जीवन संगीत
एकदा एका शेतकऱ्याला शेत नांगरताना एक सुंदर संगमरवरी पुतळा सापडला . त्याने तो पुतळा एका जुन्या , दुर्मिळ व सुंदर वस्तूंचा हौसेने संग्रह करणाऱ्या गृहस्थाला नेऊन दाखवला . त्या गृहस्थाने त्या शेतकऱ्याला खूप मोठी रक्कम देऊन तो विकत घेतला . तो शेतकरी पैसे घेऊन घरी परत जात असता स्वत : शी म्हणाला , ' पैसा हेच खरं जीवन ! असं असताही हजारो वर्षांपासून जमिनीच्या पोटात दडून राहिलेल्या आणि कुणी स्वप्नातही न पाहिलेल्या एका दगडी निर्जीव पुतळ्यासाठी मला इतके पैसे देणारा तो गृहस्थ विचित्रच नाही का ?' इकडे तो पुतळा विकत घेणारा शौकीन गृहस्थ त्या सुंदर पुतळ्याकडे पाहून मनाशी म्हणत होता , ' किती सुंदर ! काय हे जीवन ! जणू एखाद्या कलावंत आत्म्याचं स्वप्नच ! रुक्ष , निर्जीव नाण्यांच्या मोबदल्यात इतकी सुंदर वस्तू देऊन टाकणारा माणूस विचित्रच नाही का ?'
कोणत्याही गोष्टीकडे किंवा घटनेकडे पाहण्याची प्रत्येक व्यक्तीची दृष्टी किती वेगवेगळी असू शकते ! जगाकडे पाहण्याची दृष्टीच एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी बनवते . परमेश्वराने सर्व व्यक्तींना वेगवेगळे बनवले आहे , सर्व फुलांना वेगवेगळा सुगंध दिला आहे , सर्व वस्तूंना वेगवेगळे रूप दिले आहे ; त्या वेगळेपणातच खरे सौंदर्य आहे . प्रत्येक मनुष्याने स्वत : च्या आत्म्याचे सौंदर्य आणि त्यातील संगीत हे आपल्या गाभार्यात जपून ठेवले पाहिजे . ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला वेगळे बनवले आहे आणि तसे असण्यातच खरी परिपूर्ती आहे . जिथे स्वरूप आणि स्वभाव यांच्या अनुकूल विकास आहे , तिथेच धन्यता आहे . मानव दु : खी आहे ; कारण तो स्वत : च्याच विरोधात आहे . स्वत : च्या मूळ प्रवृत्तीशीच तो झगडत असतो . तो जो आहे , त्यापेक्षा दुसरं कुणी होण्याच्या संघर्षात नेहमी असतो . दुसरे कोणी होण्याची इच्छा म्हणजेच कामना आहे . इतरांसारखे होण्याच्या कामनेमुळे मनुष्य कायम भविष्यात जगू लागतो .
एके दिवशी येशू आपल्या शिष्यांसह चालले होते . चालता चालता अचानक ते लिलीच्या फुलांच्या झुंडीपाशी येऊन थांबले . येशू म्हणाले , ' बघा ! ही लिलीची फुले सॉलोमनपेक्षाही किती भाग्यवान आहेत .', शिष्य म्हणाले , ' असे कसे म्हणता ? सॉलोमन तर सम्राट ! त्याच्या वैभवाला तुलना नाही . तो हिऱ्या - मोत्यांच्या महालात राहतो . आणि ही रानफुले , धुळीत मिळणारी !' येशू म्हणाले , ' म्हणूनच ही भाग्यवान आहेत . सम्राट सॉलोमन इतर सम्राटांपेक्षा श्रेष्ठ होण्याच्या कामनेमध्ये सदैव भविष्यात जगत असतो ; पण ही फुले प्रवृत्तीने त्यांना जसे बनवले , त्यातच समाधानी आहेत . त्यामुळे ती सदैव वर्तमानात जगत असतात . सॉलोमनची सारी ऊर्जा ही कामना आहे . जेथे कामना असते , तेथे सदैव भविष्याचा विचार असतो .' फुले देठापासून विलग होऊनही सुगंधच देत राहतात , पण माणसाचा देह प्राणापासून विलग झाला , तर त्याला दुर्गंधी येऊ लागते . कारण त्याने आपला देह कामनेसह सोडलेला असतो . फुले देह सोडतात , तेव्हा ती समर्पित होतात , विसर्जित होतात . इतरांसारखे होण्याची कामना नष्ट झाली तर मनुष्य स्वत : च जीवनही सुगंधी बनवू शकेल व त्याने इतरांनाही आनंदित करू शकेल .
No comments:
Post a Comment