Tuesday, August 20, 2013

River Sarswati Still Exist!!

सरस्वती नदी आजही आहे!


सरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे तिचा, तिच्या उपनद्यांचा  हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला. पण या परिसरातल्या  उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी एक मिथक होती असं कोणीही म्हणू शकणार नाही.

‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट गेले काही दिवस सरस्वती नदीच्या उगमाच्या आणि उगमाबरोबरच तिच्याकडे असलेल्या अनेक गुपितांचा शोध घेत सरस्वतीच्या खोऱ्यात प्रवास करत होता. आदिबद्री, कुरु क्षेत्र आणि नंतर पिओहा या मार्गानंतर ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा प्रवास पुढे सुरू झाला. या पुढच्या मार्गावर त्यांनी काही पुरातत्त्व स्थळांना (archaeological sites) भेटी दिल्या.
सरस्वती नदीच्या खोऱ्यामधल्या काही पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही स्थळांना भेटी दिल्या. सरस्वती नदी ही एखादी नदी नव्हती. सरस्वतीला एकूण सात छोटय़ामोठय़ा नद्या जोडल्या गेल्या होत्या. ही सर्व पुरातत्त्वीय स्थळे या सात नद्यांच्या क्षेत्रात सापडतात. या सात नद्यांची मिळून सरस्वती ही माता आहे असा त्यांचाऋग्वेदात उल्लेखही आहे. या सात नद्यांचा महाभारतातही उल्लेख सापडतो. त्यातल्या काही प्रमुख उपनद्यांची नावं गंभीरा, दृषद्वती आणि आज जी नदी अस्तित्वात आहे ती म्हणजे घग्गर अशा तीन महत्त्वाच्या उपनद्या आहेत.
घग्गर
सरस्वतीच्या उपनद्यांपैकी घग्गर, पावसाळ्याचे काही महिनेच का होईना पण आजही अस्तित्वात आहे. घग्गरचं पात्र आजही मोठं आहे. पावसाळ्यात ही नदी बऱ्यापैकी नियमित वाहात असते. सरस्वतीच्या मार्गातूनही या नदीला काही ओढे-नाले मिळतात आणि ती पुढे पाकिस्तानच्या दिशेने वाहायला लागते. ती पाकिस्तानात पोचते तेव्हा तिला हाकारा म्हणतात. भारतामध्ये ती राजस्थानमधला अनुपगढ ओलांडून सरस्वती नदीचं प्राचीन पात्र ओलांडून ती प्रवास करते. ती जेव्हा कच्छच्या रणाच्या जवळून वाहते तेव्हा तिला नारा अशा नावानं ओळखलं जातं. तिथे सरस्वती नदीचा त्रिभुजप्रदेश तयार झालेला आहे. तो त्रिभुजप्रदेश म्हणजे आजचं कच्छचं रण. या सगळ्या वाटेची सुरुवात ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने कुरु क्षेत्रापासून केली.
इतिहासाला आव्हान देणारी राखीगढी
राखीगढी हे हरियाणा राज्यातल्या हिसार जिल्ह्य़ामधील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. हे दृषद्वती आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाजवळ असलेलं स्थळ आहे. इथे सात टेकाड आहेत. तिथे आपल्याला पुरातनकालीन संस्कृतीचे अवशेष सापडतात. इथे ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला एखादी पुरातत्त्वीय जागा कशी शोधायची याचीही माहिती झाली असं ते सांगतात.
एखादे पुरातत्त्वीय स्थळ कसे शोधायचे?
एखादे टेकाड असते. अगदी लहान. म्हणजे आपण साधारण १००-१५० पावलांमध्ये ती चढून जाऊ शकू असे. त्या टेकडीला अगदी बारीक अशा मातीच्या भांडय़ांचं कवच आलेलं असतं. म्हणजे आपली नेहमीची टेकडी आपल्याला ज्या रंगाची दिसते तिथेच एक कोलाज केल्यासारखे मातीच्या भांडय़ांचे तुकडे दिसू शकतात. काहीवेळा त्यात मातीच्या भांडय़ांचा वरचा भाग असतो, काही चित्रकला केलेले तुकडे असतात, बांगडय़ा असतात. त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्यांचे अवशेषही आपल्याला दिसून येतात. हे दिसलं की या टेकाडाच्या पोटात काही लपलेलं असू शकतं.
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने जेव्हा या स्थळाला भेट दिली तेव्हा हे स्थळ त्यावर संशोधन करून तो भाग पुन्हा बुजवून टाकण्यात आला होता. इथे १३-१४ वर्षांपूर्वी उत्खनन करून झालेलं होतं. यां उत्खननामध्ये शास्त्रज्ञांना एक संपूर्ण शहर दिसून आलं होतं. या स्थळावर खोल्या आहेत, शौचालये आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी अतिशय प्रगत व्यवस्था आहेत. त्याचबरोबर इथे लोकांना बसायची जागा आणि एक मोठे व्यासपीठही आहे. याचबरोबर इथे बळी द्यायची व्यवस्थाही केलेली दिसते. या सर्व रचनांचे अनेक अर्थ शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पद्धतीने लावूशकतात. राखीगढीमध्ये त्यांना यज्ञ करण्याची सोयही आढळली. खरंतर आज जे प्रागैतिहासिक गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहे, त्याप्रमाणे इथे या सगळ्या गोष्टी सापडायला नकोत. पण जर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सापडत असतील तर त्यामुळे हा सर्व इतिहास बदलण्याची शक्यता आहे. २००३ नंतर इथलं उत्खनन थांबलं. त्यानंतर गेली अनेक र्वष यावर काही नवीन ज्ञान उपलब्ध झालं नाही. पण आता परत या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी पुण्यातल्या डेक्कन कॉलेजचे सह-संचालक वसंत शिंदे यांना मिळाली आहे. या वर्षीपासून या स्थळावर त्याचं संशोधन सुरू होईल.
ही राखीगढी ३०० हेक्टरमध्ये पसरली आहे. ही जागा मोहंजोदडोपेक्षाही मोठी आहे. एवढंच नव्हे तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही जागा सिंधू संस्कृतीपेक्षाही प्राचीन असणार आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार इथे मिळालेले अवशेष हडप्पा किंवा मोहंजोदडोवर मिळालेल्या अवशेषांपेक्षा प्राचीन आहेत. या सर्व कारणांमुळे राखीगढी ही जागा अतिशय महत्त्वाची ठरते.
राखीगढीमध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’ला वजीरसिंग नावाचे गृहस्थ भेटले. ते सुरुवातीपासूनच राखीगढीमध्ये राहायला आहेत. त्यांनी अनेक र्वष या पुरातत्त्वीय स्थळाचा अभ्यास केला आहे आणि अनेक र्वष ते इथल्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. हे काम करता करता त्यांनी इथल्या स्थळांवर मिळालेल्या अनेक वस्तूंचा संग्रह केला आहे. त्या संग्रहात अनेक मडकी, धातूची अवजारं, मातीपासून, शंखापासून आणि खडय़ांपासून बनवलेले दागिने, लहान मुलांची खेळणीही आहेत. या खेळण्यांमध्ये असणारा मातीचा खुळखुळा अजूनही वाजतो. या खेळण्यांमध्ये अनेक प्राण्यांच्या प्रतिकृतीही आहेत. यामध्ये बैल आणि कुत्रा हे आहेत. इथल्या काही खेळण्यांना चाकाची व्यवस्था केली आहे. याचबरोबर त्यात अत्तराची किंवा काजळाची कुपीही पाहायला मिळते. या सगळ्या वस्तूंचं एक छोटं संग्रहालय करून त्यांनी त्यांच्या घरात ठेवलं आहे. आज राखीगढीमध्ये जरी उत्खनन सुरू नसलं तरी त्यांच्या घरातला हा खजिना बघितल्यावर इथे काय काय सापडू शकेल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तिथे मिळालेल्या माहितीनुसार ही जागा हडप्पाकालीन आहे. इ.स.पूर्व ३५०० ते ४००० वर्षे जुनी ही जागा आहे. हा काळ हडप्पापेक्षा थोडा आधीचाच आहे. खरंतर अशी उत्खननाची जागा जपली गेली पाहिजे, पण आज ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने पाहिलेली जागा आणि तशा अनेक जागा यांची व्यवस्थित निगा राखली गेलेली दिसत नाही. राखीगढीवर आज फक्त काही गोवऱ्या थापल्या गेल्या आहेत. तिथे गेल्यावर हे इतकं महत्त्वाचं क्षेत्र आहे हे आपल्याला पटकन लक्षातही येणार नाही अशी अवस्था इथली आहे. त्याच्या सभोवताली कुठलंच पक्कं कंपाऊंड नाही. पणआर्किऑलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने लावलेली कोणतीही पाटी किंवा त्यांच्या अस्तित्वाची कोणतीही खूण आपल्याला दिसत नाही. हे जवळजवळ सगळ्याच पुरातत्त्वीय क्षेत्रांचं चित्र आहे!
आजच्या राखीगढीमध्ये फिरताना जुन्या शहराच्या काही भिंती अजूनही दिसतात. गावाच्या काही बोळातून फिरताना मध्येच एक मातीची भिंत दिसते, हे वजीरसिंग ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला दाखवत होते. आज हे गाव या प्राचीन शहराच्या ठिकाणी उभं आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला आजच्या बांधकामाबरोबरच त्या ५ ते ६ हजार वर्षांपूर्वी केलेल्या बांधकामाचे नमुनेही बघायला मिळतात. खूप भारावून टाकणारं हे चित्र असतं.
अग्रोहा
वजीरसिंग यांनी सांगितल्यानुसार ‘प्रोजेक्ट मेघदूत’ने त्यांच्या पुढच्या सफरीच्या वाटेवर असणारं अग्रोहा हे ठिकाण गाठलं. अग्रोहाला पोहोचेपर्यंत सूर्य मावळलेला होता. तिथे पोचताच एक फलक लावलेला होता ‘प्राचीन स्थळ’ म्हणून. तिथे गेल्या गेल्याच विटांचा एक मोठा थर दिसत होता. त्याबरोबरच बऱ्याचशा तुटक्या मडक्यांचे अवशेषही दिसत होते. आत्तापर्यंत बरेच लहान तुकडे दिसत होते, पण तुकडे त्यापेक्षा बरेच मोठे होते. सूर्य मावळलेला होता आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरामधली बॅटरीही संपत आली होती. तसेच पुढे गेल्यावर एक मोठ्ठी तटबंदीसारखं ठिकाण दिसत होतं. ते ठिकाण कदाचित तेव्हाच्या शासकाचा राजवाडा असू शकेल. खाली एक पाटी होती, त्या पाटीनुसार ‘अग्रोहा’ हे ठिकाण फिरोजशहा तुघलकच्या शासनकाळापर्यंत वाणिज्य आणि राजकीय घडामोडींचं एक प्रमुख ठिकाण होतं. कारण हे ठिकाण प्राचीन वाणिज्य मार्ग तक्षशीला ते मथुरा यावर होतं. काहींच्या म्हणण्यानुसार हे प्राचीन शहर महाराजा अग्रसेनने वसवलं होतं. याचा उल्लेख पाणिनीने लिहिलेल्या अष्टाध्यायीमध्ये झालेला आहे. पुरातात्त्विक उत्खननातून हे स्पष्ट होतं की, इ.स.पूर्व चौथ्या-तिसऱ्यापासून ते तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत इथे वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ झाला आहे. शक, कुशाण काळापासून ते गुप्त साम्राज्यापर्यंतच्या अनेक प्रकारच्या वस्तू इथे सापडतात. इथल्या काही पत्र्याच्या मुद्रांवर ब्राह्मी लिपीमधून काही लिखाणकाम केल्याचं आढळून आलं आहे.
इथे जी रचना पाहायला मिळाली ती बरोबर नालंदासारखी दिसणारी होती. म्हणजे इथे काही ना काही कॉन्फरन्सेस चालत असणार अशी ही रचना होती. त्याचबरोबर भरपूर शौचालये एकानंतर एक अशी लागून होती. त्याचबरोबर हॉस्टेल्ससारख्या अनेक खोल्या तिथे होत्या. तिथे एक मोठं व्यासपीठही होतं. म्हणजे इथे काही ना काही प्रकारचं विद्यादान होत असावं अशी ती वास्तुरचना होती. कदाचित सरस्वती नदीच्या पात्रामधील आधीच्या प्रगत संस्कृतींमुळे या पुढच्या राजवटींनी ही जागा बांधली असावी.
फतेहगडच्या वाटेवर- बनावली
या नंतरचा प्रवास हा प्रत्यक्ष सरस्वतीच्या खोऱ्यातला असणार होता. राखीगढीनंतर ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा प्रवास फतेहगडच्या वाटेवर सुरू झाला. या भागातील बरेचसे लोक हे फाळणीच्या दरम्यान पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झालेले मुसलमान होते. तरीही या भागामध्ये मुसलमान शैलीच्या रचना अतिशय कमी आहेत. मुस्लीम नावं खूप कमी आहे. तसेच, जशी दग्र्यात बांग ऐकू येते तशी बांगही या भागात ऐकू येत नाही.
या भागात फिरण्यासाठी मदत म्हणून सरस्वती नदीवर काम करणाऱ्या दर्शनलाल जैन यांनी त्या भागाची माहिती असलेली एक व्यक्ती या गटाबरोबर इकडचा भाग दाखवण्यासाठी पाठवली होती. दर्शनलाल जैन हे सरस्वती शोध प्रतिष्ठानतर्फे सरस्वती नदी पुनर्प्रवाहित करण्यासाठी या भागात काम करत असतात. त्यांनी या गटाला दोन ठिकाणांची नावं सांगितली. त्यातल्या एकाच नाव बानवली. या ठिकाणहून वेगवेगळ्या काळांची माहिती आपल्याला मिळू शकते. एक म्हणजे पूर्व हडप्पा, उत्तर हडप्पा. तेव्हाच्या विशेषत: नियोजनबद्ध गृहरचना, पक्क्या विटांनी बनवलेली घरे इत्यादी बघायला मिळतात. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, मौल्यवान दगड हेही मिळतं. इथे एक सुंदर विहीरही दिसली. ही विहीर साधारणत: पाच हजार वर्षांपूर्वींची असेल आणि याच्याच काही अंतरावर सरस्वती वाहात होती. ही विहीर एका घराच्या खोलीमधली होती. अशा अनेक विहिरी लोकांनी आपापल्या घरांमध्ये बांधल्या असणार. या ज्या विहिरी होत्या त्या काळात इथे मान्सून कमी झालेला होता, पण शेजारीच सरस्वती नदी वाहात असल्यामुळे भूगर्भातील पाणी हे लोक वापरत असावेत.
कुणाल गावामध्ये सरस्वतीचा पुरावा!
बानवलीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा गट कुणाल या गावी पोचला. कुणाल हे राजा अशोकाच्या मुलाचं नाव. त्याच्या नावांनी ही जागा नंतर प्रसिद्ध झाली असं म्हणतात. इथे पोचेपर्यंत क्षितिजापर्यंत प्रचंड शेती दिसत होती. प्रचंड भात शेती. हे दृश्य खरंतर वरून पाऊस पडत असताना दिसलं तर ते योग्य वाटतं, पण आकाश बघितलं तर निळशार आकाश. आणि खाली विरुद्ध चित्र जमिनीवर- पाण्याने भरलेली शेती आणि भात. आणि ही सर्व शेती ही जमिनीच्या पाण्यावर सुरू होती. तिथे या गटाला तेजेंदर सिंग नावाचा शेतकरी भेटला. तिथे गेल्या गेल्या यांनी सरस्वती नदीविषयी सांगायला सुरु वात केली. ‘‘ये वो जगा है जहांसे सरस्वती बहती थी!’’ त्यांनी पुढे जाऊन मेघदूताच्या गटाला एक मार्ग दाखवला, जिथून सरस्वती वाहात होती.साधारण फाळणीपर्यंत इथून ती वाहात होती असं त्याचे आजोबा त्याला सांगायचे अशी त्याची आठवण होती. पण आता हे सगळं लोकांनी बुजवून टाकलं असंही तो सांगत होता.

कधी कधी जेव्हा पाऊस चांगला होतो तेव्हा इथून पाणी वाहायला लागतं असंही सांगत होता. एक नैसर्गिक वाहणारा, काही ठरावीकऋतूंमध्ये सुरू असणारा हा नदीचा प्रवाह अडवला गेला होता. नुसता अडवला नाही तर त्या प्रवाहाची वाट बुजवण्यात आली होती. वाट बुजवून त्यावर वस्तुत: सहा महिने जेव्हा त्या प्रवाहात पाणी नसेल तेव्हा शेती करायची सोडून लोकं बाराही महिने त्या बुजवलेल्या नदीच्या पात्रात आपली शेती करत होते. तिथले काही लोकं तर त्या प्रवाहाला सरस्वती म्हणत होते. पण त्या सरस्वतीचं महत्त्व त्यांना माहीत नव्हतं. माहीत असतं तर हा प्रवाह बुजवला गेला नसता कदाचित.
फाळणी, स्पर्धा आणि सरस्वती
तेजेंदर सिंग आणि त्यांचे आजोबा इथे फाळणीनंतर राहायला आलेले होते. त्यामुळे त्यांना फाळणीच्या आधीच्या सरस्वती नदीची स्थिती माहीत नाही. या गावांमध्ये राहणारी सर्वच लोकं फाळणीनंतर इथे वसलेली. ते वसले कारण इथे शेती चांगली होत होती. तेव्हा भारत सरकारपुढे या सर्व जनतेला पोसायचं कसं, असा प्रश्न होता. त्या वेळी त्यांना तिथली त्यांच्या कुटुंबाच्या प्रमाणात जमीन कसायला देऊ केली. जमीन यांच्या ताब्यात दिली, पण ती जमीन त्यांच्या नावावर नव्हती. पण या जमिनीवरून तुम्हाला कोणी काढणार नाही अशी ग्वाहीही भारत सरकारने तेव्हा त्यांना दिली होती. हे करताना सरस्वती नदीच्या बाबतीत एक मोठी चूक घडली. लोकांनी ही नदी पाहिली होती, तिच्या कमरेएवढय़ा पाण्यामधून ते ६०च्या दशकापर्यंत गेलेलेही होते. पण त्या वेळेच्या सरकारी दस्तावेजांमध्ये कुठेही ‘सरस्वती नदी’ असा उल्लेख नव्हता.
इथे वसलेल्या लोकांना भारत सरकारने सरस्वती नदीच्या पात्रातल्याही काही जमिनी देऊ केल्या होत्या, पण त्यांना केवळ सहा महिने त्यावर शेती करायची असं बंधन होतं. कारण बाकीचे सहा महिने इथले नाले त्या प्रवाहामधून वाहणार होते. नाले असंच तेव्हा म्हटलं गेलं होतं, कारण उल्लेखांमध्ये सरस्वती असं नावच नव्हतं. सुरुवातीला लोकांनी हा करार पाळला, पण त्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापायी हे ओढे, हे प्राचीन प्रवाह लोकांनी बुजवायला सुरू केले. आज बाराही महिने लोकं या प्रवाहांमध्ये शेती करतात.
‘प्रोजेक्ट मेघदूत’ने पंजाब रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या वेळेला नक्की काय घडलं हे शोधून काढायला सुरुवात केली. तेव्हा असं लक्षात आलं की, त्या वेळेला दिल्या गेलेल्या जमिनीमध्ये ६ लाख ११ हजार एकर जमीन ही हंगामी नद्यांच्या आणि नाल्यांच्या काठाची होती. आज या भागात कोणतेही हंगामी प्रवाह वाहताना दिसत नाहीत. बहुतेक ठिकाणी या हंगामी नाल्यांचे मूळ प्रवाह बुजवण्यात आलेले आहेत. हे सर्व प्रवाह पूर्वी सरस्वती नदीला मिळत होते. आता हे प्रवाहच बुजवले गेल्यामुळे सरस्वती नदीत पाणी येणार कुठून?
सरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे सरस्वती नदीचा किंवा तिच्या उपनद्यांचा ठिकठिकाणी हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तेव्हाचे सर्व दस्तावेज ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारकडे चालत आलेले आणि त्यात कोणताही बदल केला गेला नव्हता. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्येही सरकारने हे नाले समजून सरस्वती नदीच्या पात्रात शेती करायला परवानगी दिली. फाळणीच्या आधी मात्र ही नदी मॉन्सूनच्या काळात विनाअडथळा वाहात होती. तेजेंदर सिंगसारखे या कुणाल गावातले शेतकरी त्यांच्या सरस्वती नदीच्या आठवणी आजही सांगतात.
कुणालचं दुर्लक्षित क्षेत्र
‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट कुणालच्या उत्खनन केलेल्या ठिकाणी पोचला. ही जागा दुर्लक्षाची परिसीमा आहे! इथे कोणाचंच लक्ष नाही. पुण्यात बसून या ठिकाणाचं वर्णन ऐकताना एक वेगळं दृश्य आपल्यासमोर दिसत असतं. आपण एका अतिशय प्रगत आणि जगातल्या काही सर्वात जुन्या संस्कृतीचा अभ्यास करायला चाललो आहोत अशी समजूत असते. कदाचित याचा पूर्ण अभ्यास झाला तर सिंधू संस्कृतीचं मूळ घेऊन आलेल्या आपल्या संस्कृतीचा इतिहास कदाचित बदलला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी गेल्यावर चित्र अगदीच वेगळं असतं. इतक्या मुलभूत संशोधनाच्या विषयावर इतकं गंभीर दुर्लक्ष का, असा प्रश्न पडतो.
इथे आत शिरताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. रखवालदारासाठी एक खोली तयार करून ठेवलेली, पण रखवालदार गायब. बाहेर कम्पाऊंड. त्याच्या तारा तुटलेल्या. लोकं रीतसर उत्खनन केलेल्या क्षेत्रांमधून माती काढून नेतात. आतमधले अवशेष तसेच एक्स्पोज्ड पडून असतात. तिथे बऱ्याच गोष्टी दिसत होत्या- मोठय़ा थाळ्या, रांजण असं बरंच काही होतं. हे अवशेष पाच हजार वर्षांहून जास्त जुने आहेत. इथे एक प्राचीन संस्कृती अस्तित्वात होती. जवळून सरस्वती नदी वाहाते आहे, त्या सरस्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या एका प्राचीन शहराच्या ठिकाणी राहात आहोत या प्रकारची कोणतीही जाणीव हे ठिकाण बघताना झाली नाही. तशी जाणीव व्हावी अशी कोणतीही रचना तिथे अस्तित्वात नव्हती. या सर्व क्षेत्रात मिळालेल्या अवशेषांवरून या जागेची परंपरा मोहंजोदडो-हडप्पापेक्षाही मागे जाते.
हे सर्व बघून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट दुसऱ्या दिवशी कालीबंगला पोचला. इथेही राखीगढीसारखेच काही अवशेष बघायला मिळतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा सरस्वतीच्या अगदी काठावर वसलेली आहे. या सगळ्या उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी हे एक मिथ्य होती असं कोणीही म्हणू शकणार नाही. या सर्व मार्गावर लोकांना १२००पेक्षा अधिक उत्खनन क्षेत्रे सापडली आहेत आणि ही सर्व सरस्वती किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर वसलेली आहेत. यांचा काळ चार हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या आणि हा असा काळ होता जेव्हा या भागातला मान्सून हा चांगला होता. नंतर मान्सून कमी झाला, नदीची पात्रं कोरडी पडली आणि आज ही सगळी प्राचीन संस्कृती जमिनीखाली दडली गेली आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive