपसूक होत नाही. माया, मोहपाश आणि षडरिपू प्रत्येक पावलावर आपल्याला मागे ओढण्यासाठी तयार असतात. हे "बळ" जे सांगितले आहे ते त्यांच्याविरुद्धचे बळ. गोविंदाविरुद्ध नाही.
असे त्या पुरूषोत्तमाला जेव्हा आपण आपले सर्वस्व बनवण्याचा नेम धरतो, तेव्हांच आपले संसारभय, चिंता दूर होतात.


*************

भेटीलागी जीवा या विरहिणीमध्ये ही विरहयातना किती तीव्र आहे हे समजावून सांगताना तुकोबा हा दृष्टांत देतात. पूर्वी सासरी असलेल्या मुलीची आईवडीलांशी भेट महिनोन् महीने होत नसे. तेव्हां दिवाळीचे (भाऊबीजेचे) निमित्त साधून भाऊ तिच्या घरी येऊन तिला माहेरी घेऊन जायचा. दिवाळीची दिवस येऊ लागले की त्या सासुरवाशिणीचा जीव कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येईल आणि कधी मला माहेरी घेऊन जाईल. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली आहे. की हा मृत्युलोक, संसार सोडून कधी एकदा माझा विठू मला माझ्या हक्काच्या घरी घेऊन जाईल आणि कधी मला माऊलीची भेट घडेल. तिकडेच माझे डोळे लागून राहीले आहेत ...

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive