उत्तमे ढमढमे पादे, टाराटुरीच मध्यमे,
पादांनाम फुस्कुली राणी, तस्य घाणीं न जायते
असा एक वात्रट श्लोक लहानपणी ऐकला होता. बाकी कविता
पाठ करायला कठीण जातात, पण असे श्लोक पटकन पाठ होतात. नुसते पाठच होत नाहीत
तर दीर्घकाळ लक्षातदेखील राहतात.
चारचौघात ‘पादणे’ हे आजकाल निषिद्ध समजले जाते. ४०-५०
वर्षांपूर्वी ही क्रिया खोकणे, शिंकणे, ढेकर देणे इ. क्रियांप्रमाणे
नैसर्गिक समजली जात असे. पादणे या विषयावर सर्वच भाषांमध्ये विपुल प्रमाणात
विनोद उपलब्ध आहेत. जानेवरी २०११ मध्ये अफ्रिकेमधील एका चिमुकल्या देशात
(रिपब्लिक ऑफ मालावी) त्यांच्या कायदा मंत्र्याने एक घोषणा केली की, आपल्या
देशात नवा ‘वातावरण प्रदूषण नियंत्रण कायदा’ अस्तित्वात येणार आहे. या
कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व पादणे यावर कायद्याने बंदी
घालण्यात येईल व त्यासाठी दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात येईल.
आयफोनवर बटण दाबताच पादण्याचे विविध आवाज काढणारा
प्रोग्राम दाखल होताच, पहिल्याच दिवशी त्याने १०,००० डॉलर्सची कमाई केली.
मराठीत तर ‘पादा पण नांदा’, ‘पादऱ्याला पावटय़ाचे
निमित्त’ अशा म्हणी वापरात आहेत. पण पादणे म्हणजे नक्की काय? हा सवयीचा भाग
आहे की आजार?
आज ‘गॅसेस’च्या त्रासामुळे गांजलेल्या लोकांची संख्या
इतकी जास्त आहे की उद्या एखाद्या डॉक्टरने ‘गॅस स्पेशालिस्ट’ म्हणून
जाहिरात केली तर त्याला गर्दी आवरणार नाही.
खाताना व पिताना अन्न-पाण्यासोबत आपण हवाही गिळत असतो.
खाता-पिताना उसंत न घेता खूप बोलण्याची सवय असलेल्यांच्या पोटात जास्ती
हवा शिरते. म्हणजे जेवताना घुमेपणाने जेवावे असे नाही तर घास गिळून मग
बोलावे. काही जणांच्यात अॅसिडिटीमुळे किंवा अन्ननलिकेच्या स्नायुंचा ताण
कमी झाल्यामुळे हवा आत शिरते. बारीकसारीक गोष्टीतही खूप टेन्शन घ्यायची सवय
असलेल्या लोकांच्याही पोटात खूप हवा शिरते.
गॅसेस झालेल्या माणसाने अन्न जास्त
शिजवून खावे. खाता खाता हसणे, बोलणे टाळावे. जिरे, कोथिंबीर, ओवा, हळद,
हिंग यांचा जेवणातील वापर किंचित वाढवावा. सामिष अन्न टाळण्याची गरज नाही.
ताक, दही यांचा वापर सोसेल त्याप्रमाणे वाढवावा.
काही काही जणांमध्ये ही
पोटातील हवा ढेकरा येऊन बाहेर पडते. या लोकांना मग पाठीत दाबले की ढेकर
येते व आपल्या अंगात सगळीकडे गॅस भरला असून त्यामुळे अंग दुखते असा समज
होतो. माझ्या माहितीतील एका मुलीला लग्न जमेना म्हणून खूप टेन्शन आले. त्या
टेन्शनमधून तिला हवा मिळण्याची सवय लागली. नंतर नंतर तर तिला अंगाला
कुठेही हात लागला की ढेकर यायची. तिचं लग्न कसंबसं ठरलं. होणाऱ्या
नवऱ्यासोबत सिनेमाला गेली असता मुलाने हिचा हात हातात घेताच हिला ढेकर
यायची. त्या तीन तासात तिने इतक्या वेळा ढेकरा दिल्या की तिचं लग्न मोडलं.
पुढे मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार करून घेतल्यानंतर आता ती सुखाने नांदते
आहे.
ही गोष्ट तशी ‘विरळा’ असली तरी तोंडावाटे पोटात हवा
अनेकजण गिळतात. गॅसेसमधला एक भाग असतो तो या हवेचा. दुसरा घटक म्हणजे
खाल्लेले अन्न न पचता मोठय़ा आतडय़ापर्यंत पोहोचले की, तिथे असणारे
सूक्ष्मजीव या अन्नावर प्रक्रिया करतात आणि गॅस तयार करतात.
पिष्टभाज्या, गहू, ज्वारी इ. तृणधान्य व विविध फायबर
(जे खाण्याची आजकाल गरज असते व फॅशन होत चालली आहे) हे मोठय़ा आतडयात
गेल्यावर गॅस तयार होतो, पण यात नायट्रोजनयुक्त पदार्थ खूप कमी असल्याने या
गॅसला वास नसतो.
पण सामिष अन्न, डाळी इ.मुळे तयार होणाऱ्या गॅसला वास असतो. काही वेळा जिआर्डिसिससारख्या इन्फेक्शनमुळे पण गॅसेस
होतात. बरेचदा गॅसेस दाबून धरल्याने बद्धकोष्ठाची सवय लागते. या गॅसमधील
काही भाग आतडय़ातून रक्तात शोषला जाऊन फुफ्फुसातून बाहेर पडतो किंवा घामातून
बाहेर पडतो. म्हणूनच गॅसेस खूप झाले असल्यास घामाला वास येऊ शकतो. दिवसा
गॅस दाबून ठेवला तर तो रात्री झोपेत असताना बाहेर पडू शकतो.
याला उपाय म्हणजे गॅसेस झालेल्या माणसाने अन्न पूर्ण
शिजवून (थोड जास्त शिजवून) खायला हवे. खाता खाता हसणे, बोलणे टाळावे.
जिरे, कोथिंबीर, ओवा, हळद, हिंग यांचा जेवणातील वापर
किंचित वाढवावा. सामिष अन्न टाळण्याची गरज नाही. ताक, दही यांचा वापर
सोसेल त्याप्रमाणे वाढवावा.
मुख्य म्हणजे ‘व्यायाम’. नियमित व्यायामाने पचनशक्ती सुधारते व गॅसेसवर नियंत्रण येते.
जास्तीच त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने
डायजेस्टिव एन्झाइम्स्, सेमेथिकोन, अॅक्टिवेटेड चारकोल, प्रोबायोटिक्स
किंवा काही वेळा अॅण्टिबायोटिक्स देऊन डॉक्टर उपचार करू शकतात.
हे सर्व झाले गॅसेसच्या घटकांबद्दल. पण गॅस बाहेर
पडणे ही स्वतंत्र क्रिया आहे. किती आवाज करावा, त्याचा व्हाल्यूम, पिच काय
असावे हे सर्व खोकणे, शिंकणे आणि शिळ घालणे या क्रियांप्रमाणे असते.
काहीजणांना वाटते की खोकल्याचा आवाज हा आपल्या नियंत्रणात नसतो. काही जण
कमी जास्त आवाजात खोकू शकतात. तसेच शीळ घालणे व गॅसेसच्या बाबतीत म्हणता
येईल.
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत पाश्चात्य देशात
पादण्याचे कार्यक्रम करणारे व्यावसायिक कलाकार होते. ते दोन-दोन तासाचे
स्टेज शो करीत असत. जोसेफ प्युजाँल नावाचा सर्वश्रेष्ठ पादकार (फ्लातुलसित)
होऊन गेला. हा गिटार, फ्लूट, पिआनो इतकेच काय विमान, वादळ आणि भूकंपाचा
आभास निर्माण करीत असे. १८९४ ते १९०० या जुन्या काळात तो एका शोसाठी
२०,०००, हो वीस हजार फ्रँक बिदागी घेत असे.
मेरलिन मन्रो, अॅडॉल्फ हिटलर यांच्यासारख्या अनेक
अतिप्रसिद्ध व्यक्तींना नियंत्रणाबाहेर असणारा गॅसेसचा त्रास होता. हिटलरला
तर स्ट्रिचनीन (स्तरयचहनिन) आणि बेलाडोनाचे इतके डोस दिले गेले (जे विषारी
पदार्थ त्या काळी गॅसवर औषध म्हणून वापरले जात) की हिटलरच्या एकूण
वागण्यात त्या विषाचा परिणामही असावा असे जाणकार म्हणतात.
अमेरिकेमध्ये ‘अंडर-इझ’ नावाच्या अंडरगारमेंटस्
बनवणाऱ्या कंपनीने कार्बन फायबर मिश्रित एअर टाइट अंडरवेअर्सचे पेटंट घेतले
आहे. यात रिप्लेसेबल फिल्टर्स आहेत. ज्यात गॅरंटी असते की तुम्ही पादा, पण
लोकांना ते कळणार नाही. त्यांची जाहिरातच आहे की Relieve pain without
shame, increase your social confidence & wear them for ones you
love.
सेंट ऑगस्टीन ने ‘द सिटी ऑफ गॉड’ (पाचव्या शतकातील
लिखाण) यात स्वर्गनगरीतील लोकांचे वर्णन केले आहे की, हे देवाच्या
कृपाछत्राखालील लोक आपल्या मनाप्रमाणे सातत्याने मधुर आवाजात हवा (गॅसेस)
सोडू शकतात की गाण्याच्या मैफिलीचाच भास व्हावा. सेंट ऑगस्टीन पुढे असेही
म्हणतो की, ‘अॅडम आणि इव्ह’चे पहिले पाप म्हणजे ‘ही’ कला ते हरवून बसले.
(हा गॅसेसबद्दल लिहिणारा ऑगस्टीन आणि समुद्र आचमनी पिऊन टाकणारा अगस्ती
नावामध्ये किती साम्य आहे ना?)
आज काळ बदलला. संगीताप्रमाणे भासणारे मधुर पादणे
जाऊन कार्बनयुक्त अंडरवेअर घालण्याचा काळ आला. आपल्यासारख्या
सर्वसामान्यांना दोन्ही परवडणारे नाही.
सुपाच्य माफक खाणे जिरे ओवा फोडणी देणे
भरपूर व्यायाम करणे इतकेच आपुल्या हाती
कालाय तस्मै नम:
|
|
No comments:
Post a Comment