Monday, September 2, 2013

विद्या, अविद्या आणि सद्विद्या

हे जग मिथ्या असले, तरी विशिष्ट नियमांनी बांधले गेले आहे. आकाशातले ग्रह, तारे विशिष्ट नियमाने धावत असतात. सारेजण एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर आहेत. त्यामुळे कुठेही आणि कधीही त्यांचा अपघात होत नाही. प्रकृतीच्या नियमांचे पालन केल्यास माणूस जीवनात सुखी होऊ शकतो. नियमितपणे व्यायाम केल्यास प्रकृती सुधारते. भरपूर अभ्यास केल्यास परीक्षेत यश मिळते. जीवनात ज्ञानाच्या विविध शाखा आहेत. त्यांच्या अध्ययनाने जीवन समृद्ध करता येते आणि हे मिथ्या जग सुंदरही करता येते. समर्थ ज्ञानाच्या या विविध शाखांना विद्या असे म्हणतात. विद्येचा वापर चांगल्या कार्यासाठीही करता येतो, तसेच वाईट कार्यासाठीही करता येतो. विद्येच्या सदुपयोगाला समर्थ 'सद्विद्या' म्हणतात, तर विद्येच्या दुरुपयोगाला समर्थ अविद्या म्हणतात.

स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या।

स्फुरे ब्रह्मा रे जाण माया सुविद्या।

दूरदर्शन ज्ञानाचे साधन म्हणूनही वापरता येते. याउलट काही मालिकांद्वारे माणसाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणीपण घालता येते. सारे वैज्ञानिक भौतिक विद्येचे तपस्वी होते. वेगवेगळे शोध लावताना त्यांनी कोणताही उपभोग घेतला नाही. काही माणसे वैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या साधनांच्या अथवा उपकरणांच्या द्वारे स्वत:चा विकास करवून घेतात; तर काहीजण मानवजातीच्या हानीसाठी त्याचा उपयोग करतात. याला समर्थ अविद्या म्हणतात. शस्त्र सैनिकांच्या अथवा पोलिसांच्या हातात असते, तेव्हा ती सद््विद्या असते. हेच शस्त्र जेव्हा दहशतवाद्यांच्या हातात जाऊन पडते, तेव्हा ती अविद्या ठरते. पूवेर्कडील राष्ट्रांनी ब्रह्माचिंतनाद्वारे मुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला, म्हणून आपल्याकडे अध्यात्म विद्येची वाढ झाली. पश्चिमेने वासनातृप्ती आणि त्यासाठी भौतिक समृद्धी हेच जीवनाचे ध्येय ठरवल्यामुळे तिथे अशांती वाढली. पश्चिमेचे अनुकरण केल्यामुळे तेथील सर्व समस्या आता आपल्याकडे जाणवू लागल्या आहेत. म्हणून स्वामी विवेकानंदांनी विचार मांडला की, भारताने पश्चिमेचे विज्ञान स्वीकारून भौतिक समृद्धी प्राप्त करून घ्यावी; तर पश्चिमेने भारतीय तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून अंतर्मुख व्हावे. आइन्स्टाईन यानेदेखील अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड सांगितली.

भगवंताने गीतेमध्ये माणसांचे दोन प्रकार सांगितले. काही माणसे दैवी संपत्तीने युक्त असतात; तर काही माणसे असुरी संपत्तीची असतात. दैवी संपत्तीची माणसे विद्येचा सदुपयोग करतात; तर असुरी संपत्तीची माणसे विद्येचा दुरुपयोग करतात. बिभीषण आणि रावण या दोघांनी तप केले. दोघांना तपाने ज्ञान प्राप्त झाले. रावण तर मोठा संस्कृत पंडित होता. बिभीषण दैवी संपत्तीने युक्त असल्यामुळे भगवद्भक्त झाला; तर रावणाने आपल्या भोगवादासाठी सर्वांना वेठीला धरले.

समर्थांच्या मते, कुविद्याग्रस्त मनुष्य काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, चिंता, आशा, ममता, कामना, असुया, अतृप्ती, लोलंगता, मस्ती या दुर्गुणांनी नटलेला असतो. त्याने कोणतीही विद्या आत्मसात केली की, मानवजातीच्या विनाशासाठी तो त्याचा वापर करतो. असा मनुष्य कसा बोलतो? समर्थ म्हणतात-

कठिणवचनी कर्कशवचनी। कापट्यवचनी संदेहवचनी।

दु:खवचनी तीव्रवचनी। क्रूर निष्ठुर दुरात्मा।।

न्यूनवचनी पैशून्यवचनी। अशुभवचनी अनित्यवचनी।

द्वेषवचनी अनृत्यवचनी। बाष्कळवचनी धि:कारू।।

याउलट सद्विद्येने युक्त मनुष्य सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयवचनी आणि सौख्यवचनी असतो. बुद्धीचे सार्मथ्य आणि संघटनेचे कौशल्य औरंगजेब आणि शिवछत्रपती या दोघांकडे होते. पण औरंगजेबाने त्याचा वापर विध्वंसक कार्यासाठी केला; तर शिवछत्रपतींनी त्याचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी केला. समर्थांच्या मते, सद्विद्येने संपन्न मनुष्य कामिनी आणि कांचनाचे व्यवहार अत्यंत शुद्धपणे करतो. समर्थ म्हणतात-

मित्रपणे परहितकारी। वाग्माधुयेर् परशोकहारी।

सार्मथ्यपणे वेत्रधारी। पुरुषाथेर् जगमित्र।।

दुयोर्धन कर्णाचा मित्र होता; पण त्याने कर्णाचा वापर आपल्या द्वेषासाठी केला. रामाने सुग्रीवाशी मैत्री केली; पण त्यामुळे सुग्रीवाचा दर्जा सुधारला. संत आपल्या मधुर बोलण्याने अनेकांची दु:खे कमी करतात; तर वाईट माणसे आपल्या वाणीचा उपयोग वर्मावर घाव घालण्यासाठी करतात. समर्थ म्हणतात-

कुशब्दे छेदी जिव्हार। जैसे विंचू आणि विकार।

सद््विद्येने युक्त मनुष्य भाग्यवंत, यशवंत, आचारशील, विचारशील, शक्तिवंत, सत्यवंत, दयाळू, नि:स्पृह आणि संतुष्ट असतो. हे जग सद्विद्येच्या माणसांमुळे सुंदर आणि सुशोभित झाले आहे.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ७१

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive