जयंतराव साळगांवकर यांचे निधन
कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचे आज (मंगळवारी) पहाटे सव्वापाच वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तब्येत बिघडल्यामुळे मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. आज दुपारी तीनच्या सुमारास दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोमवारी दुपारी जयंतरावांची तब्येत एकदम खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र जयंतराव साळगांवकर यांचे एक-एक अवयव निकामी होत गेले. औषधांना प्रतिसाद मिळणे बंद झाले आणि पहाटे सव्वापाच वाजता जयंतराव साळगांवकर यांची प्राणज्योत मालवली.
साळगांवकरांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
जयंतराव साळगांवकर यांच्याबद्दल...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये एक फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. एकट्या मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) खप ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.
कालनिर्णयचे संस्थापक-संपादक असलेल्या जयंतरावांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते.
सार्वजनिक क्षेत्र
श्री सिद्धिविनायक मंदिर , मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.
आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.
मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष.
श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता , सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक , अध्यक्ष.
श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष.
महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.
इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष.
दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त.
महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.
१९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.
सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान , आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटक.
कोल्हापूर येथे २९-३० एप्रिल इ.स. १९९१ रोजी झालेल्या आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
मुंबईत झालेल्या अखिल महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे स्वागताध्यक्ष.
श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या विद्यमाने आणि गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने सातारा येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
आणखी कितीतरी ट्रस्टवर आणि सेवाभावी सार्वजनिक संस्थात पदाधिकारी.
लेखन
' सुंदरमठ ' ( समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी)
' देवा तूचि गणेशु ' ( श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास आणि स्वरुप , तसेच समाजजीवनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा).
' धर्म-शास्त्रीय निर्णय ' ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन
आतापर्यंत विविध सामाजिक , ऐतिहासिक , धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध.
' कालनिर्णय ' या नऊ भाषेतून निघणा-या वार्षिक नियतकालिकाचे (कॅलेंडरचे) संस्थापक-संपादक.
' पंचांग ' ह्या क्षेत्रांत सुलभता आणि शात्रशुद्धता आणण्याचे यशस्वी प्रयत्न. पंचांगाचा परंपरागत साचा बदलून नवीन स्वरूपात पंचांगाचे संपादन.
महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ' प्रातःस्मरण ' या सदरात जानेवारी २००९ पासून प्रत्येक मंगळवारी प्रसिद्ध झालेले लेख
' सगुण-निर्गुण दोन्ही समान ' ( महाराष्ट्र टाइम्समध्ये ' सगुण-निर्गुण ' या सदरातून २००३-२००६ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ११६ लेखांचा (संदर्भ टीपांसह) संग्रह)
' देवाचिये द्वारी ' ( धार्मिक , पारमार्थिक अशा स्वरुपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने १९९५ मध्ये लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह).
' सुंदर ते ध्यान ' ( देवाचिये द्वारी भाग-२) (१९९६ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३११ लेखांचा संग्रह).
' अमृताची खाणी ' ( देवाचिये द्वारी भाग-३) (१९९७ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' आनंदाचा कंद ' ( देवाचिये द्वारी भाग-४) (१९९८ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' ज्ञानाचा उद्गार ' ( देवाचिये द्वारी भाग- ५) (१९९९ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).
' दूर्वाक्षरांची जुडी ' (' देवाचिये द्वारी ' १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन)
' गणाधीश जो ईश ' ( श्रीगणेशावरील लेख व मुलाखती. वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
' रस्त्यावरचे दिवे ' ( आयुष्यात घडलेल्या , अनुभवाला आलेल्या , तसेच कोणाकडून तरी समजलेल्या प्रत्यक्ष घटनांवर आधारित साप्ताहिक ' रविवारचा सकाळ ' मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह)
' भाव तोचि भगवंत ' ( दैनिक सकाळ मध्ये ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात २००५-२००६ ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १०८ लेखांचा संग्रह)
पुरस्कार आणि गौरव
ज्योतिर्भास्कर(संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी).
ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी).
ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).
महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.
नाशिकच्या पुण्यश्लोक सद्गुरूच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ' वैदिक पुरस्कार ' देऊन गौरव.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ' भ्रमंती पुरस्कार '.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.
छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती , मुंबई तर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.
महाराष्ट्र कला निकेतन तर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ' महाराष्ट्र रत्न ' पुरस्कार.
कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ , मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ' ज्योतिक कौस्तुभ ' पुरस्कार.
श्री समर्थ सेवा मंडळ , सज्जनगड , सातारा यांच्यातर्फे ' समर्थ संत सेवा पुरस्कार '
रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) , पुणे यांच्या वतीने धर्मसंस्कृती क्षेत्रातील " परम पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार २०१० '.
No comments:
Post a Comment