रणभूमी : कुरघोडींची ‘लव्ह’भूमी
रणभूमी
कलाकार : विक्रम गोखले, मनोज जोशी, अमोल कोल्हे, शंतनू मोघे, उषा जाधव, ऊर्मिला कानेटकर
निर्माता : जयंत गिलाटर
दिग्दर्शक : शौनक शिरोळे
संगीत : साई-पियूष
वेळ : 124mins
सिनेमा प्रकार : Drama
राजकारणातील कुरघोडी हा आकृतिबंध नवीन नाही. आजवर राजकीय कथासूत्र गुंफलेले अनेक मराठी चित्रपट आले आणि यशस्वीही ठरले. (काही अपवाद) शौनक शिरोळे दिग्दर्शित 'रणभूमी' हा चित्रपट राजकारणातील कुरघोडी दाखवितो. विद्यापीठांच्या निवडणुकांचा गाभा असणारी आणि तगडे कलाकार घेऊन जमवलेली चित्रपटाची भट्टी बऱ्यापैकी जमली आहे. मध्यंतरानंतर तो वेग पकडतो आणि शेवटच्या भागामध्ये धक्कातंत्राचा वापर करून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. मात्र, कथेतील तोचतोचपणा आणि राजकारणातील कुरघोडींपेक्षा प्रेमाचा 'त्रिकोण', 'चौकोन' दाखविण्यात दिग्दर्शक गुंतल्यामुळे चित्रपटाचा मूळ विषय बाजूला पडतो.
आबासाहेब पाटील (विक्रम गोखले) आणि तात्यासाहेब इनामदार (मनोज जोशी) या स्पर्धक नेत्यांपासून कथा सुरू होते. आबासाहेबांचा मुलगा भाऊराव (शंतनू मोघे) आणि भाऊरावची प्रतिमा उजळण्यासाठी तारुण्यापासून धडपडत असलेला संदीप देशमुख (अमोल कोल्हे) या दोघांना राजकारणामध्ये वर्चस्व गाजवायचं आहे. मात्र, संदीपला भाऊराव पहिल्यापासूनच दुय्यम लेखतात. एकीकडे विद्यापीठ निवडणुकांत भाऊरावला संदीपमुळे यश मिळालं असतानाही संदीपला आपल्यापुढे जाऊ न देण्याचं भाऊरावने मनोमन ठरवलं आहे. पुढे, रश्मी (ऊर्मिला कानेटकर) ही कॉलेजच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. कॉलेजमध्ये आलेला नवा विद्यार्थी अंकुश महाजन (निरंजन नामजोशी) हा रश्मीच्या प्रेमात. दुसरीकडे संदीपला वारंवार तात्यासाहेब भाऊरावपासून दूर खेचण्याच्या प्रयत्नात. मात्र, एकनिष्ठ असलेला संदीप त्याला धुडकावून लावत आहे.
कथासूत्र इथपर्यंत मूळ गाभ्याला धरून आहे. मात्र, यामध्ये भाऊराव अचानक रश्मीच्या प्रेमात पडतो आणि चित्रपटाची गाडी 'प्रेमाच्या त्रिकोणाकडे' घसरते. रश्मी मिळावी आणि त्यासाठी संदीपने प्रयत्न करावे, असा भाऊरावचा विचित्र अट्टाहास. त्यासाठी तो अंकुशला जीवे मारण्यासही तयार आहे. आता या स्थितीत आपल्या मित्रांच्या म्हणजे रश्मी आणि अंकुशच्या बाजूने उभे राहायचे किंवा प्रतिस्पर्धी तात्यासाहेबांना साथ द्यायची का मग भाऊरावशी एकनिष्ठ राहायचे, अशा कात्रीत संदीप अडकतो. या गुंत्यात संदीप नक्की काय करतो? अंकुशवर जीवापाड प्रेम करणारी रश्मी अंकुशसाठी संदीपला साथ देते का तिच्या मनात काही वेगळे आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'रणभूमी' पाहावा लागेल.सुरुवातीच्या काही दृश्यांत कायम 'आउट ऑफ फोकस' असणाऱ्या एकनिष्ठ संदीपच्या अनेक 'पैलूं'ची ओळख करून देण्यासाठी दिग्दर्शक धक्कातंत्राचा वापर शेवटच्या दृश्यांमध्ये करतो. प्रेक्षकाला यातील काही बाबी अपेक्षित असल्या, तरी दिग्दर्शक ऐन वेळी घुमजाव करून प्रेक्षकांना धक्का देण्यात यशस्वी ठरतो. मात्र, पडद्यावरचा हा सारा संघर्ष राजकारणातील 'गेम' दाखविण्यापेक्षा प्रेमकथेच्या आणि सूडसत्रात रंगतो. राजकीय कारस्थानं, पैशाचं आमिष दाखवून 'सौंदर्याचा' (उषा जाधवचा गेस्ट अॅपिरन्स) करून घेतलेला वापर, वाट अडविणाऱ्याचा घोटलेला गळा असं सारं यापूर्वी अनेकदा पडद्यावर आलं आहे. ते पुन्हा दिसतं. अनेक बाबी अपेक्षित असल्यामुळे त्या पडद्यावर पाहताना नावीन्य वाटत नाही. चित्रपटाच्या मुळाशी असणारं सूडसत्रांचं दिग्दर्शकानं ठेवलेलं गुपितही अपेक्षित गोष्ट म्हणून पुढे येतं.
चित्रपटाचं दिग्दर्शन वेगवान असलं तरी ही कथा नक्की कोठे घडते, त्याचे संदर्भ कोठेही नाहीत आणि कंट्युनिटीत चुका घडल्या आहेत. अमोल कोल्हे, मनोज जोशी, शंतनू मोघे आणि ऊर्मिला कानेटकर यांचे अभिनय उत्तम. वेगळ्या रूपातील अमोल कोल्हे लक्षात राहतो. विक्रम गोखले यांच्या वाट्याला मोजके प्रसंग आल्याने त्यांचा योग्य वापर करून घेता आलेला नाही. गावरान संवाद ठसक्यात म्हणणारा मनोज जोशी अनेकदा भाव खातो.
कॉलेज विश्वात शिकताना नकळत राजकारणाकडे वळणारे व त्यानंतर राजकारणातच भरकटलेले युवक केंद्रित करून त्यांचं भावविश्व दाखविण्याची दिग्दर्शकाची तळमळ अनेक प्रसंगांत दिसते मात्र, तिचा एकत्रित प्रभाव ठसत नाही. प्रेमकथा हा कॉलेज जीवनातील महत्त्वाचा टप्पा असला, तरी राजकारण व प्रेमकथा यांची भेळ-मिसळ करण्याचा आणि त्यासाठी बालिश दृश्ये दाखविण्याचा मोह मात्र टाळायला हवा होता!
No comments:
Post a Comment