Tuesday, September 3, 2013

'संतांनी महिलांना एकटे भेटू नये!'



'संतांनी महिलांना एकटे भेटू नये!'

bapu




'चरित्र आणि मर्यादेपेक्षा मौल्यवान कुठलीही गोष्ट नाही. साधू-संतांनी याचे भान राखले पाहिजे,' असे सांगतानाच, 'अध्यात्मिक गुरूंनी महिला वा मुलींना एकांतात भेटू नये,' असा सल्ला योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातील संत-महंतांना दिला आहे. तसेच, 'एखाद्या साधूच्या चुकीसाठी संपूर्ण संत परिवाराला दोष देता येणार नाही,' असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ते हरिद्वार येथे बोलत होते. 'संत हे नेहमीच समाजाला दिशा देत आले आहेत. सध्याच्या जमान्यात काही संतांची प्रतिमा डागाळली आहे हे खरे असले तरी त्यासाठी सर्वांनाच दोष देता येणार नाही. आजही अनेक साधू-संत अध्यात्माच्या विविध पैलूंवर काम करीत असून समाजाला पुढे नेत आहेत. नव्या युगात अनेक आव्हाने, प्रलोभने आहेत. अशा परिस्थितीत संतांनी आपली मर्यादा सोडता कामा नये,' असा उपदेश रामदेव बाबांनी दिला आहे.

'बदनामी वा आरोप टाळायचे असतील तर संतांनी काही प्रमाणात सावध असणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत महिला वा मुलींना एकट्याने भेटू नये. महिला साधकांना मार्गदर्शन करताना त्यांच्यासोबत पुरुषही असतील याची काळजी घ्यायला हवी,' असेही रामदेव बाबांनी सांगितले.

आसाराम प्रकरणी मौन

आसाराम प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास रामदेव बाबांनी नकार दिला. 'बापूंवरील आरोपांबाबत आत्ताच काही बोलणे योग्य होणार नाही. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सत्य समोर येईपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल,' असे सांगतानाच, 'अध्यात्मिक जीवन जगणाऱ्यांसाठी शास्त्राने काही दंडक घातले आहेत. ते दंडक मोडणाऱ्यांना शिक्षा भोगावीच लागेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive