Sunday, July 18, 2010

कल करे सो आज कर...

कल करे सो आज कर...

 

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमितपणे व्यायाम करायला हवा. पण, टाइम मॅनेजमेण्ट करताना व्यायामासारख्या महत्त्वाच्या गोष्टीलाच कात्री लावली

 

जाते. व्यायाम करण्यासाठी अनेक बहाणे आपणच निर्माण करतो. हे बहाणे टाळायला शिका.

************

सकाळचे सहा वाजलेत. आपणच आदल्या रात्री लावलेला घड्याळाचा गजर बेंबीच्या देठापासून ओरडून वेळेची जाणीव करून देत असतो. त्या साखरझोपेतच लक्षात येतं, की आपण आज व्यायामाला सुरुवात करायचं ठरवलं होतं. आणि मग आजचा दिवस राहू देत, उद्यापासून सुरुवात करू असं म्हणत झोपेतच तो गजर बंद केला जातो.

काही सवयीचं वाटतंय का? व्यायाम करण्यासाठी असे अनेक बहाणे आपणच तयार करत असतो. कधी खूप घाई असते, कधी खूप दमायला होतं, तर कधी टेन्शन असतं... सगळ्याचं मूळ येऊन ठेपतं, ते व्यायाम टाळण्यावर. पण, त्याऐवजी या रोजच्या व्यापाशी दोन हात करत नियमित व्यायाम कसा करता येईल हे समजून घेतलं पाहिजे. बहाणे अनेक असतात पण त्यातनं बाहेर पडून आपल्या निरोगी आयुष्याची आखणी आपणच केली पाहिजे.

व्यायाम टाळायचे बहाणे आणि त्यावरचे उपाय :

>
मला खूप दमायला झालंय : शरीर दमल्यावर मनही आपल्याला आपण दमलोय, असा कौल देतो. आणि मग आपण व्यायामाला सुट्टी द्यायची असा ढोबळमनाने निर्णय घेऊन टाकतो. त्याऐवजी जरा मरगळ झटकून व्यायाम केला तर आपोआपच टवटवीत वाटायला लागेल. नकळतच आपला स्टॅमिनाही वाढू शकेल.

>
आज मला खूप दगदग आहे आणि घरच्यांसाठीही वेळ द्यायचाय : हे रोजच होत राहणार. स्पधेर्च्या जगात टिकून राहायचंय, तर दगदगीशी सामना करता आलाच पाहिजे. हा सामना करायचा तर व्यायामाला पर्याय नाही. आपल्या इतर मुख्य गोष्टींमध्ये व्यायामाची वेळ ठरवा. १५ मिनिटं तर १५ मिनिटं; पण, चुकता ही वेळ पाळत व्यायाम करा. जेव्हा शरीराला सवय होईल तेव्हा जाणवेल, की रोजच्या दगदगीला सहन करायची आपली मानसिक तयारी जास्त सहज होतेय आणि कटकट वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे पाहायचा आपला दृष्टिकोनही सकारात्मक झालाय.

>
मला खूप टेंशन आहे : व्यायाम करणं, हा टेन्शन कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. मानसिक ताणामुळे विनाकारण शारीरिक हालचालींवरही ताण येतो. पण, जर आपलं चित्त व्यायामामध्ये गुंतवलं तर आपोआपच शरीर हलकं होतं आणि मग त्याचा परिणाम मन हलकं होण्यासाठी होतो.

>
व्यायाम करायचं माझं वय राहिलं नाही : आपलं वय हे कायम मानसिक असतं. वयाच्या वाढत्या आकड्याची जाणीवच आपल्याला अधिकाधिक वृद्ध करत जाते. त्यामुळे माझ्या वयामुळे मला व्यायाम करणं शक्य नाही, या मर्यादा मनातून काढून टाका. व्यायामामुळे तुमच्या चित्तवृत्ती अधिक टवटवीत होतात.

>
व्यायाम करताना मला काही इजा झाली तर..? : आपण कुठचीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा करतो त्याआधी ती कोणत्या तरी तज्ज्ञाकडून शिकून घेत असतो. तोच नियम व्यायामाच्या बाबतीतही आहे. इतर गोष्टी आपण जशा शिकतो तसाच व्यायामही शिकला पाहिजे. त्याचे प्रकार किंवा कृतीचं शास्त्रशुद्ध ज्ञान घेणं आवश्यकच आहे. तो व्यवस्थित शिकल्याचा फायदा दीर्घ काळासाठी होऊ शकतो.

-
क्लिनिकल एक्सरसाइज,
लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्स्पर्ट

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive