Monday, September 2, 2013

समर्थांचे युद्धकांड

' युद्धस्य कथा रम्या:' असे एक संस्कृत वचन आहे. रामकथा असो अथवा कृष्णकथा, शिवचरित्र असो अथवा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, त्यातील पराक्रमाच्या कथा माणसात वीररस निर्माण करतात. शिवाजी महाराज पराक्रमी नसते तर कुणी शिवजयंती साजरी केली असती? रामाने रावणाचा वध केला नसता तर कुणी रामकथेचे गायन केले असते? युद्ध कुणालाही नको असते; पण युद्ध पाहायला आणि ऐकायला माणसाला आवडते ही एक विचित्र विसंगती आहे. समर्थांनी म्हणूनच युद्धकांडामध्ये सुमारे १३५० ओव्या लिहून राम, लक्ष्मण आणि वानरसेना यांच्या पराक्रमाचे गायन केले आहे. युद्धकांडाच्या प्रारंभी समर्थांनी रामकथा ही सर्वश्रेष्ठ कथा आहे असे म्हटले.

कथा शंकराची कथा कातिर्काची। कथा चंडिकेची कथा मोरयाची।

कथा वेंकटीची कथा वीठलाची। कथा मल्लयाची कथा भैरवाची।।

कथा नृसींह्या वामना भार्गवाची। कथा कौरवा पांडवा माधवाची।

कथा देव इंदादि ब्रह्माादिकांची। समस्तांमधें श्रेष्ठ या राघवाची।।

समर्थांच्या मनात सर्वच दैवतांबद्दल पूज्यभाव होता. त्यांनी सर्व देवांच्या आरत्या केल्या हे आपण पाहिले. तरीदेखील अन्य देवांपेक्षा रामकथा श्रेष्ठ आहे असे ते म्हणतात, याचे कारण अन्य देवांचे पराक्रम हे त्यांचे वैयक्तिक पराक्रम आहेत. रामचंदांनी वैयक्तिक पराक्रमाबरोबरच समाज संघटित करून सामान्य माणसाची अस्मिता जागी केली. हेच काम अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. सगळे देव रावणाच्या बंदिवासात असताना रामचंदांनी रावणाचा वध करून देवांची सुटका केली म्हणून समर्थ 'राम हा देव देवांचा' असे म्हणतात.

हनुमंताने लंकेतून परतल्यावर सीतेची खुशाली रामलक्ष्मणांना सांगितली येथून समर्थांचे युद्धकांड सुरू होते. राम आणि रावण या दोन्हीकडील सैन्यांच्या उद्भुत पराक्रमाचे जोशपूर्ण वर्णन समर्थ तटस्थपणे करतात. रौदरस, वीररस, तर कधी बीभत्सरसाचा वापर ते करतात. रावणाने सीता परत करावी हे मंदोदरीचे सांगणे रावण झिडकारतो तेव्हा मंदोदरी आपला दीर बिभीषण याला रावणाचे मन वळवण्याची विनवणी करते हा प्रसंग मोठा भावपूर्ण आहे. मंदोदरीच्या अंत:करणाची किती घालमेल चालू असेल याची यावरून कल्पना येते. मात्र बिभीषणाच्या सल्ल्याने संतापलेला रावण बिभीषणाला लाथेने मारतो. बिभीषणाने रामचंदांची केलेली स्तुती रावणाला सहन होत नाही. कुंभकर्णानेदेखील रावणाची कानउघाडणी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रावणाने रामांच्या सैन्यांचा अंदाज घेण्यासाठी शुक आणि सारण हे आपले हेर पाठवले. तेव्हा या हेरांनीदेखील रावणाने सीता परत करून युद्धाचा प्रसंग टाळावा असा सल्ला दिला. असे प्रामाणिक हेरखाते होते म्हणून रावणाला यश मिळाले असावे. राम आणि बिभीषण यांचे भेटीचे भावपूर्ण वर्णन समर्थ करतात. पहिल्याच भेटीत रामचंद बिभीषणाचा लंकेचा भावी राजा म्हणून राज्याभिषेक उरकतात. या पाठीमागे रामांचे फार मोठे धोरण होते. रावणवधानंतर बिभीषण राजा होणार असेल तर लंकेची जनतादेखील रामाचा विजय व्हावा अशी धारणा करू शकते; कारण कोणालाही परप्रांतातील राजा नको असतो.

हे युद्ध टाळावे म्हणून रामचंदही प्रयत्न करतात. शिष्टाईसाठी ते अंगदाला पाठवितात. यामागेदेखील रामांचे राजकीय धोरण होते. अंगद हा रामांच्या सैन्यातील कच्चा दुवा होता. त्याचे वडील वाली रामानेच मारले होते. वाली आणि रावण हे मित्रदेखील होते. रामांनी अंगदाची निष्ठा तपासून पाहिली.

महापार्श्व नावाच्या मंत्र्याने रावणाला सीतेवर बलात्कार करण्याचा सल्ला दिला होता; पण रावणाला ब्रह्मादेवाचा शाप होता. रावणाने जेव्हा आपल्या सुनेवर बलात्कार केला तेव्हा तिने ब्रह्मादेवाजवळ तक्रार केली. तेव्हा ब्रह्मादेवाने रावणाला दिलेल्या शापानुसार रावणाने पुन्हा कोणत्याही स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याच्या मस्तकाचे १०० तुकडे होणार होते. याचा अर्थ सीता शुद्ध राहिली ही रावणाची सज्जनता नव्हती, तर अगतिकता होती. युद्धकांडात समर्थ जागोजागी हनुमंताचा पराक्रम सांगतात. इंदजिताच्याही पराक्रमाचे वर्णन येते. कुंभकर्णाला झोपेतून उठविण्याच्या प्रसंगी समर्थांनी हास्यरस निर्माण केला आहे. हनुमंताने दोणागिरी उचलून आणल्यावर रामांनी व्यक्त केलेली कृतज्ञता समर्थांनी भावपूर्ण शब्दात वर्णन केली आहे. इंदजिताच्या यज्ञात वानर विघ्न निर्माण करतात, हा प्रसंग मोठा बोलका आहे. 'जशास तसे' या नियमाचे पालन रामचंद करतात. सीता लंकेतील नागरिकांपुढे अग्निदिव्य करते आणि मग राम तिचा स्वीकार करतात, याचे हृदयदावक वर्णन समर्थ करतात.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ८०

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive