Friday, July 30, 2010

राशी आणि स्वभाव

राशी आणि स्वभाव

 

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची 'धनु'रास आहे.

म्हणजे आधी मला पटत नव्हत. पण माझ्या सुरवातीच्या कंपनीचा बॉस देखील धनु राशीचा होता. आणि तो देखील असाच. कधीच कोणाबरोबर जुळवून घेणे नाही. आपल मत कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. असो पण तिघेही स्वभावाने चांगले आहे. फ़क़्त तो 'हट्टी' स्वभाव नडतो. आणि कधीही बोलायला जा तुम्ही जेवढा प्रश्न विचाराल तेव्हढंच उत्तर. म्हणजे कमी बोलतात अस नाही. माझी एक मैत्रीण देखील अशीच आहे. तिचीही धनु. माझा जिवलग मित्र खूप चांगला आहे. त्याची वृषभ रास आहे. माझा दुसरा मित्र त्याचीही वृषभ रास. दोघेही खूप लवकर नाराज होणारे आणि खूप मोठा काळ गायब असणारे आहेत. मध्येच उगवतात. आणि मैत्रीच्या आणाभाका घेतात. आणि मग मध्येच कुठे माशी शिंकते कुणास ठाऊक, आणि पुन्हा गायब.

आमचे बंधुराज 'मेष' राशीचे आहेत. खुपंच अत्यल्प बोलतात. म्हणजे दिर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देणारे. पण माझ सगळ ऐकतो. म्हणजे एवढे की आत्तापर्यंत मी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीला 'नाही' शब्द काढलेला नाही. माझी जुन्या कंपनीतील मैत्रीण देखील मेष राशीचीच. असो, ती देखील छान आहे. खूप प्रेमळ आहे. माझ्या जुन्या कंपनीचा बॉस. त्याची वृश्चिक रास आहे. त्याचा स्वभाव म्हणजे खुपंच चांगला आहे. पण, माझ्या कामाचे श्रेय माझ्या सिनिअरला द्यायचा. माझी एक मैत्रीण देखील याच राशीची. एकदा मी तिला मला तुझ्याबद्दल स्वप्न पडलं अस बोलता बोलता म्हणल, तर तिने माझ्या सोबत बोलायचंच बंद केल. आणखीन एक होती. तिला एकदा तुझ आडनाव काय असा प्रश्न केला, तर तिने डायरेक्ट मी तुझ्या जातीची नाही अस म्हणाली. बहुतेक सगळे वृश्चिक राशीचे कोणत्याही गोष्टीचा 'निकाल' झटपट लावतात. माझ आणि वृश्चिक राशीच्या कोणाशीही कधी भांडण वगैरे झालं नाही. पण, त्यांच्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत.

माझे आई वडील. दोघांची मिथुन रास. दोघांना बघून एवढंच सांगतो. सर्वात सुंदर रास आहे. मी संगणकाचा कोर्स करत असतांना याच राशीच्या माझ्या एक शिक्षिका होत्या. त्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा. आणि नेहमी मला प्रमोट करायच्या. खर बोलायचं झालं तर मला त्या 'मैत्रीण' वाटायच्या. कधी शिक्षिकेचा 'दबाव' वाटलाच नाही. 'ती' ची तुळरास. तिला बघून तुळच का म्हणतात ते समजलो. तिचा स्वभाव खूप मानी. कधीच भेदभाव नाही. पण खुपंच सरळ स्वभाव. आणि स्पष्टपणा. जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून मोकळी. मला जेवढे 'तुळ' राशीवाले भेटले. ते सगळेच खूप छान. माझी जुन्या कंपनीतील एक सहकारी देखील तुळ राशीची. रोज आमचे खूप लहान लहान विषयावरून भांडण व्हायचे. मग आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो नाही. पण ते फार फार दहा मिनिट. मग एकतर ती नाही तर मी काहीही फालतू विषयावरून बोलायला सुरवात करायचो. मग भांडण होत की नव्हत अस होऊन जायचं. माझी कोकणातील बहिण देखील तुळ राशीची आहे. माझी बहीणाबाई. तिची आणि माझी एकच रास. माझी सर्वात जवळची मैत्रीण देखील कर्क राशीची. माझी बहिणाबाई, आणि माझी मैत्रीण खुपंच 'संवेदनशील'. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप मनाला लावून घेणारे. कोणताही विचार डोक्यापेक्षा जास्त मनाने करणारे. आणि मनाविरुद्ध घडल की 'रडत' बसणारे. खूप लवकर विश्वास टाकणारे. आता हा स्वभाव चांगला आहे. पण याच स्वभावमुळे अनेकवेळा स्वतःच  दुःखाचे प्रसंग ओढवून घेतात.

श्रीरामाची देखील 'कर्क' राशीचा होता. चुकून कधी 'धनु' राशीचा असता तर झालं. रामायण वेगळंच झालं असत. असो, राशी आणि स्वभाव यात खूप मोठा संबंध आहे.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive