Sunday, August 12, 2012

कॅनन इओएस ६५० डी डिजिटल इंटरचेंजेबल लेन्सेस कॅमेरा छांदिष्टांसाठी उत्तम डीएसएलआर Canon DSLR

फोटोग्राफीचा छंद हा आता सर्वदूर पोहोचला आहे. पूर्वीसारखा तो फक्त श्रीमंतांचा छंद राहिलेला नाही. त्यातही डिजिटल एसएलआरने या छंदाची सारी परिमाणे बदलून टाकली आहेत. पूर्वी चांगला फोटो टिपायचा तर कॅमेऱ्याचे सारे तंत्र अवगत असावे लागायचे. पण आता काय कुणीही, कसाही टिपला तरी त्यातील ‘ऑटो’ मोडमुळे चांगलाच फोटो टिपला जाईल अशी सोय दस्तुरखुद्द कॅमेऱ्यामध्येच सामावलेली आहे. अर्थात त्यामुळे झालेय काय की, डिजिटल कॅमेरा हाती असलेल्या प्रत्येकालाच आपण alt व्यावसायिक छायाचित्रकार झाल्यासारखे वाटू लागले आहे. अर्थात सध्याच्या जमान्यातील प्रवास हा प्रथम डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल एसएलआर असा आहे. पूर्वी हा डिजिटल एसएलआर हाही परवडणारा नव्हता. मात्र आता त्याच्याही किंमती झपाटय़ाने खाली येत आहेत. त्यामुळे हा डिजिटल एसएलआरदेखील अनेकांच्या हातात खेळू लागला आहे..
त्यातही कॅनन या कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगलीच भरारी या क्षेत्रात मारली आहे. एक तर पूर्वी पहिल्या स्थानावर निकॉन आणि नंतर कॅनन अशी स्थिती होती. आता अनेकांच्या हातात कॅनन पाहायला मिळतो. अनेक व्यावसायिक छायाचित्रकारही कॅननवर भरोसा टाकताना alt दिसतात. एकूणच या वातावरणामुळे कॅननकडे तरुण पिढी खेचली गेली नसती तर नवलच होते. हेच लक्षात घेऊन कॅनननेही अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. नवशिक्यांसाठी किंवा ज्यांना अधिक चांगले चित्रण करायचे आहे अशा छांदिष्टांसाठी किंवा व्यावसायिक छायाचित्रकार होण्याच्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी इओएस ६५० डी हे चांगले मॉडेल ठरावे.
सध्या १६ मेगापिक्सेलचा जमाना आहे. तर कॅननने बाजारात आणलेले हे नवे मॉडेल आपल्याला १८ मेगापिक्सेलचा फोटो देते. केवळ स्टील शॉटस्साठी नव्हे तर याचा १८ मेगापिक्सेल सेन्सर फूल एचडीमूव्हीसाठीही तेवढेच चांगले काम करतो. या मॉडेलच्या बाबतीत असलेला सर्वात गमतीशीर भाग म्हणजे याचा एलसीडी स्क्रीन हा बाहेर तर येतोच पण तो खाली- वर असा वळत असल्याने कॅमेरा तसा ठेवून लेन्सचा अँगल आणि पर्यायाने फोटोचा अँगल बदलून वेगळे फोटो टिपता येतात.
प्रतिमेची सुस्पष्टता
या कॅमेऱ्यामध्ये असलेल्या १८ मेगापिक्सेल सेन्सरच्या वापराने प्रतिमांकनामध्ये रंग आणि प्रतिमेची सुस्पष्टता या बाबी अनोख्या पद्धतीने टिपल्या जातात. कॅननमध्ये प्रतिमांकनासाठी १४ बिट डिजिक फाइव्ह इमेज प्रोसेसिंगचा वापर केला जातो. त्यामुळे या १८ मेगापिक्सेलमध्ये फाटलेले पिक्सेल्स बिलकुल दिसत नाहीत.
फूल एचडी
ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल दोन्ही मोडमध्ये तुम्हाला फूल एचडी मूव्ही शूट करणे सहज शक्य होते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शूट करत असताना बदलणाऱ्या वातावरणानुसार सारे काही ऑटो अ‍ॅडजस्ट होते त्यामुळे तुम्ही न थांबता शूट करू शकता. यातील मायक्रोफोन्सदेखील अतिशय उत्तम दर्जाचे आहेत.
वेगवान वस्तूंचे शूटही सर्वोत्तम
वेगात असलेली वस्तू शूट करणे ही अनेकदा डोकेदुखी ठरणारी बाब असते. कारण आजूबाजूला असलेला प्रकाश किंवा मग त्या वस्तूचा वेग कमी अधिक होत असतो. हे सारे गृहीत धरून सेटिंग कसे करायचे हे अनेकदा छायाचित्रकाराला कळत नाही. शिवाय त्यापूर्वीचा अनुभव असा असतो की, ऑटो मोडवर ठेवल्यानंतरही अनेकदा महत्त्वाचा शॉट ‘मिस’ झालेला असतो.. हे टाळण्यासाठीच कॅननने आता नऊ क्रॉस टाइप ऑटो फोकस पॉइंटस्चा फॉर्मुला वापरला आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या वेग आणि प्रकाशाच्या शक्यता गृहीत धरून सॉफ्टवेअरची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा चांगला शॉट मिस होणार नाही. शिवाय इथे प्रतिसेकंद पाच फोटो या दराने शूट करणे शक्य आहे. त्यामुळे साधारणपणे २०-२२ फ्रेम्स टिपल्या जातील तेव्हा त्यातील एक नक्कीच तुमचा बेस्ट शॉट असेल.
वेगळा अँगल
अलीकडे अनेक नवीन कॅमेऱ्यामध्ये काही कंपन्यांनी एलसीडी स्क्रीन वळवता येण्याजोगा देण्यास सुरुवात केली आहे. या एलसीडी स्क्रीनमध्ये सध्या दोन महत्त्वाचे बदल झाले आहेत. पहिला म्हणजे त्याचा आकार वाढला आहे. आणि तो टचस्क्रीन झाला आहे. त्यामुळे फोटो शूट करणे सोपे जाते. आणि काही कंपन्यांनी त्याला एक नवीन अँगलची जोड दिली आहे. त्यामुळे तो स्क्रीन बाहेर येऊन २७० अंशांमध्ये वळतो. तो ज्याप्रमाणे वळतो त्याप्रमाणे फोटोचा अँगलही बदलत जातो.  त्यामुळे एरवीपेक्षा वेगळ्या अँगलचे फोटो सहज टिपता येतात.
कमी प्रकाशातही उत्तम चित्रण
सर्वच कॅमेरा कंपन्या ज्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स थंडावतो आणि पुढे काहीच कळेनासे होते ते म्हणजे कमी प्रकाशातील चित्रण. सर्वच कंपन्या सध्या यावर अधिक संशोधन करत आहेत. कॅननच्या या कॅमेऱ्याच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ हे कमी प्रकाशातील चित्रणाचेही आहे. याचे आयएसओ १०० पासून सुरू होते आणि १२,८०० पर्यंतची थेट सोय त्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे आयएसओ विस्तारित करून शूट करण्याची सोयही यात असून त्याचा विस्तार तब्बल २५ हजार ६०० पर्यंत करता येतो. त्यामुळे फ्लॅशशिवाय चित्रण करणेही शक्य होईल.
स्पीडलाइट ट्रान्समीटर
प्रकाश हा कोणत्याही छायाचित्राचा प्राण असतो. त्यामुळे त्याचा वापर जेवढय़ा वैविध्यपूर्णतेने करता येतो तेवढे छायाचित्र वेगळे ठरते. असा प्रयोग एरवी शक्य नव्हता. पण कॅननच्या या मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या इंटिग्रेटेड स्पीडलाइट ट्रान्समीटरमुळे फ्लॅश इतरत्र कोठेतरी ठेवून त्याचे नियंत्रण कॅमेऱ्याद्वारे करत चित्रण करणे आता सहज शक्य झाले आहे.
सीन इंटेलिजन्ट ऑटो
एरवी कोणत्याही डिजिटल कॅमेऱ्यामध्ये असेल अशी सोय म्हणजे सीन इंटेलिजन्ट ऑटो. त्यामुळे कॅमेरा प्रत्यक्ष प्रसंग पाहून कोणत्या मोडमध्ये छायाचित्र टिपायचे त्याचा निर्णय घेतो आणि त्यामुळे उत्तम चित्रण आपल्याला प्राप्त परिस्थितीत करता येते.
ब्लर फ्री पिक्चर
कमी प्रकाशात चित्रण करताना येणाऱ्या काही अडचणी लक्षात घेऊन आता कॅननने त्यांच्या सॉफ्टवेअर आणि तंत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल केले आहेत. ब्लर फ्री पिक्चर हा त्यातील एक महत्त्वाचा बदल आहे. यामध्ये नाईट मोडमध्ये अनेक छायाचित्रे टिपली जातात आणि त्यांच्या एकत्रिकरणातून एक चांगले छायाचित्र आपोआपच तयार होते. त्यामुळे आपल्याला मिळताना मात्र सुस्पष्ट प्रतिमा असलेले चित्र मिळते.
महत्त्वाच्या बाबी
१)    १८.० मेगापिक्सेल एपीएस- सी सीमॉस सेन्सर
२)    फूल एचडी मूव्ही मॅन्युअल व कंटिन्यूअस ऑटोफोकससह
३)    ५ फ्रेम्स प्रतिसेकंद दराने शूटिंग करणे शक्य
४)    एलसीडी- टू टचस्क्रीन जो बाहेर येतो व वळतोही
५)    आयएसओ १०० ते १२,८०० आणि विस्तार शक्य २५,६०० पर्यंत
६)    नऊ पॉइंटस् वाइड एरिया ऑटो फोकस
७)    इंटिग्रेटेड स्पीडलाइट ट्रान्समीटर
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ५९,९९० /-

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive