Wednesday, July 28, 2010

एक त्रस्त मुंबईकर

२६ जुलै २०१० 

मा. श्री उद्धव ठाकरे यांस

२७ जुलै रोजी आपला पन्नासावा वाढदिवस आहे याचे फ्लेक्स गेले आठवडाभर साऱ्या शहरात झळकत असल्याचे खच्च भरलेल्या बसमधून, लोकलमधून जाताना दिसत होते. अगदी पाणी तुंबल्यामुळे पायपीट करावी लागली तेव्हाही हे बॅनर्सच डोळ्यात भरत होते

सध्याचा जमाना असे फलक लावून आपण नेते असल्याचे दाखवण्याचा आहे. दोन-पाचशे रूपयांत हल्ली कोणत्या तरी गल्लीतला कार्यकर्ता कार्यसम्राट होतो. निदान या फलकावर तरी. आपण तर मुंबईचे राजे. आपले सरदार, मावळे यांनी निष्ठा दाखवण्यासाठी असे फलक लावले तर गैर काय! प्रेमापाटी करतात ते सारे

पण माझ्यासारखा सामान्य मुंबईकर मात्र सध्या नाराज आहे, कावला आहे. दररोजच्या हालअपेष्टांत भरच पडत आहे. रोज रिक्षा, बसचा प्रवास म्हणजे नरकयातना ठरल्या आहेत. पाऊस हवासा वाटतो, पण पावसामुळे पडणाऱ्या खड्डयांतून प्रवास करताना पाठ, मान मोडून पडते. ताठ मानेने जगा असे सगळे सांगतात, पण येथे आमच्यासारख्या सामान्यांना ते शक्य नाही

आपण म्हणाल, या खड्ड्यांचा आणि माझा संबंध काय आहे? बएमीसी, एमएमआरडीए वगैरेंकडे तक्रार करा. काही अंशी हे खरे आहे, कारण आपलेच, आमच्या भागातील मावळे अभिमानाने सांगतात की आपण नेहमी हीलिकॉप्टरमधून आणि विमानातून प्रवास करता. आपण खड्डे असलेले रस्ते, गाळाने भरलेले नाले यांचे फोटोही काढले आहेत म्हणे. याचा अर्थ आपणास आमच्यासारख्या सामान्य मुंबईकरांबद्दल अपार कणव आहे आणि आमच्या समस्यांची जाणीवही आपणास आहे. राजाकडून प्रजेच्या याच अपेक्षा असतात. राज्यात काय चालले आहे याची राजाला पूर्ण कल्पना असायला हवी

आपल्या संघटनेचा जन्म झाला तेव्हपासून या नगरीवर आपले राज्य आहे. आवाज कुणाचा या प्रश्नाचे उत्तर गेली ४३ वर्षे एकच आहे. आता तर महापालिकेत बसून आपले शतकी सरदार ही नगरी चालवतात. आपले त्यांच्यावर पूर्ण लक्ष असणार यात शंका नाही. तरीही हे खड्डे का पडतात? पदपथावर गटारांची झाकणे नीट लावलेली नसतात किंवा फुटकी असतात. साधे पेव्हर ब्लॉक्स आपल्या सरदारांना लावता येत नाहीत. मग ते नेमक काय काम करतात? आपण त्यांच्यावर करडी नजर ठेवत नाही असे दिसते. कदाचित आपला मवाळ स्वभाव हे कारण असावे

आपण आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्याची बरीच खटपट करत असता. बरीच पायपीट करता. पण आमच्यासारख्या सामान्यांना वाटते की पत्ते पिसायची वेळ आली आहे. जुने सरदार वगळा आणि नव्या दमाच्या लढवय्या मावळ्यांना संधी द्या. आपल्या सरदारांनी ठिकठिकाणी स्वत:चे सुभे निर्माण केले आहेत. अनेक ठिकाणी तर ते गनिमाशी उघड हातमिळवणी करतात असे दिसते आहे. उत्तर पेशवाईत असेच झाले होते असे म्हणतात. तसे होणे नेहमीच राजाला आणि राज्याला धोकादायक असते असे इतिहास सांगतो

आपले या नगरीवरील राज्य टिकते की जाते याचा फैसला आणखी दीड वर्षांनी होणार आहे.आपले राज्य गेले तर आपला आवाजही जाईल असे आता म्हटले जाते आहे

आपल्या वाढदिवशी शुभेच्छा देताना हे लिहीत आहे याच्या मनाला वेदना होत आहेत, पण राजाला वेळीच सावध करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्ही तर आपले जुने प्रजानन. आपल्या पिताश्रींच्या आश्रयाखाली वाढलेलो. ज्यांच्या जिभेला तलवारीची धार होती. आजही त्यांचे दर्शन घडले तरी भूतकाळ आठवतो

तेव्हा आपण सामान्य जनांच्या सामान्य समस्यांना हात घालाल आणि आमचे उर्वरित दिवस खड्ड्यांविना जावेत अशी प्रार्थना करतो. आपण आम्हाला असे रस्ते भेट दिलेत, तर आम्ही तुम्हाला निवडणुकीत विजयाची भेट देऊ शकतो. नाहीतर 'राजा' बदलायचा विचार आम्हाला नाईलाजानं करावा लागेल

आजच्या दिवसाला आम्हा गरीब मुंबईकरांच्या मनात वेगळे स्थान आहे. या दिवसाची आठवणही थरकाप उडवते. पाच वर्षांपूर्वी आम्ही बुडता बुडता वाचलो होतो. आपल्या राज्यात ती वेळ पुन्हा येवो यासाठी आपण शथीर्ने प्रयत्न करावेत ही विनंती

कळावे

आपला 
एक त्रस्त मुंबईकर 




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive