Monday, September 2, 2013

श्ाी समर्थांचे सुंदरकांड

सगुण निर्गुण
लेखांक : ७९
संत एकनाथ महाराजांनी 'भावार्थ रामायण' हा विस्तृत ग्रंथ लिहून रामकथेचा महाराष्ट्रात प्रचार केला. नाथांची पत्नी गिरीजाबाई आणि समर्थांची मातुश्ाी राणूबाई या दोघी मावसबहिणी होत्या. समर्थांची रामभक्ती सर्वश्ाुत आहेच. प्रभू रामचंद त्यांचे केवळ आराध्यदैवत नव्हते तर प्रत्यक्ष सद्गुरू होते. करुणाष्टके, अभंग, आरत्या, स्फुट प्रकरणे या विविध काव्यप्रकारात समर्थांनी आपल्यातील रामभक्ती अभिव्यक्त केली आहे. मात्र नाथांप्रमाणे विस्तृत रामचरित्र त्यांनी लिहिले नाही. कदाचित नाथांनी ते कार्य केले असल्यामुळे समर्थांना पुनरावृत्तीची आवश्यकता वाटली नसावी. मात्र सुंदरकांड आणि युद्धकांड ही वाल्मिकी रामायणातील दोन कांडे समर्थांनी लिहिली आहेत. याखेरीज किष्किंधा कांडावरही त्यांच्या १८१ ओव्या आहेत. कदाचित हनुमंत हा समर्थांचा विशेष प्रचाराचा विषय असल्यामुळे समर्थांनी ज्याप्रमाणे जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली, त्याचप्रमाणे हनुमंताचे अचाट कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ही तीन कांडे लिहिली.

मुळात वाल्मिकी रामायणातील सुंदरकांड कामधेनूच्या दुधाप्रमाणे मधूर आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसद्वारा त्यात साखर टाकली. समर्थांचे सुंदरकांड म्हणजे त्यात पडलेले केशर आहे. सीतेच्या शोधासाठी वानरसेना निघते येथून समर्थांचे सुंदरकांड सुरू होते. 'सीतेचा शोध' यासाठी समर्थांनी १०१ ओव्यांच्या या प्रकरणात अनेकदा 'सीताशुद्धी' हा शब्दप्रयोग केला आहे. रामचंदांनी रावणाशी लढण्यासाठी आपले लष्कर स्वबळावर उभे केले. याचे समर्थांना खूप कौतुक वाटते. सीतेचे अपहरण झाल्यावर रामचंदांनी अयोध्या किंवा मिथिला इथे मोबाइल करून लष्करी मदत मागितली नाही. सीतेच्या अपहरणाची बातमी अयोध्येत रावणवधानंतर पोहोचली आहे. वनवासी, आदिवासी, भिल्ल, गोंेडाळ, वानर, अस्वल यामधून रामचंदांनी आपले सैन्य उभे केले. समुदकाठापर्यंत दक्षिणेत येऊनदेखील सीतेचा शोध न लागल्यामुळे सगळे वानर निराश झाले. समर्थ वर्णन करतात-

' कपी बोलती काय आतां करावें। न लागे सिताशुद्धि तेव्हां मरावें।

म्हणे मारुती वीर हो स्थीर बैसा। तिन्ही लोक पाहोनि येतों तमासा।।

ज्यावेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या सार्मथ्याची आठवण करून दिली, तेव्हा आत्मविश्वास जागा झालेला हनुमंत उड्डाण करून लंकेत झेपावतो. प्रत्येक साधकाच्या जीवनात नैराश्याचा कालखंड येऊन जातो. त्याला आत्मविस्मृती होते. कोणीतरी त्याच्यातील अस्मिता जागी करावी लागते. समर्थांचा हनुमान हा तुमचा आमचा प्रतिनिधी आहे. हनुमंत लंकेत पोहोचला.

समर्थ लंकेला उद्देशून 'त्रिकुटाचळ' असा शब्दप्रयोग पुन:पुन्हा करतात. कारण लंकेच्या भोवताली तीन टेकड्या आहेत. समर्थांना हनुमंताच्या शेपटाचे फार कौतुक वाटते. रामायणात हनुमंताचे स्थान अद्वितीय आहे. सीतेची भेट झाल्यावर हनुमंताने लंकेचे निरीक्षण केले. नंतर त्याने आपल्या शेपटीचा चमत्कार दाखवायला सुरुवात केली. येथे समर्थांनी हास्यरस निर्माण केला आहे. ते म्हणतात-'कितीयेक राक्षेस ते हाकलीती । कितीयेक राक्षेस ते बोंबलीती।

कितीयेक ते थोर जाली रूदंती । कितीयेक राक्षेस ते चर्फडीती।।

सभामंडपी गुदगुल्या तो करीतो । मुखें नासिकें कर्ण छेदूनि नेतो।

बळें गाल सर्वांग तो वर्बडीतो । चिरे ओडितो फाडितो गुर्गुरीतो।।

हनुमंताने लंकेत हाहाकार उडविला. त्याने लंकेतील अनेक नागरिकांना शेपटीच्या साहाय्याने विवस्त्र केले. लोक नागव्याने लज्जित होऊन इकडे-तिकडे धावू लागले. लंकेतील लोकांची 'न भूतो न भविष्यती' अशी फजिती हनुमंताने केली. या सर्व बातम्या कळल्यावर रावण संतापला. त्याने पाठविलेले प्रचंड सैन्य हनुमंताने मारून टाकले.

हनुमंताचे लंकेत आगमन होईपर्यंत लंकेतील नागरिकांना असे वाटत होते की, रावणाने सीता पळवून आणली, हा रावणाचा खाजगी प्रश्ान् आहे. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. मात्र हनुमंताने सीतेचे अपहरण हा लंकेचा सार्वजनिक प्रश्ान् केला. रावणाने हनुमंताची शेपटी जेव्हा जाळली, तेव्हा हनुमंताने सर्वप्रथम रावणाच्या दाढी-मिशा जाळल्या, असे समर्थ म्हणतात. वस्तुत: रावणाला दाढी-मिशी असल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही. परंतु तत्कालिन राज्यकतेर् दाढी मिशावाले होते. म्हणून समर्थ सांकेतिक भाषेत जनजागरण करतात. हनुमंताने रावणाचा संपूर्ण दारूगोळा आपल्या शेपटीने पेटवून दिला. लंकेत सर्वत्र आगीचे डोंब आणि धुराचे लोंढे दिसत होते. काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते. सुंदरकांड म्हणजे केवळ हनुमंताचा पराक्रम होय.

- सुनील चिंचोलकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive