बिकीनी घालेन, पण...
मराठी सिनेमात झळकलेले अनेक कलाकार पुढे हिंदी इंडस्ट्रीत गेले. वेगवेगळ्या सिनेमांमधून दिसले. सोनाली कुलकर्णी, गिरीजा ओक, राधिका आपटे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर अशी अनेक नावं घेता येतील. याच यादीत आता 'नटरंग'फेम सोनाली कुलकर्णीचं नावही आलंय. इंद्रकुमार दिग्दर्शित 'ग्रँड मस्ती' या कमर्शिअल हिंदी सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. सध्या हिंदी मसालापटांमध्ये असलेला बोल्ड दृश्यांचा ट्रेंड, तिथलं ग्लॅमर, तिथे फिटनेस-फिगरला असलेलं महत्त्व याबाबत ही सोनाली खूप जागरूक आहे. इतकंच नव्हे, मोठा बॅनर, चांगला दिग्दर्शक असेल तर बिकीनी ट्रेंड फॉलो करायलाही आपली हरकत नसेल, असंही तिने सांगितलंय. या बॉलिवूड पदार्पणाबाबत तिने खास 'मुंबई टाइम्स'शी संवाद साधला.
विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख यांच्यासोबत सोनाली 'ग्रँड मस्ती'मध्ये दिसतेय. हा सिनेमा सेक्स कॉमेडी या प्रकारात मोडतो. यापूर्वी 'क्या कूल है हम', 'क्या सुपर कूल है हम' या सिनेमांनंतर आता 'ग्रँड..' येतोय. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'अजिंठा', 'क्षणभर विश्रांती' असे सिनेमे करणाऱ्या सोनालीने हिंदी सिनेमा निवडला तो सेक्स कॉमेडी. 'हा माझा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. अशावेळी तुम्हाला निवडीचा अधिकार नसतो. सिनेमाच तुम्हाला निवडतो. बॉलिवूडमध्ये येणं माझं स्वप्न होतं. मला कमर्शिअल हिंदी सिनेमा करायचा होता. इंद्रकुमार यांच्यासारखा दिग्दर्शक मला मिळाला. सोबत हिंदीतले नावाजलेले नट होते. त्यामुळे ही संधी मला सोडायची नव्हती,' सोनाली सांगते.
कमर्शिअल सिनेमा स्वीकारताना सध्या बॉलिवूडमध्ये असलेल्या ट्रेंडवर ती लक्ष ठेवून आहे. 'बॉलिवूड खूप बोल्ड होतंय. पण याची तयारी ठेवायला हवी. मी अशी 'धाडसी' दृश्यं देईन की नाही याचं उत्तर आत्ता माझ्याकडे नाही. हे मी त्या त्या वेळी ठरवेन. जो निर्णय घेईन त्याचा मला पश्चात्ताप नसेल हे नक्की. मराठीच्या मानाने हिंदी इंडस्ट्री म्हणजे समुद्र आहे. या स्पर्धेत राहायचं तर या स्पर्धेचा भाग बनलं पाहिजे. फक्त आपण कुणासोबत काम करतोय, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. बिकिनी घालायलाही माझी ना नाहीय. उद्या 'यशराज' बॅनरचा सिनेमा मला मिळाला आणि तशी गरज असेल तर मी जरूर बिकिनी घालेन. कारण अशावेळी सिनेमा कोण दिग्दर्शित करतं तेही महत्त्वाचं असतं,' असंही तिला वाटतं. 'मराठीतून हिंदीत जाताना खूप काही शिकण्यासारखं असतं. पण त्यावर अधिकारवाणीने बोलायला मी खूप नवखी आहे. अजून काही काळानंतर मी त्यावर अधिकारवाणीने बोलू शकेन,' असंही सोनालीने स्पष्ट केलं.
त्यांचा दृष्टिकोनच चुकीचा
मराठी अभिनेत्री ही टिपिकल महाराष्ट्रीय भूमिकाच करू शकते असा समज हिंदी निर्माते, दिग्दर्शकांमध्ये असल्याचं सोनालीला वाटतं. 'माझा 'नटरंग' अनेकांनी पाहिला. त्यावेळी मला फारशा ऑफर आल्या नाहीत. पण, आज मी जेव्हा अनेक हिंदीतल्या लोकांना भेटते तेव्हा मी बोल्ड ग्लॅमरसही दिसू शकते हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते चकित होतात. आता त्यांचा दृष्टिकोन बदलू लागलाय', असंही तिने सांगितलं.
No comments:
Post a Comment