Tuesday, August 20, 2013

Review of "chennai express" movie in marathi


करमणुकीची सुसाट एक्सप्रेस 'चेन्नई एक्सप्रेस'


chennai


रोहित शेट्टी हे नाव घेतलं की, सिनेमात लांबलचक स्टारकास्ट, जोडीला ग्लॅमरस कचकड्याच्या बाहुल्यांचा (हिरोइन्स) भरणा, चकचकीत लोकेशन्स, बरं संगीत, ठरलेले अॅक्शन सीन्स असं सगळं असणार हे समजण्याइतका प्रेक्षक हुशार आहे. अशी समजूत करुन घ्यायला प्रेक्षकांचाही नाईलाज आहे म्हणा. 'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स', 'सिंघम', 'बोलबच्चन' अशा रोहितच्या एकसुरी सिनेमांवरुन प्रेक्षक सगळं ओळखून आहे. पण, वेगळं काही देण्याच्या प्रयत्नात त्याने 'चेन्नई एक्सप्रेस' बनवला. यात फरक इतकाच की, यात कलकारांचा भरणा नसल्यामुळे कथा भरकटत नाही. गुंतागुंतीची वाटत नाही. काही गोष्टी वगळता रोहितच्या नेहमीच्या सिनेमांसारखाच हा सिनेमा आहे. पण, करमणूक करतो हे नक्की.

चाळीस वर्षीय राहुल(शाहरूख खान) त्याच्या लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यामुळे आजी-आजोबांसोबत राहत असतो. आजोबांचा पिढ्यानपिढ्या चालू असलेला मिठाईचा बिझनेस तो सांभाळत असतो. आजोबांचं निधन झाल्यावर त्यांच्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरला करण्याची त्यांची शेवटची इच्छा आजी राहुलला सांगते. पण, गोव्याच्या समुद्रातच अस्थी विसर्जित करायचं राहुल ठरवतो. आजीला चकवण्यासाठी चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसतो आणि तिथून त्याच्या भलत्याच प्रवासाला सुरुवात होते. तिथे त्याची भेट होते ती मीनाशी (दीपिका पदुकोण). त्या एक्सप्रेसमधून मधल्याच एका स्टेशनवर उतरणारा राहुल मीनामुळे तिच्या गावात जाऊन पोहोचतो. आणि तिथून सगळा खेळ सुरू होतो. मीनाचे वडील तिथले डॉन असतात. त्यामुळे त्यांच्या तावडीतून राहुलला सोडवण्यासाठी मीना एकामागून एक खोटं बोलत जाते. मात्र या नाटकात ते दोघे स्वतःच कसे फसतात, त्यातून कसे बाहेर पडतात, प्रेमात कसे पडतात, मग त्यातून मार्ग कसा काढतात हा सगळा करमणुकीचा सावळागोंधळ म्हणजे 'चेन्नई एक्सप्रेस'.

'डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन' हा संवाद वारंवार आहे. रोहितच्या जवळपास प्रत्येक सिनेमात असे टिपिकल पंचेस असतात. 'आता माझी सटकली' हा 'सिंघम'मधला असेल किंवा 'बोल बच्चन'मधलं अजय देवगणचं चुकीचं इंग्लिश असेल, असे पंचेस ठरलेले. ही त्याची स्टाइल इथेही दिसतेच. पांचट विनोद, अतिशयोक्तीचे अॅक्शन सीन्स असं सगळं काही त्याच्या नेहमीच्या सिनेमाप्रमाणे यातही आहेच. शाहरुखला विनोदी भूमिकेत बघताना थोडं जड जातं खरं. पण, यात त्याने मजा आणली आहे. त्याने त्याचं काम चोख केलंय. तमिळ भाषा न समजण्यामुळे त्याचा होणारा गोंधळ शाहरूखने मस्त दाखवलाय. दीपिका ग्लॅमरस नसली तरी सुंदर दिसली आहे. तिने तमिळ भाषेचा हेल चांगला धरलाय. हिंदी भाषा बोलताना तो जाणवतोही. मात्र तोच हेल तिने इंग्लिश बोलतानाही आणला असता तर अजून मजा आली असती. तिच्याकडून या सिनेमात खूप अपेक्षा होत्या. त्या सगळ्याच पूर्ण झाल्या नाहीयेत. पण, ती आता एकेक पायरी पुढे जातेय हेही खरंय. बाकी दीपिकाच्या वडिलांची भूमिका करणारे सत्यराज आणि तंगबली या धिप्पाड माणसाची भूमिका करणारा निकीतीन धीर या दोघांचाही अभिनय ठीकठाक.


एक गोष्ट खटकते, ती म्हणजे तमिळ भाषेचा अतिवापर. सिनेमा चेन्नईच्या पार्श्वभूमीवर असला तरी तमिळ भाषेचा वापर खूप केलाय. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना तमिळ भाषा येत नाही ते इथे काहीसे गोंधळतील. सबटायटल्स म्हणून दीपिकाचा चांगला वापर करुन घेतलाय. पटकथा अजिबात गुंतागुंतीची नाही. पण, सिनेमाचा पूर्वार्ध जेवढा करमणूक करतो तेवढा उत्तरार्ध रटाळ वाटतो. मध्यंतरानंतर सिनेमाचा अंदाजही बांधता येतो. पूर्वार्धात कथा वेगळी वाटते, तेवढीच उत्तरार्धात ओळखीची वाटते. त्यामुळे तोचतोचपणा येतो. नेहमीप्रमाणे हिरोइनच्या घरच्यांना हिरोच खलनायक वाटणार, मग तो एकटा पंधरा-वीस जणांशी मारामारी करणार, त्यात जिंकणारही, असे ठरलेले सीन्स यातही आहेत.

आपण हिंदीत बोलतोय आणि ते इतरांना समजू नये म्हणून हिंदी गाण्यांच्या चालीवर बोलण्याचे शाहरूख-दीपिकाचे सीन्स खूप मजेशीर आहेत. त्यांची पहिली भेट आणि शेवटचा शाहरूखचा मारामारीचा सीन, तसंच दीपिकाचा हात तिच्या वडिलांनी धरुन ठेवणं हे सीन्स 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ची हमखास आठवण करुन देतात. विशाल-शेखर यांनी पुन्हा एकदा जादू केली आहे. प्रत्येक गाण्याचा ठेका डुलायला लावतो. अधेमधे येणारं चेन्नई एक्सप्रेस हे पार्श्वसंगीत भारीच. 'वन टू थ्री फोर...' हे आयटम साँग तर 'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' हे हलकंफुलकं गाणं फ्रेश वाटतं. शाहरुख आहे म्हटल्यावर रोमँटिक गाणं नाही हे केवळ अशक्य. त्यामुळे 'तितली' हे सॉफ्ट रोमँटिक गाणं तयार झालं. 'तितली' आणि 'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' या गाण्यातली दृश्यं उत्तम आहेत. सिनेमॅटोग्राफीही उत्तम. चेन्नई एक्सप्रेस जवळून मग लांबून शूट करताना कॅमेरा फिरलाय तो भन्नाट. आजूबाजूला पाणी आणि मध्ये एका पुलावर फक्त एक्सप्रेस. त्याच्यामागे मोठे धबधबे. हे दृश्य सुखद. ते कॅमेऱ्यात कमालीचं बंदिस्त केलंय.

एकुणात, डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा नक्कीच बघू शकता. शाहरुख आहे म्हणून काही वेगळं शोधण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुम्हालाच त्रास होईल. सिनेमा फक्त एंजॉय करा बास... एक गंमत अशी की, सिनेमा संपला तरी लगेच खुर्ची सोडून उठू नका. कारण, शेवटाला जो 'लुंगी डान्स' आहे, त्याचा सिनेमाशी काहीही संबंध नसला तरी ते गाणं मोठ्या पडद्यावर बघायला नक्कीच मजा येते. सो डोंट मिस इट....



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive