Monday, September 2, 2013

मनाचे श्लोक म्हणजे मनोपनिषद

उपनिषदांची संख्या १०० हून अधिक आहे. ईश, केन, कठ, मुंडक, मांडुक्य ही प्रधान उपनिषदे आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी समर्थांच्या मनाच्या श्लोकांना 'मनोपनिषद' हे यथार्थ नाव दिले आहे. माणूस स्वत: जोपर्यंत मनावर घेत नाही, तोपर्यंत त्याच्यात सुधारणा होणार नाही. सारे जग दुसऱ्याला उपदेश करीत राहते. परिस्थिती बदलावी किंवा इतरांनी बदलावे, असे प्रत्येकाला वाटते. मनाचे श्लोक ही स्वत:ला उपदेश करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारा समर्थांनी स्वत:ला उपदेश करण्याचे किंवा आत्मपरीक्षणाद्वारे आत्मपरिवर्तन करण्याचे एक स्वतंत्र तंत्र विकसित केले आहे.

समर्थ हे थोर मानसशास्त्रज्ञ होते. माणसातील विकार हेच त्याच्या दु:खाचे प्रधान कारण आहे, हे समर्थांनी ओळखले. पण माझ्यातील विकारांची जाणीव मला दुसऱ्याने करून दिली, तर लगेच राग येतो. अनेकदा आपण व्यवहारात फसलो म्हणजे स्वत:च स्वत:ला मूर्ख म्हणवून घेतो. पण दुसऱ्याने आपल्याला मूर्ख म्हटले तर लगेच राग येतो. अशा वेळी समर्थ कशी युक्ती वापरतात, ते पहा- ''नको रे मना क्रोध हा खेदकरी। नको रे मना काम नाना विकारी। नको रे मदा सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू। नको रे मना दव्य ते पुढिलांचे। अति स्वार्थ बुद्धी न रे पाप साचे। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होता मनासारिखे दु:ख मोठे।। मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे। मना बोलणे नीच सोसीत जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसी रे नीववावे।''

प्रत्येकाला मोठेपणा हवा असतो. आपली कीतीर् व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. पण कुणीही त्यासाठी झिजायला तयार नसतो. तनाने आणि धनाने झिजणे तुलनेने सोपे असते. मनाचे श्लोक म्हणजे मनाने झिजण्याची प्रक्रिया आहे. मनाच्या श्लोकांत इंदियांचे दमन नाही. येथे मीच मला समजावून सांगायचे आहे. इतके दिवस आपण क्रोध केला, पण यातून काही निष्पन्न झाले का? वाममार्गाने मी संपत्ती गोळा केली, पण त्यामुळे किती अशांती, किती ताणतणाव मी ओढवून घेतले. मी जर माझी सहनशक्ती वाढवली आणि सर्वांशी प्रेमाने बोललो, तर आपोआप मला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. वामनराव पै म्हणतात त्याप्रमाणे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मी क्रोध करतो, तेव्हा मीच माझा वैरी होतो. मी सर्वांवर प्रेम करतो, तेव्हा मीच माझा मित्र ठरत असतो. मी माझ्या कल्पनेने इतर लोकांवर मित्रत्व आणि शत्रुत्व लादत असतो. जे माझा अहंकार फुलवतील, त्यांना मी माझा मित्र समजतो आणि जे अहंकाराला धक्का देतील, त्यांना मी शत्रू समजतो. समर्थांनी मनाच्या श्लोकांद्वारे हे दाखवून दिले की, माझे मनच माझा खरा शत्रू किंवा खरा मित्र असते.

मानवी जीवनातले आणखी एक कटू सत्य समर्थ समजावून सांगतात- ''जगी सर्व सुखी असा कोण आहे। विचारी मना तूचि शोधुनि पाहे। मना तांचि रे पूर्वसंचित केले। तयासारिखे भोगणे प्राप्त झाले।'' प्रत्येक माणसाला सुख हवे असते. पण प्रत्येकाच्या वाट्याला जीवनात कधी ना कधी दु:ख येते. वस्तुत: सुख आणि दु:खाचे मिश्रण हेच जीवनाचे स्वरूप आहे. त्यासाठी समर्थ समजावून सांगतात- ''मना मानसी दु:ख आणू नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे।'' माणसाने कितीही काळजी केली, तरी घडणाऱ्या घटना घडतच राहतात. माणूस मनाने विषण्ण होऊन आपल्या दु:खाचा अकारण गुणाकार करतो.

पती मरण पावल्यानंतर एक स्त्री आक्रोश करीत भगवान बुद्धांकडे आली. आपल्या पतीचे प्रेत बुद्धदेवांनी उठवावे, असे तिला वाटत होते. बुद्धदेव तिला म्हणाले, ''ज्या घरात आजपर्यंत कुणीही मेले नाही, त्या घरातील मोहरी तू मला आणून दे. म्हणजे मी तुझ्या पतीला त्या मोहरीच्या साह्याने जिवंत करीन.'' ती विधवा स्त्री घरोघर आणि दारोदार वणवण हिंडली, पण तिला मृत्यूच्या बाबतीत आपल्यापेक्षा जास्त अभागी स्त्रिया भेटल्या. तिला नवीन दृष्टी मिळाली. बुद्धदेवांनी चमत्कार न करता तिला जीवनदृष्टी दिली. मनाच्या श्लोकांत समर्थांनी हाच प्रयोग केला आहे.

माणूस वास्तव जीवन सोडून कल्पनेत रमतो. त्याच्या सुख-दु:खाच्या कल्पना एखाद्या कादंबरीप्रमाणे काल्पनिक असतात. सुख-दु:खासाठी तो सतत कुणावर तरी अवलंबून राहतो. जर माणसाने आपल्या मनाला प्रशिक्षण दिले, तर त्याला स्वत:च्या जीवनात आनंद निर्माण करता येईल. तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक संकटे येऊनही तुकोबा दु:खी झाले नाहीत. मनाचे श्लोक म्हणजे अशा प्रकारे मनाची जडणघडण करण्याची शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे.

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : ४

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive