Saturday, August 24, 2013

Review of madras cafe in Marathi


वेदनादायी भूतकाळाचा अस्वस्थ अनुभव

madras-cafe


'मद्रास कॅफे' हा सुजित सरकार दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर एकच प्रश्न मनात येतो - विक्रमसिंहला फक्त काही सेकंद आधी घटनास्थळी पोचता आलं असतं तर?.... तर... तर या देशाचा इतिहास आणि आजचं वर्तमान कदाचित पूर्ण वेगळं झालं असतं! प्रेक्षकाच्या मनात अशी तीव्र भावना निर्माण करण्यात मिळवलेलं यश या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.

यातली 'ती' घटना अर्थातच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची. तमिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर इथं २१ मे १९९१ रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मानवी बॉम्बच्या साह्यानं राजीव गांधींना मारण्यात आलं. श्रीलंकेतील एलटीटीई या तमिळ दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई रोखली गेली. नंतर या घटनेत एलटीटीईचा म्होरक्या वेलुपिल्लई प्रभाकरनचा हात स्पष्टच झाला. या सर्व घटनाक्रमाची सुरुवात भारतानं श्रीलंकेत पाठविलेल्या शांतिसेनेपासून झाली. राजीव गांधींचा हा राजकीय निर्णय आणि त्याचे त्यांना आणि देशाला भोगावे लागलेले भयानक परिणाम सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र, हा सर्व अस्वस्थ कालखंड हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आला नव्हता. 'विकी डोनर' हा आगळावेगळा सिनेमा देणाऱ्या सुजित सरकारनं 'मद्रास कॅफे'मधून प्रथमच हा विषय मांडण्याचं धाडस केलं आहे. विषयाची प्रामाणिक हाताळणी, बंदिस्त पटकथा आणि प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय यामुळं 'मद्रास कॅफे' हा एक अस्वस्थ करणारा, पण नक्की पाहावा असा सिनेमा ठरतो.

अर्थात हा सर्व वादाचा विषय असल्यामुळं दिग्दर्शकानं हे काल्पनिक कथानक आहे, असं सुरुवातीलाच जाहीर करून सर्व वादांतून स्वतःची सुटका करून घेतली आहे. शिवाय राजीव गांधी, प्रभाकरन यांचे थेट उल्लेखही नाहीत. पण त्यामुळं फारसं काही बिघडत नाही. समोर पडद्यावर चाललेल्या नाट्याचा निखळ आनंद घेण्यापासून हे अडथळे आपल्याला वंचित करू शकत नाहीत.गुप्तचर संघटना, गुप्तहेर आणि त्यांचे देश-परदेशांत चालणारे कारनामे यांचं एक वेगळंच विश्व आहे. आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे आणि आणि आपले वर्षानुवर्षांचे 'प्रेमा'चे संबंध पाहता, या देशांनी आपल्याकडे आणि आपण त्यांच्याकडे पाठविलेले गुप्तहेर आणि त्यांच्या माध्यमातून घडविले जाणारे घातपात, कटकारस्थानं, देवाणघेवाण, राजकीय निर्णयांचा अंमल, फंदफितुरी हे सर्व कुठल्याही सिनेमासाठी एक आकर्षक 'पॅकेज' आहे. सुजितनं या सर्व आकर्षक वेष्टनाचा यथायोग्य वापर करून त्याच्या गोष्टीतलं नाट्य खुलवलं आहे. शिवाय काल्पनिक कथा असं वर्णन केलं असलं, तरी आपण भारतीय उपखंडाच्या इतिहासातल्या एका अत्यंत भयानक, क्रूर आणि उद्वेगजनक अशा वांशिक संघर्षाविषयी टिप्पणी करीत आहोत, याचं भान सुजितनं कुठंही सोडलेलं नाही. त्यामुळंच एखाद्या 'लाइव्ह रिपोर्ताज'सारखी मांडणी करून त्यानं ही गोष्ट सांगितली आहे. नव्वदच्या दशकात श्रीलंकेत उसळलेला सिंहली-तमिळी संघर्ष, त्यात हस्तक्षेप करण्याचा भारताचा निर्णय, शांतिसेना पाठविण्याचा निर्णय, या शांतिसेनेचा एलटीफ (सिनेमातलं एलटीटीईचं नाव) या अण्णा भास्करनच्या (म्हणजे प्रभाकरन) संघटनेशी झालेला घनघोर संघर्ष, त्यात मारले गेलेले भारतीय जवान आणि या राजकीय निर्णयाची दोन्ही देशांतील सर्वसामान्य लोकांना मोजावी लागलेली जबर किंमत... या सर्व पार्श्वभूमीवर या सर्व घटनाक्रमात थेट सहभागी झालेला आणि माजी पंतप्रधानांची हत्या रोखण्यापासून केवळ काही सेकंद अंतर दूर राहिलेला आपला नायक विक्रमसिंह याचा प्रवास म्हणजे सुजितचा 'मद्रास कॅफे.'

कुठल्याही सिनेमाच्या यशस्वितेमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो पटकथेचा. इथं सोमनाथ डे आणि शुभेंदू भट्टाचार्य या जोडीनं लिहिलेली पटकथा निम्मी बाजी मारते. दोन देशांतला व्यापक राजकीय संघर्ष, आपली गुप्तचर संघटना व परदेशातील दहशतवादी संघटना यांच्यात रंगणारे डाव-प्रतिडाव आणि या सर्वांत एक महत्त्वाचा मोहरा असलेला 'रॉ'ने पाठविलेला गुप्तचर लष्करी अधिकारी विक्रमसिंह व त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर या सर्व घटना-घडामोडींचा होणारा परिणाम अशा तीन स्तरांवर त्यांनी ही पटकथा गुंफली आहे. सिनेमात वांशिक संघर्ष असला, तरी दिग्दर्शकानं तो फार रक्तरंजित किंवा क्रूरपणे न दाखवता केवळ काही छायाचित्रांतूनच त्यांची भीषणता स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह आणि त्याचा वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर चाललेला संघर्ष याचा सखोल वेध घेण्यावर दिग्दर्शकानं सर्व फोकस ठेवला आहे.

शांतिसेना तैनात केल्यानंतर श्रीलंकेतील स्थानिक निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधान श्रीलंकेला देतात. एलटीएफमध्ये फूट पाडून यशस्वीपणे निवडणुका घेण्याच्या कामी विक्रमसिंहची (जॉन अब्राहम) नियुक्ती होते. श्रीलंकेत शिरताना त्याची ओळख जया (नर्गिस फाकरी) या पत्रकार तरुणीशी होते. (हे पात्र प्रभाकरनची पहिल्यांदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकार अनिता प्रताप यांच्यावर बेतलेलं आहे, असं म्हणतात!) तेथून पुढे चेन्नईतील एका बॉसच्या सहकार्यानं विक्रमचं मिशन सुरू होतं. मात्र, पुढं त्याला अनेक धक्कादायक सत्यांचा सामना करावा लागतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही आघात होतात. एका संघर्षात अण्णा भास्करन (अजय रत्नम) मरण पावल्याचं जाहीर होतं आणि जखमी विक्रमच्या दृष्टीनं मिशन संपतं. पण अण्णा भास्करन जिवंत असल्याचं लवकरच समजतं. आता त्यानं त्याचे उरलेसुरले अंतर्गत विरोधकही संपविलेले असतात. त्याचं लक्ष्य एकच असतं - भारताचे माजी पंतप्रधान.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खबर विक्रमला जयाकडून समजते. आपल्याच संघटनेतील काही वरिष्ठांची फितुरीही त्याच्या लक्षात येते. आता त्याला दुहेरी धोक्यातून वाट काढीत माजी पंतप्रधानांना वाचवायचं असतं. दिल्लीतील त्याचे टॉप बॉस रॉबिन दत्त (सिद्धार्थ बसू) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तेही माजी पंतप्रधानांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, शेवटी दैवाचे फासे असे काही पडतात, की विक्रमला 'यट निअर... यट सो फार' असं म्हणायची वेळ येते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत तो कसौलीला निघून जातो. तेथे एका चर्चमध्ये फादरना ही सर्व हकीगत सांगतो आणि फ्लॅशबॅक तंत्रानं गोष्ट आपल्यापुढं उलगडत जाते.

सुजित सरकारनं पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत या सिनेमातील प्रतिपाद्य विषयाचं एक गांभीर्य कायम ठेवलं आहे. त्यामुळंच हा आपल्या वेदनादायी भूतकाळाचा एक अस्वस्थ करणारा अनुभव ठरतो. सुजितला सर्वच कलाकारांनी मनापासून साथ दिली आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो जॉन अब्राहमचा. त्यानं मोठ्या मेहनतीनं यातला विक्रम साकारला आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी. नर्गिस फाकरी, जॉनच्या पत्नीचं काम करणारी राशी खन्ना आणि सिद्धार्थ बसू यांनीही आपापली कामं जीव ओतून केली आहेत. बालाचं काम करणारा प्रकाश बेलवडी आणि अण्णा भास्करनचं काम करणारा अजय रत्नम हे दक्षिणेतले नटही लक्षात राहतात. राजीव गांधींची हत्या करणारी धनू, शिवरासन आदी मंडळीही 'जशीच्या तशी' साकारण्यात वेषभूषाकारांनी यश मिळवलं आहे. सिनेमाचं संगीत व पार्श्वसंगीत शंतनू मोईत्रा यांचं आहे. त्या आघाडीवरही सिनेमानं जबरदस्त कामगिरी केली आहे.

थोडक्यात, अजिबात वेळ न दवडता जाऊन पाहावी अशी ही कलाकृती आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive