Wednesday, January 9, 2013

ओवेसींला न्यायालयीन कोठडी

Akbaruddin-Owaisi
मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद (आंध्र प्रदेश)

' केवळ १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा , २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना आपली ताकद दाखवतील ,' अशी गरळ ओकून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हैदराबादचे आमदार अकबरउद्दीन ओवेसी (४२) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

ओवेंसींविरोधात भारतीय दंड विधान कलम १५३ अ (धार्मिक तेढ निर्माण करणे) , २९५ अ (मुद्दाम धार्मिक भावना दुखावणे) आणि १२१ (देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न) अंतर्गत उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऑल इंडिया मजलिस ए मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी डिसेंबर महिन्यात एका सार्वजनिक सभेत हिंदू-मुस्लिम धर्मियांमध्ये परस्परांविरोधात व्देषाचं विष कालवण्याचा प्रकार केला होता. २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंवर भारी पडतील , भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्यानेच या देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत , अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली होती. हेच प्रक्षोभक भाषण त्यांच्या अंगाशी आलं आहे.

सोमवारी लंडनहून हैदराबादला परतल्यानंतर ओवेसींना पोलिसांची नोटीस मिळाली. पण , अटकेची भीतीनं ओवेसींनी तब्येतीचं कारण पुढे केलं. त्यांनी पोलिसांकडे चार दिवसांची मुदत मागितली होती. मात्र , पोलिसांनी मंगळवारी स्वतःच ओवेसींना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्या सर्व चाचण्या करून घेतल्या. त्यातून काही गंभीर निष्पन्न न झाल्याचं पाहून पोलिसांनी लागलीच त्यांना अटक केली होती. बुधवारी पहाटे एक वाजेपर्यंत ओवेसींची चौकशी करण्यात आल्याचे समजते. चौकशीअंती ओवेसींना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

याआधी देशाच्या एकात्मतेला तडा जाईल , असे भाषण केल्याप्रकरणी ओवेसींविरोधात अदिलाबाद आणि निझामाबाद जिल्ह्यात सुओ मोटो याचिका दाखल झाल्या. याच याचिकांची दख घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतरही , केंद्र सरकारनं किंवा आंध्र प्रदेश सरकारनं त्यांना परदेशी जाऊ दिल्याबद्दल संताप व्यक्त होत होता. या नाराजीची दखल घेऊन , उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ओवेसींवर कायदेशीर कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive