Thursday, August 22, 2013

Alibag's Frog - Travelling Essay


लक्षात राहिला अलिबागचा बेडूक


beduk
दहावीत असतानाची गोष्ट असेल. आमच्या शाळेची सहल निसर्गरम्य अलिबागमध्ये गेली होती. आमचं हॉटेलसुद्धा मस्त समुद्रकिनारीच होतं. हिवाळ्यातला गारवा मन उल्हासित करत होता. आम्हा वीस मुलींना एक डॉर्मिटरी दिली होती. बरोबर आमच्या एक मॅडम पण होत्या. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही समुद्रावर फिरायला गेलो. त्यानंतर अकराच्या सुमारास परतलो. सहलीचं वातावरण असल्याने झोप कुणालाच येत नव्हती. मॅडम पण पुस्तक वाचत बसल्या होत्या. काही मुली झोपल्या, काही पत्ते खेळत बसल्या होत्या, काहींच्या गप्पा रंगल्या होत्या. आमच्यातली एकजण, नूतन पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पित असतानाच अचानक एक भलामोठा बेडूक तिच्या नजरेस पडला. 'ई...बेडूक' अशी जोरदार किंचाळी तिने मारली. ते ऐकल्याबरोबर झोपलेल्या सगळ्याजणी खडबडून जाग्या झाल्या. पेंगुळलेल्यांची झोप उडाली. मीही उठले ते माझ्या नावाने मारलेल्या आरोळीने. 'राधा, ऊठ रूममधला बेडूक तुझ्या बेड जवळ आलाय.' 'बेडूक...बेडूक ...' असा गलबला रुममध्ये झाला होता.

समुद्र किनाऱ्या नजिकचं हॉटेल असल्याने अशी मानसिक तयारी होती. झुरळाला, पालीला घाबरणाऱ्या आम्ही सगळ्या मुली, बेडूक आलाय म्हटल्यावर जाम घाबरलो होतो. ती आरोळी ऐकून मी बेडकासारखी उडी मारून बेडवरून उठले. मी बाजूला झालेली बघून बेडकाने उडी मारून थेट माझा बेड पटकावला. नंतर बेडूक आणि आमच्यात शिवा -शिवीचा खेळ चालू झाला. आमच्या पळा-पळीने, आरडाओरड्याने बेडूक बिथरला. तो रूमभर जिथे-तिथे उड्या मारू लागला. मध्येच तो कुणाच्या तरी जवळ यायचा. मग काय...तिची पाचावर धारण बसायची. अख्ख्या डॉर्मिटरीमध्ये आम्ही पळत होतो.

विशेष म्हणजे एवढा गोंगाट सुरू असूनही माझी बहिण मालती तशीच डाराडूर झोपून होती. सगळ्याजणी तिला हलवतायत, उठवतायत तरी ही आपली झोपूनच. बेडकाने शेवटची उडी मारली ती मालतीच्या कपाळावर. तिच्या डोक्यावर बसला. आम्ही जोरात किंचाळलो. आम्ही बेडकडून मागे झालो. त्या किंचाळल्याने मालती उठली खरी. डोळे उघडते तो बेडूक कपाळावर बसलेला बेडूक. ती किंचाळणार तोच मॅडमनी ऑर्डर केली, की तिला पकडा अगोदर. आम्ही भीत-भीतच मालतीचे हात-पाय घट्ट पकडले. मॅडमनी बेडकाच्या अंगावर टॉवेल टाकला आणि त्याला पकडलं. तोपर्यंत आमचा आरडाओरडा बाहेर ऐकू गेला होता. आमच्या गोंगाटाने आजुबाजूच्या रूममधले इतर विद्यार्थी, शिक्षक व हॉटेल सेवक डॉर्मिटरीबाहेर जमा झाले. मॅडमनी दार उघडलं. टॉवेलमध्ये पकडलेला बेडूक वळवळ करत होता. त्यांनी अगोदर तो टॉवेल मॅनेजरच्या हातात दिला आणि सुटकेचा निश्वास टाकला. मालती चांगलीच घाबरली होती. थंडीतसुद्धा तिला दरदरून घाम फुटला. आमची अवस्था तर हसावं का रडावं अशी झाली होती. बेडूक बाहेर गेला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आजही अलिबागचं नाव ऐकलं की समुद्रकिनारा वगैरे आठवण्याअगोदर आठवतो तो बेडूक.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive