लावणीक्वीनचं लेबल नकोय!
लावणी ही महाराष्ट्राच्या लोककलेचं महत्त्वाचं अंग असलं तरी लावणी नर्तिका हा शिक्का काही अभिनेत्रींसाठी त्रासदायक ठरु शकतो. लावणीक्वीन मेघा घाडगेही त्यामुळे वैतागलीय. काहीही करून तिला हा शिक्का नकोय. 'मी फक्त लावणी आणि तमाशापटातल्या भूमिका करू शकते असं लोकांना वाटतं. ते स्वतःच असं लेबल लावून मोकळे होतात, तेव्हा खूप राग येतो. मी फक्त लावणीच केली असती तर एकवेळ समजू शकते. पण इतक्या एकांकिका, नाटक आणि चित्रपट करूनही कुणी असं बोलणार असेल तर ते खटकणार नाही का?,' अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केलीय.
'पोपट' या आगामी चित्रपटात मेघा घाडगे आणि ऊर्मिला कानेटकर पाहुण्या कलाकार म्हणून एका गाण्यात दिसणार आहेत. या सिनेमातल्या गाण्यांची कोरिओग्राफी केलीय फुलवा खामकरने. या चित्रपटात तुम्ही केलेली लावणी इतर लावण्यांपेक्षा वेगळी कशी आहे असं विचारल्यावर ती म्हणाली की, 'बहुतेक वेळा चित्रपटसाठी किंवा एखाद्या टीव्ही प्रोग्रामसाठी ज्या लावण्या केल्या जातात त्यात थोडा बॉलीवूड नाच असतो. किंवा त्यांचा एक विशिष्ट साचा असतो. पण फुलवाने या लावणीत तमाशात होणाऱ्या अगदी खर्याखुऱ्या लावणीचा प्रकार बसवला आहे. जो एरव्ही सहजासहजी पाहायला नाही मिळत. त्यात मी माझं नृत्यकौशल्य ओतलं आहे. याच्या सर्व स्टेप्ससकट सगळी समीकरणं जुळून आली आहेत.' फेरारी की सवारी या हिंदी सिनेमातल्या 'मला जाऊ दे' या लावणीसाठीही आधी मेघा घाडगेला विचारणा झाली होती. तिने त्यासाठी 'हो'सुद्धा म्हटलं. पण काही दिवसांनी अचानक तिला कळवण्यात आलं की ते गाणं आता विद्या बालन करणार आहे. फेसव्हॅल्यूमुळेच ते गाणं हुकलं. पण त्या गाण्यासाठी माझा विचार केला होता ही गोष्ट सुखावून जाते, असं ती म्हणते.
No comments:
Post a Comment