टाइम प्लीज: संशयकल्लोळ लग्नानंतरचा..
कादंबरीवर आधारित सिनेमा, एखाद्याच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा अशा प्रकारांमध्ये नाटक, एकांकिकेवर बेतलेला सिनेमा हा प्रकार मराठी इंडस्ट्रीत आता रुजु होऊ पाहतोय. अशा प्रकारांमध्ये 'सिनेमॅटिक लिबर्टी' हा एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय. तो असायलाही हवा. नाटकापेक्षा काहीतरी वेगळं सिनेमात दाखवण्याची माफक अपेक्षा रास्त आहे. मग तो क्लायमॅक्स असेल किंवा पटकथेत झालेला बदल. पण, यापैकी काही झालं नाही तर मात्र सिनेमाला फारसं यश मिळत नाही. मग हाती चांगला विषय असूनही सिनेमा इम्प्रेस करत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'टाइम प्लीज' हा सिनेमा. सिनेमा चकचकीत, फ्रेश असला तरी मूळ विषय बाजूला गेल्यासारखा वाटतो. तर लिबर्टी म्हणून सिनेमात आणलेल्या काही नव्या गोष्टी अनावश्यक वाटतात.
'नवा गडी नवं राज्य' या नाटकाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणाईच्या मनात घर केलं. त्यातले संवाद त्यांना त्यांच्या मनातले वाटत होते. नाटकाची लोकप्रियता लक्षात घेऊन याचा सिनेमा काढायचं ठरलं. मात्र, नाटकाच्या 'लग्न' आणि 'नवरा-बायकोचं नातं' या विषयांपलीकडे जाऊन सिनेमा संशयाभोवती फिरतो. एका कलाकृतीचं माध्यमांतर करायचं म्हटल्यावर काही बदल आवश्यक आहेत हे खरं पण, मूळ विषयाला हात न घालता हे बदल असायला हवेत. इथे मात्र तसं दिसत नाही.
हृषिकेश (उमेश कामत) वय वर्षं तीस. याचं लग्न होतं ते चोवीस वर्षीय अमृता सानेशी (प्रिया बापट). हृषिकेश शिस्तप्रिय, काटेकोर वागणारा, टापटीप राहणारा. तर याउलट अमृता. उथळ, चंचल आणि बिनधास्त. तरी दोघं एकमेकांसाठी बनलेले. लग्न करुन सेटल होतात. आणि मग सुरु होतो संसार. अमृताच्या मनमोकळ्या स्वभावाची असल्यामुळे तिचा मित्रपरिवारही तसाच. लग्न झाल्यावर तीन महिन्यांनी तिचा मित्र हिंमतराव धोंडे-पाटील (सिद्धार्थ जाधव) या दोघांच्या घरी येतो. त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तिथेच दोन-चार दिवसांचा मुक्काम करतो. हृषिकेशच्या स्वभावामुळे अर्थातच, ते त्याला पटत नाही. हृषिकेशला अमृता आणि हिंमतरावाच्या नात्याविषयी असुरक्षितता वाटते. अशातच एंट्री होते ती राधिकाची (सई ताम्हणकर). राधिका म्हणजे हृषिकेशची कॉलेजची मैत्रीण. हे दोघं एकाच ऑफीसमध्ये काम करतात. आता अमृताला असुरक्षितता वाटू लागते. यावरुन दोघांमध्ये वादही होतात. मग काही दिवसांचा ब्रेक घ्यायचा ते ठरवतात. ब्रेक संपल्यानंतर सगळं सुरळीत सुरु होईल, असं वाटत असतानाच एक ठिणगी पडते आणि सगळी घडी पुन्हा विस्कटते.
अभिनय सगळ्यांचा चांगला झालाय. चंचल, उथळ आणि बिनधास्त अमृता प्रियाने उत्तम साकारली आहे. उमेशनेही त्याची भूमिका चोख बजावली आहे. सिद्धार्थचं काम मस्त. सईचाही प्रयत्न बराय. संवाद ही मात्र सिनेमाची उजवी बाजू. संवाद अजिबात क्लिष्ट न करता साधे, सरळ आहेत. आणि म्हणूनच ते 'आजचे' वाटतात. हे संवादलेखकाचं यश. गाणीही चांगली आहेत. यामध्ये अजून एक गोष्ट उल्लेख करण्यासारखी आहे, ती म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला एका गाण्यात लग्नाची तयारी, लग्नं आणि नव्या घरात येऊन राहणं हे सगळं दाखवलंय. त्यामुळे तिथे दिग्दर्शकाने वेळ वाचवलाय. पण, काही गोष्टींमध्ये वेळ वायाही घालवलाय. सिनेमातले काही प्रसंग टाळता आले असते. अमृताच्या मंगळागौरीचा प्रसंग, कोणा एकीच्या डोहाळेजेवणाचा प्रसंग, अमृताच्या घरी हृषीची मावशी तिला भेटण्याचा प्रसंग हे अनावश्यक होते. तसंच हिंमतराव त्याच्या परदेशी मित्रासोबतच्या प्रसंगाचीही गरज वाटत नाही. त्यामुळे सिनेमा सुरुवातीच्या त्या एका गाण्यामुळे मार्क कमवतो तर इथे मात्र गमावतो.
नाटकातले प्रिया-उमेशमधले तगडे संवाद सिनेमात मिसिंग वाटतात. राधिकाचा भूतकाळ, अमृताच्या आईची कहाणी या गोष्टी सिनेमात नवीन आहेत. पण, यामुळे अमृता-हृषिकेशचा मूळ ट्रॅक बाजूला जातो. अमृता किंवा हृषिकेशच्या आयुष्यातल्या काही नव्या घटना दाखवल्या असत्या तर वेगळी मजा आली असती. कथा या दोघांभोवती न फिरता काहीशी भरकटते. कथेत वेगळेपण आणलंय पण, ते मूळ पात्रांना धरुन असतं तर जास्त चांगलं झालं असतं. कथा लग्नानंतरच्या नातेसंबंध आणि लव्हस्टोरीपेक्षा एकमेकांच्या संशयाभोवती फिरते. सिनेमाच्या सुरुवातीला काही प्रसंग पात्रांची ओळख देण्यासाठी असतात. हे खरं असलं तरी ते सलग असले की प्रेक्षकांची लिंक लागते. ते इथे कमी पडताना दिसतं. प्रसंगांची साखळी तुटक वाटते. नाटकात ज्याप्रमाणे एका प्रसंगानंतर ब्लॅक आऊट होतो आणि नंतर दुसरा प्रसंग सुरु होतो. तसं सिनेमा बघताना वाटतं. त्यामुळे पटकथा अजून तगडी असायला हवी होती. पूर्वार्धात कथानक कोणत्या अंगाने जाणार, याचा अंदाज येतो. आणि उत्तरार्धात त्याची खात्री पटते. त्यामुळे यात वेगळेपण जाणवत नाही.
एकुणात, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या दोघांचा पहिला प्रयत्न म्हणून कौतुक आहे. पण, काही त्रुटी आहेत हे नाकारता येणार नाही. तरी नाटकाच्या प्रेमात असलेल्यांनी यात काहीतरी वेगळं बघायला मिळेल या अपेक्षेने सिनेमा बघू नका. सिनेमाचा लुक फ्रेश असल्यामुळे तो तुम्हालाही फ्रेश करेल हे मात्र नक्की.
.........................
निर्माताः प्रतिसाद प्रॉडक्शन्स आणि २४ कॅरेट एंटरटेन्मेंट
दिग्दर्शकः समीर विद्वांस
कथा, पटकथा, संवाद, गीतेः क्षितीज पटवर्धन
संगीतः हृषिकेश कामेरकर
कलाकारः उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, सीमा देशमुख, माधव अभ्यंकर
दर्जाः **+
No comments:
Post a Comment