Tuesday, January 1, 2013

कारमध्ये वायरलेस चार्जर

कारने लाँग ड्राइव्हला निघायचे असेल , तर स्मार्टफोन चार्ज करायचे टेन्शन प्रत्येकालाच येते . प्रवासामध्येच चार्जिंग संपले , तर कुणाला फोन करायचीही सोय नाही ; पण जपानच्या ' टोयोटा ' कंपनीने प्रत्येकाला भेडसावणारे हे टेन्शन संपवायचे ठरवले आहे . कुठल्याही कनेक्टर , वायरशिवाय ड्रायव्हिंग करताना स्मार्टफोन , मोबाइल चार्ज करता येईल , असे यंत्र जगात पहिल्यांदाच बनवल्याचा दावा ' टोयोटा ' ने केला आहे .

येत्या वर्षात ' टोयोटा ' च्या अॅवलॉन या नव्या कारमध्ये ड्रायव्हिंग करत असताना मोबाइल चार्ज होईल , अशी यंत्रणा बसवणार आहे . चार्जिंगसाठी कुठल्याही केबलची गरज नसेल . यासाठी ' क्यूआय ' नावाची सिस्टीम वापरली जाणार आहे . ही सिस्टीम पुढच्या वर्षी लाँच होईल . या सिस्टीमनुसार कारमध्ये ड्राइव्ह करत असताना स्मार्टफोन चार्ज करता येईल . त्यासाठी फक्त एका मॅटवर तो ठेवायचा . स्मार्टफोनमध्ये मात्र ही ' क्यूआय ' यंत्रणा असणे गरजेचे आहे . ही यंत्रणा मोबाईल फोनच्या ३४ मॉडेलना उपयुक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि इतर स्मार्टफोनसाठी ' अॅड ऑन सिस्टीम ' ही आहेत . ' टोयोटा अॅव्हलॉन ' चे मुख्य इंजिनीअर रँडी स्टीफन यासंदर्भात म्हणाले , ' कुठलीही वायर जोडता मोबाइल चार्ज करण्यासारखे संशोधन कंपनीने केले आहे . ग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांचा उत्तमोउत्तम अनुभव घेता यावा , यासाठी कंपनीची असलेली कटिबद्धताच यातून दिसत आहे .'

' क्यूआय ' ही यंत्रणा ' मॅग्नेटिक इंडक्शन ' संकल्पनेवर आधारलेली आहे . मॅग्नेटिक फिल्डमधून ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी दिली जाते . या वायरलेस तंत्रज्ञानासाठी २००८पासूनच प्रयत्न चालले होते . २००८मध्ये वायरलेस पॉवर कन्सॉर्टियम झाली . त्यावेळी जवळपास शंभर मोबाईल कंपन्यांच्या ब्रँडचे सदस्य उपस्थित होते . वायरलेस पॉवरविषयी त्यांनी एक करार केला . त्यालाच ' क्यूआय ' म्हणून संबोधण्यात आले . त्यामुळे ज्या मोबाइलमध्ये ' क्यूआय ' सिस्टीम आहे , त्या स्मार्टफोन , मोबाइलचा वापर वायरलेस चार्जिंगसाठी करता येईल . मोबाइल किंवा स्मार्टफोनचा ब्रँड कुठलाही असो , त्याचा चार्जिंगवर फरक पडणार नाही . ' जनरल मोटर ' नेही अशा पद्धतीचे पॅड तयार करण्याचे जाहीर केले होते ; मात्र ती संकल्पना प्रत्यक्षात आली नाही . इस्रायलची कंपनी ' पॉवरमॅट टेक्नॉलीजी ' ने अमेरिकेत अनेक सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंग पॅड ठेवले आहेत .

दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई कंपनीनेदेखील ग्राहकांसाठी नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे . यानुसार कारची चावी आपल्याकडे नसेल , तर स्मार्टफोनने कार आपल्याला उघडता येईल . आगामी दोन वर्षांत हे तंत्रज्ञान बाजारात येणार आहे . तंत्रज्ञानाच्या या अद्ययावत प्रगतीमुळे सामान्य माणसाचे जीवन सुसह्य झाले आहे , एवढे नक्की !

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive