Monday, July 26, 2010

दुरितांचे तिमिर जावो...


दुरितांचे तिमिर जावो...

सुमारे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. 'दुरितांचे तिमिर जावो' हीच यामागची मुख्य भावना असावी. अज्ञानाच्या तिमिरात चाचपडणा-या जनसमुदायासाठी माऊलींनी ही ज्ञानाची ज्योत पेटवली. 

ज्ञान माणसाला सक्षम करते. भक्ती भाबडं करते. पंढरीची वारी हा ज्ञान आणि भाबडेपणा यांचा सुंदर मिलाफ आहे. काल विसाव्याजवळ फलटणच्या एका शेतकऱ्याशी गप्पा निघाल्या. एकूणच शेतीत राम राहिला नाही, असा शेतकरी दादांचा सूर होता. बोलता बोलता विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर गेला. ते पटकन म्हणून गेले, 'आत्महत्या करणाऱ्यातला एकही वारकरी नाही.' कष्ट सगळ्यांनाच आहेत पण ज्ञानेश्वरीचे ज्ञान आणि विठ्ठलाच्या चरणी असलेला भाबडेपणा झुंजायचे बळ देतो. 

सध्या एकूणच आपल्या देशात बाबागिरी आणि बुवाबाजीचा कळस होत चाललेला आहे. यातले सगळेच भोंदू आहेत असे नाही. पण, 'तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचा त्राता होतो. तुम्ही मला देवा माना' असे सांगणारे विष्णूचे, शंकराचे, दत्ताचे, साईबाबांचे अवतार खूप सोकावलेयत. ते बळ देत नाहीत. अशी अफूची गोळी देतात की जी आपल्याला जास्त दुबळे करते. वारकऱ्यांचा भक्तिभाव तसा नाही. ज्ञानेश्वर त्यांची माऊली आहेत. आपल्या सगळ्या दु:खांचा भार माऊलीवर टाकून तो मोकळा होत नाही. आपली लढाई लढून विसाव्यासाठी तो आपल्या आईच्या पदराखाली येतो. 

ज्ञानेश्वरी सातशे वर्षापूवीर्ची आहे. पण आज शहरांमध्ये पाच आकडी पगार घेऊन कुठल्यातरी बाबाचे पाय चेपायला धावणाऱ्या आम्हाला तिचा गंध नाही. हे म्हणजे घराच्या परसात सोन्याचे हंडे ठेवलेयत आणि आम्ही शेजारच्या पाड्यात भीक मागत फिरतोय. मजल दरमजल करत वारी पुढे सरकते. वारी शहाणपण देते आणि तरीही भाबडेपणा टिकवून ठेवते. माऊलींची लेकरं लहान मुलांच्या उत्साहाने फुगड्या खेळतात. दहिहंड्या रचतात. रिंगण धरतात. ज्ञानातून येणारा अहंकार इथे गळून पडतो आणि अज्ञानातून येणारी लाचारीही उरत नाही. 

ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याआधी आपल्या हातातली काठी बाहेरच मातीत रोवली. पुढे त्या काठीला पालवी फुटली. आज सातशे वर्षांनंतरही त्याठिकाणी माऊलींचा तो अजाण वृक्ष उभा आहे. माऊलींकडून मिळवलेले ज्ञानाचे कण वारकरी प्राणपणाने जपतो. म्हणूनच तो आयुष्यात एक तरी झाड लावतो. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी भित्रेपणाची, परावलंबाची, अंधविश्वासाची विषवेल लावायची की माऊलींकडून मिळालेल्या ज्ञानाचे कण पेरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. माझा निर्णय झालेला आहे. 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive