कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! 'जे होते ते चांगल्यासाठीच होते'. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो.
गावी असतांना एक मुलगी आवडली. पण ती अचानक एका दिवशी गायब झाली. वर्षानंतर कळल ती बी. एड साठी पुण्यात आली. मी मुर्खासारखा तिची वाट पहात बसलो. पुण्यात आलो तर तिचे कॉलेज कुठे आहे ते कळल पण बी.एड सुद्धा एकाच वर्षाचे असते हे देखील कळले. नंतर मी इकडे पुण्यात आणि ती गावी. मग असाच दीड वर्ष रडत बसलेलो. नंतर तिच्यासारखीच एक आवडली. पण तिने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केले. झाल! मग पुन्हा दुख: मग माझ्या जुन्या कंपनीतील एक मैत्रीण छान वाटायची. पण तिला माझ्यात रसच नव्हता. या कंपनीत आलो तर 'परी'. पण तिलाही खूप 'भाऊ'. सोडा! एकूणच वाळवंटात असल्याप्रमाणे! प्रेमाच्या पाण्याचा शोध. पण सगळे मृगजळ! नुसतीच धावाधाव!
पण माझ्या कंपनीतील ती 'अप्सरा'. काय सांगू तिच्या बद्दल. अजूनही माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही आहे. किती छान आहे. ते डोळे, तो चेहरा, ते रूप ती काया! मला खर ना! तिला पहिल्यापासून दुसर काहीच सुचत नाही आहे. काय करू आणि काय नको अस होते आहे. ती माझ्याच फ्लोरवर बसते. आणि माझ्या डेस्कच्या जवळच तिचाही डेस्क आहे. ती ज्यावेळी समोर येते त्यावेळी माझी हिम्मतच होत नाही तिच्याशी बोलायची. पण हृदयाचे इतके ठोके जोरजोरात होतात ना की, जर कधी मी हृदय विकाराने गेलो आणि बारावा तेरावाला जर कावळा शिवला नाही तर 'अप्सरा अप्सरा' म्हणायला सांगा गुरुजींना. ती खूप छान आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाची मी इतकी माहिती काढली. तिचे घर, मोबाईल नंबर, याआधी कुठे होती ते. सगळी सगळी माहिती काढली. याआधी अशी कोणत्याच मुलीची माहिती काढली नव्हती. यावेळी रहावलच नाही.
गेल्या दोन दिवसात स्वप्नात देखील तीच येते आहे. मुळात झोपच कुठे गेली आहे तेच कळत नाही आहे. आणि कशीबशी लागली तर स्वप्नात देखील तीच. आणि इतक छान वाटते आहे ती आहे तर! सगळीकडे आनंदी आनंद वाटतो आहे. आज मी सकाळी तर कंपनीत येतांना देखील मस्तपैकी पावसात भिजून आलो आहे. सगळे छत्री का नाही आणली अस विचारत होते. आता त्यांना कस सांगू मन किती भिजले आहे अप्सरेच्या प्रेमात. खरंच आता अप्सरा सोडून देवाने काही नाही दिले तरी चालेल. हीच हवी होती. आत्ताही मी पाणी भरायला 'पॅंट्री'त गेलो होतो. त्यावेळी ती देखील आली होती. किती गोड आहे. गोड नाही 'गोडू' आहे. ती ज्यावेळी माझ्याकडे पाहते त्यावेळी काय सांगू मनात काय काय होते. मला ती सोडून मुळात कुठेच रस नाही राहिलेला आहे. कुठेच काहीच अडचण नाही. वडिलांची अपेक्षा पत्रिका जुळायला हवी. मी पहिले तर तिचे आणि माझे साडेसत्तावीस गुण जुळतात. आईला हवं की, आपल्या जातोतोल हवी तर ती आहे माझ्या जातीतील. फ़क़्त बहिणाबाईला मानवावे लागेल. ते होऊन जाईल! तिच्याशी कस बोलू हाच काय तो मोठा प्रश्न आहे. बस्स!
No comments:
Post a Comment