Tuesday, September 3, 2013

सर्वोच्च धर्म


सर्वोच्च धर्म



एका नगराचा राजा जगातील सर्वोच्च धर्म कोणता आहे , याचा शोध घेत होता . ज्या धर्माचे अनुसरण केल्याने ईश्वराची प्राप्ती होईल , असा धर्म त्याला शोधायचा होता . त्याने अनेकविध धर्म , पंथ , संप्रदायाच्या विद्वान लोकांना आपल्या राजवाड्यात एकत्र बोलावले . प्रत्येकाने आपापला धर्मच कसा श्रेष्ठ आहे , हे राजाला परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न केला . पण तरीही राजाचे समाधान झाले नाही . प्रत्येकात त्याला काही ना काही दोष दिसू लागले . एके दिवशी एक तेजस्वी संन्यासी राजाला भेटायला आला . राजाने आपला प्रश्न त्याच्या समोरही मांडला . तेव्हा तो संन्यासी म्हणाला , ' राजधानीच्या बाहेर पैलतीरावरती चल . तिथे मी तुला धर्मरहस्य सांगेन .' राजा आणि संन्यासी दोघेही नदीतटावरती गेले . पलीकडे जाण्यासाठी उत्तमोत्तम नावा आणल्या गेल्या . परंतु संन्यासाला त्यातील एकही नाव पसंत पडेना . प्रत्येकीत तो काही ना काही दोष काढू लागला . बराच वेळ असेच चालल्यानंतर राजा कंटाळून गेला त्या संन्याशाला म्हणाला , ' महात्मन , आपल्याला एक छोटीशी नदी पार करायची आहे . पोहूनही ती आपल्याला पार करता येईल . सोडून द्या ती नाव आणि चला , आपण पोहूनच नदी पार करू . विनाकारण वेळ कशाला दवडायचा ?' राजाच्या याच उद ्गारांची वाट जणू तो संन्यासी पाहत होता . तो राजाला म्हणाला , ' राजा ! अगदी हेच मला तुम्हाला सांगायचं आहे . धर्म - पंथाच्या मागे तुम्ही का लागता ? परमात्म्याच्या मिलनासाठी स्वत : पोहून भवनदी पार करणंच उचित नाही काय ? वास्तविक धर्माची अशी नाव नाहीच . तो होड्यांच्या नावानं चाललेला नावाड्यांचा व्यवसाय आहे .'

वस्तुत : धर्माची निर्मिती ही एक मजेशीर गोष्ट आहे . बुद्ध , महावीर , येशू , नानक , ख्रिस्त , कबीर यांसारख्या अनेक लोकांना अंतर्यामी परमात्म्याची उपलब्धी झाली . व्यक्तिनिष्ठ अनुभवाच्या पातळीवर असलेली अनुभूती जेव्हा शब्दबद्ध होते , तेव्हा तिला धर्माचे स्वरूप प्राप्त होते . गौतम बुद्धांना अंतर्यामी बोधाची प्राप्ती झाली , ती त्यांची वैयक्तिक अनुभूती होती . ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी प्रथम उपदेश केला , तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्या उपदेशातून विविध अन्वयार्थ काढले अशा प्रकारे चार संप्रदाय उदयाला आले . वस्तुत : सत्य प्राप्त करून घ्यायचं असेल , तर स्वत : अन्वेषण करणं हाच एकमेव मार्ग आहे . दुसऱ्यांच्या अनुभवांच्या कुबड्या आपल्या अनुभूतीसाठी सहाय्यक बनू शकत नाहीत . नदी पार करण्यासाठी दुसऱ्याने बनविलेल्या नावा उपयोगात येऊ शकत नाहीत . स्वत : पोहणं हाच एकमेव मार्ग आहे . सत्य हे स्वतःच प्राप्त करून घ्यावं लागतं . दुसरं कुणी सत्य आपल्याला देऊ शकत नाही .

सत्याचा सागर स्वत : पोहून पार करावा लागतो . कुणी मदत करू शकत नाही . जो मदतीची वाट पाहत बसतो , तो कधीच पलीकडे पोहोचू शकत नाही . पण जो स्वत : उडी घेऊन नदी पोहून जाण्याचं साहस करतो , तो बुडाला तरी इच्छित ध्येयं गाठतोच -

मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही ,
गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं

- विश्वास साक्रीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive