Monday, September 2, 2013

विवेक आणि वैराग्य

माणसाला जीवनातील कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विवेक आणि वैराग्य या दोन गुणांची आवश्यकता असते. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की, विवेक आणि वैराग्य हे गुण फक्त परमार्थासाठीच आवश्यक आहेत, भौतिक जीवनात या गुणांची आवश्यकता नाही. वस्तुत: ही समजूत चुकीची आहे. विवेक आणि वैराग्य या शब्दांचे अर्थ लक्षात घेतले म्हणजे व्यावहारिक जगतातसुद्धा ते कसे आवश्यक आहेत हे लक्षात येईल. विवेक म्हणजे निवड आणि वैराग्य म्हणजे नावड. पारमाथिर्कदृष्ट्या विवेक म्हणजे भगवंताची आवड आणि निवड, तर वैराग्य म्हणजे संसारसुखाची नावड. व्यावहारिक जगतात आपल्याला जीवनाचे ध्येय ठरवावे लागते. ध्येयाची निवड किंवा व्यवसायाची निवड हा एक विवेकच असतो. ज्या गोष्टी या व्यवसायाला पूरक नसतात अशा गोष्टीची नावड म्हणजे वैराग्य. एखादा विद्याथीर् 'सायन्स साइड' स्वीकारतो, तेव्हा हा त्याचा विवेक असतो. एकदा सायन्सचा अभ्यासक्रम स्वीकारल्यावर आर्टस् आणि कॉमर्सकडे तो ढुंकूनही पाहत नाही, हे एक वैराग्यच असते. म्हणून विवेक आणि वैराग्य या मानवी जीवनाच्या प्रधान प्रेरणा आहेत. समर्थ रामदासांनी आपल्या वाङ्मयात विवेक आणि वैराग्य यांचे महत्त्व पुन: पुन्हा सांगितले आहे. विवेक आणि वैराग्यासंबंधी भगवान रामकृष्ण परमहंस एक छान गोष्ट सांगतात.

आई आपल्या लहान मुलाला झोपवते आणि मग उद्योगाला लागते. घरातील बरीच कामे ती उरकते. स्वयंपाकाला प्रारंभ करताच ते मूल उठून रडायला लागते. आई त्याच्या हातात काही खेळणी देते. त्या खेळण्यात ते मूल रमून जाते. थोड्या वेळाने ते मूल पुन्हा रडायला लागते. तेव्हा आई नवीन चांगली खेळणी त्याला देते. त्या नवीन खेळण्यातही ते मूल रमून जाते. मात्र जेव्हा त्या मुलाला भूक लागते, तेव्हा त्याला फक्त आई हवी असते. फक्त आई हवी असणे याचे नाव विवेक आणि आता खेळणी वगैरे काही नको, याचे नाव वैराग्य. समर्थांना नुसते वैराग्य अपेक्षित नाही किंवा नुसता विवेक अपेक्षित नाही. विवेक आणि वैराग्य यांचा समन्वय हवा.

अनेकदा एखाद्या उत्तम प्रवचनकाराकडे विवेक असतो, आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर तो विषयाची मांडणी अतिशय उत्कृष्ट करतो, पण वैराग्याचा अभाव असेल तर असा मनुष्य प्रवचनाचा व्यापार सुरू करतो. घार आकाशात हिंडत असली तरी तिचे लक्ष जमिनीवर सडत पडलेल्या गुराकडे असते. त्याप्रमाणे वैराग्याचा अभाव असल्यामुळे असा विद्वान वक्ता कितीही मोठमोठ्या गप्पा मारत असला तरी खाजगी जीवनात अत्यंत स्वाथीर् असू शकतो. या उलट एखादा मनुष्य वैराग्यसंपन्न असतो, पण विवेकाचा अभाव असला तर त्याच्या जीवनात हेकेखोरपणा शिरतो. अनेकदा आपण वैराग्यशाली आहोत याचा एवढा अहंकार त्याला असतो की, तो बाकीच्यांना तुच्छ लेखायला लागतो. प्राचीन काळी जरा काही मनाविरुद्ध घडले की, शिव्या, शाप देणारे ऋषी-मुनी होते. या ऋषी-मुनींकडे वैराग्य होते, पण विवेक नव्हता. जीवनात कार्य करताना कार्यर्कत्याने नि:स्पृह असावे. पण अनेकदा अशा कार्यर्कत्याला आपल्या नि:स्पृहतेचा एवढा अहंकार होतो की, तो सर्वांना तुच्छ लेखायला लागतो. अशा माणसाचे अहंकारामुळे अध:पतन होते, तर विवेक असूनही वैराग्य नसल्यामुळे काही जणांचे लोभापायी नुकसान होते. म्हणून समर्थांना विवेक आणि वैराग्य यांचा समन्वय अपेक्षित होता.

महाराष्ट्रातील सगळ्याच संतांच्या जीवनात विवेक आणि वैराग्य यांचा सुमधूर समन्वय पाहावयाला मिळतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा परमोच्च आविष्कार पाहावयास मिळतो. पण ज्ञानदेवांना आपल्या काव्यशक्तीचा यत्किंचितही अभिमान नव्हता. त्याचप्रमाणे त्यांना कशाचाही लोभ नव्हता. कमीतकमी गरजांच्या साहाय्याने अत्यंत साधे जीवन त्यांनी व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत पराक्रमी होते, विलक्षण बुद्धिमान होते, पण त्याचबरोबर अत्यंत विनयशील आणि निलोर्भी होते. कारण त्यांच्या जीवनात विवेक आणि वैराग्य यांचा समन्वय होता. समर्थांच्या मते असा मनुष्य समाजाचे जास्तीत-जास्त कल्याण करू शकतो. सामाजिक नेता जर विवेकी असेल तर त्याच्यात अचूक निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि वैराग्यामुळे तो नि:स्वार्थ असेल.

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : १७

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive