Sunday, January 20, 2013

LIC Home loan for womens

खास महिलांसाठी एलआयसीने नुकतीच होमलोन योजना (LIC Home loan for womens) जाहीर केली. स्वतःचे घर घेणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येचा विचार यासाठी करण्यात आला आहे. आधी वडिलांच्या , मग नवऱ्याच्या घराचं घरपण तिने राखायचं. नवं घर विकत वगैरे घेण्याच्या फंदात पडायचं नाही , असाच काहीसा अलिखित नियम अगदी आताआतापर्यंत होता. पण आता तो पुसला जातोय. अनेक महिला प्रॉपर्टी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. या बदलत्या ट्रेण्डचा घेतलेला आढावा.
...

एफएसआय , कार्पेट एरिया , चौरस फुटाचा भाव , अंडर कन्स्ट्रक्शन , पझेशन , मेन्टेनन्स... असे किचकट आणि वर्षानुवर्षे पुरुषांच्या अखत्यारित असलेले शब्द आता ' ती ' लाही अनोळखी राहिलेले नाहीत... आतापर्यंत ' त्या ' नं निर्णय घेतल्यावर , व्यवहाराचं सर्व काही ठरवल्यावर नव्या घरी प्रवेश करणारी ' ती ' आता या क्षेत्रातही लीलया आणि सराईतासारखी वावरते... महिलांच्या किंवा मुलींच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या इतक्या मोकळेपणाचा तितकासा स्पर्श न झालेल्या किंवा काही गोष्टी पुरुषांनीच करायच्या असतात , असं अजूनही आतून वाटत असलेल्या घरांना हा नवा विचार पटत नसेल कदाचित. पण बाकी असंख्य कुटुंबांसाठी तो नवा राहिलेला नाही आणि पर्यायानं समाजासाठीही.

महिला कमावत्या असोत वा नसोत , घराचं अर्थखातं त्यांच्या ताब्यात असतं , असं म्हटलं जातं. पूर्वापार , घरखर्चातले पैसे वाचवून , काटकसर करून , स्मार्ट व्यवहार करून महिला बचत करायच्या , अडीनडीसाठी तरतूद करून ठेवायच्या. असंख्य कमावत्या महिलांचेही जमा-खर्चाचे , बचत-गुंतवणुकीचे ताळमेळ पक्के असतात. इन्शुरन्स , एफडी , रिटायरमेंट प्लॅनिंग , अगदी शेअर्समधली गुंतवणूक , असे कोणतेच पर्याय त्यांच्यापासून दूर राहिलेले नाहीत. त्याचं प्रतिबिंब खास महिलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या आर्थिक उत्पादनांमध्ये दिसतंच. यामध्ये , गेली काही वर्षे नवा ट्रेंड उदयाला येतोय आणि तो चांगलाच स्थिरावूही लागल्याचं दिसू लागलंय... मनासारखं करिअर सुरू झालं , त्यात थोडी स्थिरता आली , चार पैसे गाठीशी आले की तिचा शोध सुरू होतो रिअल इस्टेटमधल्या गुंतवणुकीसाठी!

घर किंवा प्लॉट घेण्याचे विचार मनात रुंजी घालू लागतात , डाऊनपेमेंट , कर्ज , त्याची परतफेड , रजिस्ट्रेशन आदीची जमावजमाव सुरू होते आणि सगळी गणितं जमली की आपल्या हक्काच्या घराची किल्ली आपल्या हातात मिळते! काहींच्या बाबतीत हे स्वप्न अलगद साकार होतं , तर काही जणींना यासाठी बराच आटापिटा करावा लागतो. स्वतःचं घर घेणं किंवा जमिनीत गुंतवणूक करणं , या गोष्टीला अनेक झालरी असतात आणि त्यातल्या काही अतिशय बोचऱ्या असतात. हवंय कशाला स्वतःचं घर... इथपासून खुपणारे काटे सुरू होतात. लग्नापर्यंत आई-वडिलांच्या आणि लग्नानंतर पतीच्या घरात राहायचं , हे समाजाच्या मनावर इतकं खोलवर कोरलेलं असतं की , त्या बाबतीत थोडीसुद्घा बंडखोरी काही घरांमध्ये चालत नाही. त्यामुळे काही जणींच्या बाबतीत हे स्वप्न उमलायच्या आधीच कुस्करून फेकलं जातं. सगळी ताकद एकवटून विरोध मोडून काढत उभ्या राहणाऱ्या मुलींना सुखासुखी हा निर्णय तडीस नेता येतोच असंही नाही. आपलं बजेट ठरवणं , त्यानुसार विश्वासू बिल्डर निवडणं , त्याच्याशी घासाघीस करणं , डाऊनपेमेंटसाठी पैसे तयार ठेवणं , खटपट करून होमलोन मिळवणं , इतक्या मोठ्या कालावधीची कर्जाची बांधिलकी पूर्ण करण्यासाठी तयारी करणं... ही आव्हानं एकटीनं पेलण्याची तयारी घर घेण्याचं ठरवणाऱ्या मुलीनं केलेली असते. त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी घरून वा समाजाकडून खुल्या मनानं मदत होणं बाजूला ठेवू , पण अडथळेच येण्याची शक्यता जास्त असते.

एकट्यादुकट्या मुलीला घर खरेदी करण्याचा किंवा जमिनीत पैसे अडकवताना पाहून असंख्य प्रश्न उभे केले जातात... घर घेणं ही काही लहान गोष्ट नाही. ही मोठी कमिटमेंट असते. वडिलांचं घर असताना नसत्या फंदात पडायचं कशाला ? एवढी मोठी जबाबदारी नाही झेपली तर ? मुलीवर होमलोन , आर्थिक जबाबदारी असल्याचं सासरच्या लोकांना चाललं नाही तर ? मुलींच्या पगाराबाबत तिच्या नवऱ्यानं वेगळं काही नियोजन केलेलं असेल तर ? त्याचा रोष कशाला ओढवून घ्यायचा ? मुलीनं एकीकडे घर घेतलं , पण नवऱ्याला दुसरीकडे घ्यायचं असेल तर उगाच पैसे कशाला अडकवायचे ? ( अशा वेळी हे घर विकून दुसरीकडे घेता येऊ शकतं आणि तोपर्यंत जागेचे दर वाढलेले असतात याकडे डोळेझाक करायची). काही कारणानं नोकरी सोडावी लागली तर ? तिच्या नावावर घर असल्यामुळे त्याचा इगो दुखावला तर ? आणि यक्षप्रश्न म्हणजे , अनेकदा वाद प्रॉपर्टीवरून होतात. मुलीच्या आयुष्यातील कोणत्याही पेचाला हे घरं घेण्याचं फॅड कारणीभूत ठरलं तर ?... असे शंकांचे डोंगर रचून कळत-नकळत विरजणं टाकलं जातं. हे मुद्दाम केलं जात नसलं तरी समाजाच्या विचारसरणीचा पगडा यातून डोकं वर काढतो.

आता मात्र या बाबतीतही मानसिकता झपाट्यानं बदलत जात असल्याचं दिसतं. घरांच्या वाढत्या किमती , गुंतवणूक म्हणून त्याला आलेलं महत्त्व , मुलींचंही स्थिर व बऱ्यापैकी उत्पन्न यामुळे घर , जमीन घेण्याकडे त्यांचा कल वाढतोय. काही घरांत मुलींचा हट्ट म्हणून , काही ठिकाणी बदलत्या काळाची जाण म्हणून त्यांच्या या विचारांना होत असलेल्या विरोधाची धार बोथट झालेली दिसते. मुलांचाही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असलेला दिसतो आहे. लग्न करायचं म्हणजे घर घ्यायला लागणार , आहे त्या पगारात काय काय भागवायचं , या चिंतेतून बाहेर येईपर्यंत घराचे फुगलेले दर डोळे पांढरे करत असल्यानं बायकोच्या पैशानं घेतलेल्या घरात पाय ठेवायचा नाही , या मेलइगोतली हवा कमी होत चालल्याचं जाणवतं. उलट , दोघांचं उत्पन्न विचारात घेऊन घरखरेदीचं आणि एकंदर संसाराचं बजेट ठरवण्याकडे कल वाढतो आहे. महागाई , मंदी , नोकऱ्यांसाठी संघर्ष अशा परीक्षेच्या काळात अनेक विचार मोडीत निघत आहेत. हाही त्यातलाच एक. मुलींनी स्वकर्तृत्वानं घर घेण्याच्या किंवा जमिनी आणखी महागण्यापूर्वी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या निर्णयाला वाहवा मिळू लागली आहे. काही जोडपी तर सहजीवनाची सुरुवातच विवाहबेडीत अडकण्यापूर्वी एकत्रित घरखरेदी करण्यापासून करू लागली आहेत. सासरच्यांनी छळ केला म्हणून रात्री-बेरात्री बेघर केल्या जाणाऱ्या , नवऱ्याशी न पटल्याने नाईलाजानं माहेरी येऊन राहणाऱ्या आणि असुरक्षिततेची टांगती तलवार असलेल्या महिलांना यामुळे केवढा मानसिक आधार मिळत असेल. या सगळ्यांचं प्रतिबिंब महिलांच्या नावावर असलेल्या घरांमध्ये वाढ , सह-मालक म्हणून त्यांना मिळालेला मान यामध्ये दिसू लागलं आहे. म्हणूनच फक्त महिलांसाठी होमलोन योजनाही दिसू लागल्यात. आता समाजातले हे नवे बदल कशी वळणं घेतात ते पाहायचं!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive