Sunday, August 12, 2012

उत्सुकता मायक्रोसॉफ्टच्या ‘सरफेस’ची! - Microsoft Surface

टॅब्लेटसाठी २००२ पासूनच सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने अ‍ॅपल आयपॅडला टक्कर देण्यासाठी आपला ‘सरफेस’ या विंडोज आर टी आणि विंडोज ८ प्रो या नव्या ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱ्या टॅब्लेटची मालिका बाजारात आणण्याची घोषणा नुकतीच केली. येत्या काही महिन्यांत हे टॅब्लेट्स भारतीय बाजारातही दाखल होतील. अतिशय वेगळे लूक्स आणि विंडोज-८ प्रो सारख्या उत्तम ऑपरेटींग सिस्टमसह टॅब्लेट स्पर्धेत उतरलेल्या ‘सरफेस’ची काही वैशिष्ठय़े..

सर्वोत्तम ओएस
    अर्थातच कोणतेही टॅब्लेट म्हटले तरी त्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याची ऑपरेटींग सिस्टम. त्यामुळे या टॅब्लेटमध्ये विंडोजने आपली सर्वोत्तम ओएस (ऑपरेटींग सिस्टम) ग्राहकांना देवू केली आहे. अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे ग्राहकांची नस योग्य पद्धतीने ओळखून त्यांनी ‘विंडोज८ प्रो’ आणि ‘विंडोज आर टी’ या टॅब्लेटसोबत दिली आहे. यासाठी दोन विशेष व्हर्जन्स या टॅब्लेटमध्ये तयार करण्यात आली आहेत. यामध्येही विंडोज आर टी वर चालणाऱ्या टॅब्लेटमध्ये ३२ व ६४ जीबी साठवणूकक्षमता असणारी मॉडेल्स आहेत. तर ८प्रो मध्ये ६४ व १२८ जीबी साठवणूक क्षमता असणारे मॉडेल्स समाविष्ट करण्यात आली आहेत.

मल्टिटास्किंग
खरेतर विंडोज प्रो वर चालणाऱ्या पीसी ला रिप्लेसमेंट म्हणून मायक्रोसॉफ्टने , ‘प्रो’ वर चालणारा टॅब्लेट बाजारात आणल्याचे सांगितले जाते. म्हणजेच हा टॅब्लेट एखाद्या पीसी इतकाच कार्यक्षम असेल असा दावा कंपनी करते आहे. यामध्ये अनेक प्री-लोडेड अ‍ॅप्स समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आपली ऑफिसची अनेक कामे सहज शक्य होतात. तसेच बॅकग्राउंड मल्टिटास्किंगसारख्या बाबींमुळे कमीत कमी वेळात अनेक कामे उरकता येतात. तसेच विंडोज स्टोअर हे ऑनलाईन वेब स्टोअर यामुळे विंडोज ८ प्रो व आर टी हे ओ.एस. ‘सरफेसला’ परफेक्ट मॅच होतात. प्रोसेसरच्या बाबतीत पाहायचे झाल्यास विंडोज आर टी हे एनव्हीडीयाच्या ए.आर.एम. प्रोसेसरवर चालते तर ८ प्रो साठी इंटेल तिसऱ्या पीढीचा कोअर आय प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे.

वजनाने हलका
झीरो फिगरच्या जमान्यात विंडोजने आपल्या टॅब्लेटला देखील स्लीम ट्रीम केले आहे. ९.३ मीमी  जाडीचा हा टॅब्लेट वापरण्यास अतिशय सोयीस्कर व उत्तम आहे. तो वजनानेही अतिशय हलकाआहे. याचे मुख्य कारण म्हणजे याची केस बनविण्यासाठी वापरण्यात आलेला मॅग्नेशिअमचा मिश्रधातू ज्यामुळे टॅब्लेटचे वजन कमी असूनही तो अतिशय टिकाउ ठरतो. हे स्लीम फीचर टॅब्लेटमध्ये असले तरी त्यामध्ये रोजदररोजच्या वापरासाठी लागणारे अनेक पोर्टस पुरविण्यात आलेले आहेत.

गोरिल्ला ग्लास
१०.६ इंच आकाराचा डिस्प्ले असणारा हा टॅब्लेट क्लीअर टाईप एच डी डिस्प्ले तंत्रज्ञानासह देण्यात आलेला आहे. ज्यामुळे आपणांस सर्वोत्तम चित्र पाहिल्याचा आनंद उपभोगता येईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच याची स्क्रीन ही ‘गोरील्ला ग्लास २’ आहे व ती ऑप्टिकल बॉन्डींग या तंत्रज्ञानाने बाउन्ड आहे, म्हणजेच इतर टच स्क्रीनप्रमाणे गोरील्ला ग्लास व टच स्क्रीन यामध्ये फार अंतर रहात नाही, यावर स्टॅलसने एखादा मजकूर लिहिताना आपल्याला तो खऱ्या-खुऱ्या कागदावर लिहिल्याचा भास होईल.

प्रेशर सेन्सेटिव्ह की बोर्ड
आपल्या आवडीची गाणी कधीही ऐकता यावी व देवाणघेवाण सोपी व्हावी यासाठी यामध्ये मायक्रोएसडी कार्डसाठी पोर्ट देखील देण्यात आला आहे. या टॅब्लेटचे वैशिष्ठय़ म्हणजे यासोबत येणारे मॅग्नेटीक टच कव्हर. ३ मीमी जाडीचे हे कव्हर फक्त कव्हर नसून तो प्रेशर सेन्सेटीव्ह ‘की’ असलेला ‘की बोर्ड’ आहे. ज्यामुळे आपल्याला टेक्स्ट टाईप करणे अतिशय सोपे होउन जाते. तसेच टॅब्लेटला असणाऱ्या कीक स्टॅन्डमुळे त्यावर काम करताना आपल्याला आपल्या लॅपटॉपवर अगर डेस्कटॉपवर काम केल्याचा भास होतो. त्यामध्ये २३ अंशांपर्यंत वळू शकणारा बॅक कॅमेरा आहे. शिवाय व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेराही पुरविण्यात आलेला आहे. याखेरीज इतर टॅब्लेट्स प्रमाणे वायफाय सारख्या सुविधाही आहेतच.

आकर्षक रंगसंगती
या सरफेसची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्याचे आकर्षक असलेले रंग. तरूणांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांना आवडतील अशा रंगात हे मायक्रोसॉफ्टचे ‘सरफेस’ उपलब्ध आहेत. याखेरीजही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेगवेगळी फीचर्स या टॅब्लेटमध्ये देण्यात आली आहेत. या साऱ्यांची इत्थंभूत माहिती हा टॅब्लेट बाजारात आल्यावर होईलच. शिवाय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे टॅब्लेटची किंमत, याबद्दलही कंपनीने फारसा खुलासा केलेला नाही, परंतु इतर साऱ्या टॅब्लेटच्या तुलनेत ८-प्रो वर चालणाऱ्या टॅब्लेटची किंमत जास्तच असेल असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
असे सारे असले तरी सॉफ्टवेअरच्या बाबतीत अग्रेसर असणारी मायक्रोसॉफ्ट हार्डवेअरच्या बाबतीत कितपत योग्य असेल, हे लगेचच सांगणे जरा कठीण आहे. ‘अ‍ॅपल’ व त्याचे मार्केट खाणे मायक्रोसॉफ्ट ला लगेचच शक्य नाही हे जरी वास्तव असलं तरी भविष्यात अ‍ॅपलचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून विंडोजकडे पाहिले जाईल, असे सध्या तरी दिसते आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive