ई-मेल अॅड्रेस आणि वेबसाइट अॅड्रेस (यूआरएल) मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमधून वापरता येणे लवकरच शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ इंग्रजी भाषेमुळे इंटरनेटपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भाषेत ई-मेलमधील मजकुराबरोबरच ई-मेल आयडी देखील स्वतःच्या भाषेतून वापरता येणार आहे. ' सेंटर फॉर अॅडव्हान्स कम्प्युटिंग ' तर्फे (सी-डॅक) यासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून , लवकरच ते सर्वांना उपलब्ध होणार आहे.
' सी डॅक ' चे सहसंचालक आणि ' ग्राफिक्स अँड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रीप्ट टेक्नोलॉजी ' ( जिस्ट) विभागाचे प्रमुख महेश कुलकर्णी यांनी ' मटा ' ला ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या प्रकल्पासाठी ' सी-डॅक ' तर्फे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून , विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून काही बाबींची पूर्तता झाल्यानंतर लवकरच प्रादेशिक भाषांमधील ई-मेल अॅड्रेस आणि वेबसाइट अॅड्रेस नागरिकांनी उपलब्ध होतील.
' सध्या विविध देशांमधील वेबसाइट्सच्या अॅड्रेसमध्ये त्या त्या देशाच्या नावाची आद्याक्षरे जोडण्यात येतात. (उदा. भारतासाठी डॉट आयएन , ब्रिटनसाठी डॉट युके इत्यादी). परंतु , आता ' डॉट भारत ' हे नवीन डोमेन नेम सर्वांना उपलब्ध होईल.
सध्या ' डॉट आयएन ' चे रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देणाऱ्या ' नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया ' तर्फेच (निक्सी) ' डॉट भारत ' या डोमेनमधील रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचे सर्व नियमनही ' निक्सी ' तर्फेच करण्यात येणार असून , त्याला आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान ' सी-डॅक ' च्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे ,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.
सुरुवातीच्या टप्प्यात देवनागरी लिपीतील हिंदी , मराठी , कोकणी , नेपाळी , डोंगरी , बोडो , मैथिली व सिंधी या भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी संबंधित भाषांमधील लेखनाचे नियमही लक्षात घेण्यात आले आहेत. तसेच , प्रादेशिक भाषांमधील वेबसाइटचा इंग्रजी भाषेतूनही शोध घेता यावा , यासाठी ' सी-डॅक ' तर्फे विशेष सर्च इंजिन टूल विकसित करण्यात येणार आहे.
फसवणूक टळणार
सध्या इंग्रजी लिपीतील एकसारखे दिसणारे शब्द वापरून बनावट वेबसाइट विकसित करून , त्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचे (फिशिंग) गुन्हे समोर येत आहेत. तसा प्रकार प्रादेशिक भाषांमध्ये यूआरएल असलेल्या वेबसाइटच्या बाबतीत होऊ नये , यासाठी ' सी-डॅक ' तर्फे विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी वेबसाइटचे नाव तयार करताना त्या भाषेत ते नाव अगोदर आले आहे का , याचा शोध घेता येणार आहे. तसेच , त्यासारखा दिसणारा दुसरा शब्द वापरून नवीन वेबसाइट बनविण्याचा प्रयत्न झाल्यास , तो स्वीकारला जाणार नाही , अशी व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे. त्यामुळे या वेबसाइट ' फिशिंग ' हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment