Saturday, August 24, 2013

Review of marathi cinema "Popat"


 

पोरांचा ‘पोपट’!

 Popat.jpg
ही गोष्ट आहे आजच्या काळातली. कोल्हापूरजवळ असलेल्या कुलपे गावातली. या गावात रघुनाथ हिवळे, मुकुंद बोराडे आणि बाळ चिंचुके हे तीन जिगरी मित्र रहातायंत. रघुला मोठ्ठा नट व्हायचंय. मुकुंदाला खूप शिकायचंय. पण, तो सतत नापास होतोय. परंतु, नव्या नव्या गोष्टी लिहिण्यात त्याला आनंद मिळतो आणि तिसरा आहे बाळू. बोलायला गोड. याच बळावर अनेकांना ठगवणारा, इरसाल मुलगा. तिघांच्या आवडी तीन तोंडांना असल्या तरी त्यांची मैत्री 'जगात भारी' आहे.

नीट शिकून-सवरून पोरं नाव काढतील अशी अपेक्षा या तिघांच्याही कुटुंबांना नाही. पण, या तिघांना मात्र मोठ्ठं व्हायचंय. काय करायचं.. कसं करायचं या विवंचनेत तिघेही आहेत. अशावेळी या गावात एड्स जनजागृतीचं सरकारी अभियान धडकतं. कुलपे गावचा सरपंच या योजनेतल्या एका कामाची जबाबदारी बाळू आणि कंपनीवर सोपवतो. या मुलांसाठी ही योजना म्हणजे 'उजेड' असते. ही मुलं आपल्या परीने काम करू लागतात. परंतु, दरम्यान अनपेक्षित एक अपमानास्पद अनुभवातून हे तीन मित्र जातात. ही घटना त्यांचं आयुष्य बदलते. नैराश्याची जागा बंड घेतं आणि मुलं नव्या ध्येयाने प्रेरित होतात. त्यांच्या या धडपडीला बळ मिळतं ते जनार्दनमुळे. जनार्दन हा पलिकडच्याच गावातला फोटोग्राफर. या तिघांच्या ध्येयाला जनार्दनमुळे 'दृष्टी' मिळते आणि हे चौघे ठरवलेलं काम करण्यासाठी झगडू लागतात. त्यांचा हा गमतीदार संघर्ष म्हणजे सतीश राजवाडेचा नवा 'पोपट' आहे.

'प्रेमाची गोष्ट'नंतर अवघ्या सहा महिन्यांत सतीशने हा दुसरा सिनेमा लोकांसमोर आणला आहे. 'मुंबई पुणे मुंबई', 'प्रेमाची..' अशा आजवरच्या सिनेमातून सतीशने नव्या पिढीचे नवे विचार मांडले होते. हे सगळे सिनेमे 'शहरी' होते. 'पोपट' करताना मात्र त्याने पहिल्यांदाच ग्रामीण बाज हाती घेतला आहे शहरासोबत सिनेमा 'मास'लाही अपील व्हावा अशा दृष्टीने प्रयत्न केला आहे. वेगळा विषय, आजवर त्याने कधीच केलेली ग्रामीण मांडणी आणि सिद्धार्थ मेनन, अमेय वाघ, केतन पवार यांच्यासारखे ऊर्जेदार नवे कलाकार घेतल्याचा फायदा 'पोपट'ला झाला आहे. या तीनही कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांमधून धमाल उडवली आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचा परिणाम म्हणून या तिघांची दृश्य खुसखुशीत बनली आहेत. त्याला अतुल कुलकर्णीसारख्या अभ्यासू कलाकाराचीही साथ आहे. अनिता दाते, नेहा शितोळे या मुलींनीही या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिरेखा साकारल्यात. त्यामुळे सिनेमा खिळवून ठेवतो यात शंका नाही. या तीन मुलांच्या काही दृश्यांनी तर पोट दुखेस्तोवर हसू येतं. विशेष उल्लेख करावा लागेल तो 'व्हॅनिटी व्हॅन'मधल्या गमतीचा. त्या वयात असलेली आणि नवखेपणाच्या औत्सुक्यात दडलेली निरागसता या मुलांनी पुरेपूर दाखवली आहे. संवादांचाही महत्त्वाचा वाटा त्यात आहेच. त्यामुळे हा सिनेमा निश्चितच रंजन करतो.
 या नव्या प्रयत्नात मात्र थोडी अडचण निर्माण झाली आहे ती कथेची आणि पटकथेची. कथा ही स्वतः दिग्दर्शकाची आहे. या सगळ्या मुलाम्यात एड्स जनजागृतीचा डोस आहे. आपल्याकडे गेल्या १०-१२ वर्षांपासून ही जागृती सुरू असल्यामुळे गोष्टीचा प्लॉट जुना वाटतो. शबाना आझमीच्या 'एड्स छुने से नहीं फैलता'पासून 'बलवीर पाशा'सारख्या अॅड कॅम्पेन सरकारने २००२-०३ पासून सुरू केल्या.

सोबत गावांमध्ये जसा टीव्ही शिरला तसा त्या एका छोट्या पडद्याने संपूर्ण घराला शहाणं केलंच शिवाय आज मोबाइलने वयापेक्षा जास्त मोठंही बनवलं. त्यामुळे एड्सबाबत या मुलांचं पराकोटीचं 'अनभिज्ञ' असणं पटत नाही. त्यात पटकथेचेही काही भाग खूप रटाळ बनले आहेत. आपला वेग ठरवून चित्रपट सुरू होतो. सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांची मानसिकता एस्टॅब्लिश झाल्यानंतर येणाऱ्या पथनाट्याच्या प्रसंगामुळे मात्र हा वेग विद्युत वेगाने खाली येतो. केवळ खालीच येत नाही, तर कथानकातून तुम्हाला खेचून बाहेर काढतो. हा एक पॅच गेल्यानंतर पुन्हा सिनेमातल्या कथेला सुरूवात होते. त्यावेळी हा वेग पुरता शून्यावर आलेला असतो. शिवाय, सिनेमासाठी घेतलेल्या 'ऑडिशन्स' विनोदी असल्या, तरी हे प्रकार यापूर्वी अनेकदा सिनेमात वापरले आहेत. त्यामुळे त्यात नाविन्य उरत नाही. स्वाभाविकपणे सिनेमा लांबतो. अर्थात, ही गोष्ट दोन पातळ्यांवर पुढे जाते. या मुलांचं आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे सरकणं आणि त्याचवेळी जनार्दनचा तीव्र होत जाणारा संघर्ष यामुळे 'पोपट'ची उत्सुकता जिवंत राहते.

सिनेमात ऊर्जा भरून उरलीये ती तीन मुलांमुळे. अमेय वाघ (रघु) हा अनेक प्रसंगांमध्ये डोळ्यांतून कमाल व्यक्त झाला आहे. सिद्धार्थ मेनन (बाळू), केतन पवार (कुंड्या) यांनीही अनेक प्रसंगांमध्ये आपली चुणूक दाखवलीय. सोबत अतुल कुलकर्णीही आहेच. अभिनय येण्याचा अभिनय त्याने खुबीने साकारलाय. यासोबत जनार्दनचा संघर्ष, त्याचा पश्चात्ताप यातून त्याने पुरेसा ताण निर्माण झाला आहे. अनिता दाते, नेहा शितोळे, मेघा घाडगे यांनी समजुतीने कामं केलीत.

उरला प्रश्न संगीत, पार्श्वसंगीताचा. तर संगीत बरंय. पार्श्वसंगीतही इतरवेळी चपखल आहे. पण, शेवटचा जनार्दनच्या शोधाशोधीचं पार्श्वसंगीत कानाला खटकतं. बाकी ऑल इज वेल. एकुणात कथेत नावीन्य आणून पटकथा आणखी करकचून बांधली असती तर 'पोपट' अधिक चांगला 'उडाला' असता. सध्या हा सिनेमा बघताना तो अधेमधे थोडा रेंगाळतो. तोच सिनेमातलं त्रिकूट पडद्यावर अवतरतं आणि सिनेमा पुन्हा धावतो. सिनेमाचं नाव पोपट असलं तरी या पोरांनी सिनेमाचा मात्र 'पोपट' होऊ दिलेला नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive