दक्षिण आफ्रिकेत टिकली 'टिकली'
हॉस्पिटलमध्ये ड्युटी करताना सौभाग्याचे लेणे असलेली टिकली कपाळावर लावण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या क्वाझुलु-नॅटल प्रांतातील हिंदू नर्सनी सुरू केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. क्वाझुलु-नॅटल प्रांताच्या आरोग्य मंत्रालयाने प्रांतातील कुठल्याही हॉस्पिटल तसेच आरोग्य केंद्रात काम करणा-या नर्स महिलांना हिंदू असल्यास टिकली कपाळावर लावण्यास तसेच मंगळसुत्र आणि नथ घालण्यासही परवानगी दिली आहे.
ख्रिश्चन विवाहित महिलांना हॉस्पिटलमध्ये मॅरेज रिंग म्हणून ओळखली जाणारी अंगठी घालण्यास परवानगी असेल तर अन्य धर्मिय महिलांना त्यांचे सौभाग्य लक्षण असलेले अलंकार परिधान करण्यास बंदी घालता येणार नाही , असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रांतातील अॅडिंग्टन हॉस्पीटलने ड्युटीवर टिकली , नथ वापरण्यावर बंदी घातली होती. या बंदीमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून नर्स महिलांनी संघटित होऊन आंदोलन केले होते. साऊथ आफ्रिका तामिळ फेडरेशन , साऊथ आफ्रिका हिंदू धर्म आणि साऊथ आफ्रिकन हिंदू महासभा या तिन्ही संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान , हॉस्पिटल प्रशासनाने कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण पेशंटला इन्फेक्शन होऊ नये यासाठी बंदी घातली होती असे स्पष्टीकरण दिले आहे.
No comments:
Post a Comment