काश्मिरमध्ये घुसून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भयंकर हल्ल्यामागे लश्कर - ए - तोयबाचा अतिरेकी हाफिज सईद याचा हात असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती असताना काश्मिरात आणखी रक्तपात घडवण्याची धमकी हाफिज सईदने दिली आहे .
पुंच्छ भागात दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे . गेल्या काही दिवसांपासून सीमेवरही तणावाचे वातावरण आहे . त्यातच हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे . एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीमवरील तणावाला भारतच जबाबदार असल्याची बोंब हाफिजने मारली आहे .
पाकिस्तानात अस्थिरता वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे . ही भारताची नेहमीचीच चाल आहे . यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला बदनाम करण्यासाठीच हे उद्योग चाललेत . या कारवाया थांबल्या नाहीत तर येत्या काळात काश्मिरात आणखी तणाव वाढू शकतो . त्याची किंमत भारताला मोजावी लागेल , अशी धमकीच हाफिजने दिली . सीमेवर सैनिकी कारवाई करण्याची गरज सध्या तरी नाही मात्र भारत त्यासाठी पाकिस्तानला मजबूर करत आहे , असेही हाफिज म्हणाला . भारतीय जवानांवर हल्ला झाला त्याआधी आठवडाभर हाफिज सईद एलओसी भागात आला होता . त्यानेच या हल्ल्यासाठी पाक सैनिकांना उकसावले अशी भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहिती होती . याबाबत विचारले असता हाफिजने त्याचा इन्कार केला .
हाफिज सईदने १९९० च्या दशकात लश्कर - ए - तोयबा ही दहशतवादी संघटना सुरू केली . मात्र अमेरिकेने या संघटनेवर बंदी घालून मुसक्या आवळताच सईदने जमात - उद - दावा या नावाने आपल्या दहशतवादी कारवाया कायम ठेवल्या . भारताने पाकला दिलेल्या मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीत हाफिजचे नाव अग्रभागी आहे . तसेच अमेरिकेनेही या अतिरेक्यावर एक कोटीचे इनाम जाहीर केले आहे .
No comments:
Post a Comment