Sunday, January 20, 2013

Law to restrict expenses on Girls Marriage

मुलीच्या लग्नात होणाऱ्या वारेमाप खर्चाला चाप बसावा , याकरिता कायद्याचा विचार सुरू आहे. याबाबत खरंतर अनेक मतप्रवाह आहेत. पण कायदा करून हा प्रश्न सुटणार आहे का , की मुळात समानतेची मानसिकता रुजणं महत्त्वाचं , याबाबत केलेला उहापोह.
...........................

अलीकडे लग्न-समारंभात भव्य मंडप , रोषणाई , जेवणावळी यावर प्रचंड खर्च केला जातो. अनेक ठिकाणी तर येणाऱ्यांना फेटे बांधले जातात किंवा शाली घातल्या जातात. बरे , हे फेटे किंवा शाली काही मिनिटांनंतर निकामी ठरतात. हा सर्व खर्च वाया जाणारा असतो. या प्रथा काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा बहुसंख्य लोक फेटे बांधत होते तेव्हा नव्हत्या आणि अलीकडे म्हणजे जेव्हा कोणीच फेटे बांधत नाहीत तेव्हा त्या सुरू झाल्यात. अर्थातच आलेल्या पाहुण्यास त्याचा सन्मान झालाय हे दाखवण्यापलीकडे या प्रथेस अर्थ नाही. परंतु काही मंडळी राजकीय धोरणातून लग्नातच प्रचारकार्यही घडावे , अशा उद्देशाने या गोष्टी करतात आणि मग त्याने केलं तर आपण का नाही , या चढाओढीतून इतरही करू लागतात. तसेच भव्य मंडप , फटाके , विद्युत रोषणाई या गोष्टी आता खूप खर्चिक झालेल्या आहेत. यात लक्षावधी रुपये जात असतात आणि मग जेवणावळी... यात किती पदार्थ ठेवले आणि किती रेलचेल होती याला प्राधान्य. त्यातूनच होणारी अन्नाची नासाडी. या सर्व गोष्टी पुरवणारे विशेषज्ज्ञ ठेकेदार झाले आहेत!! साहजिकच त्यामुळे सुविधा व डामडौल दिसतो चांगला , मात्र या गोष्टींवरच वारेमाप खर्च होत असतो. अलीकडे तर व्यावसायिक निवेदक ध्वनीक्षेपक हातात घेऊन मंचावर अवतरतात आणि वर-वधूस बोहोल्यावर उभे ठेवून यांची भाषणबाजी सुरू होते. आलेले मोठे व प्रतिष्टीत महाभाग कोण , त्यांची नावे सांगितली जातात. (म्हणजे ज्यांची नावे सांगितली नाहीत ते महत्त्वाचे व प्रतिष्टीत नसतात ?). त्यातीलच विशेष मोठ्या व्यक्तींचा सत्कार केला जातो. मग या महाभागांना वधू-वरांना आशीर्वाद देण्याची विनंती केली जाते. विवाह विधी निलंबित ठेवून भाषणबाजी सुरू होते. बरीचशी राजकीय!!! मग लग्न !

बरं जरी हुंडा बंदी कायदा १९६२मध्येच करण्यात आला तरी आजही हुंडा देणे- घेणे चालूच आहे. उलट किती हुंडा दिला हा प्रतिष्टेचा विषयही केव्हा केव्हा जेवणाबरोबर चविष्टपणे चर्चिला जातो. भारतातील बहुतेक भागात हुंडा हा वधूच्या बाजूने वराला देण्याचा असतो. कायद्याने रोख रक्कम , वस्तू किंवा अन्न स्वरुपात हुंडा घेता येत नाही. विवाहसमयी , विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर हुंडा घेणे अथवा ठरवणे हा गंभीर गुन्हा आहे. कमीतकमी पाच वर्षांचा कारावास आणि रुपये पंधरा हजारांहून जास्त दंड अशी कायद्याची तरतूद. समाजाने आणि शासनाने केव्हाही गंभीरपणे न घेतलेली!!!

जसा हुंडा वधू पक्षाकडून वर पक्षास दिला जातो , तसाच आपला आणखी एक सामाजिक दंडक आहे की , लग्न-समारंभ वधूपित्याच्या दारात किंवा गावात आणि लग्नाचा सर्व खर्च वधू पक्षानेच करायचा असतो. मग इतर कोणी किती थाटमाट केला होता हे ध्यानात ठेवून वर पक्ष आपण तोडीस तोड असलो पाहिजे हे कधी उघड तर कधी आडपडद्याने सूचवित असतो अन् मग व्याह्याच्या घरावर तुळशीपत्र!! इथं बहुधा वधु पक्षाला स्वातंत्र्य नसतेच. या प्रथेतही असमानतेचं बीज रोवलं जातंच. जणू काही वर पक्षानं वधूचा स्वीकार करून वधू पक्षास उपकृत केले आहे. या वर पक्षाच्या वरचढ वागणुकीत पुष्कळदा वर पक्षाकडील महिलाही आपला तोरा वधूपक्षाकडील विहिणींना दाखवत असतात. मग जणू काही वर पक्षाने नवरी स्वीकारून वधूपक्षावर मोठे उपकार केले , अशी मानसिकता निर्माण होत असते आणि हे होणे स्री-पुरुष समानतेच्या विचारसरणीतील मोठा अडथळा ठरत असते.

ज्यांना आपली श्रीमंती दाखवायची असेल त्यांचा विचार वेगळा. काही मंडळी अलीकडे वर पक्षाच्या वतीने स्वागत समारंभ ठेवू लागलेत. ज्यांना हौस आहे त्यांनी करावे , परंतु दोघांना एकत्र बसून खर्च वाटून घेता आला तर जास्त बरं होइल हे नक्की. त्याचप्रमाणे विवाह विधी आहे , संस्कार आहे , केवळ समारंभ नाही आणि म्हणून अशा शुभप्रसंगी फेटे , शाली , सत्कार आणि भाषणे या गोष्टी टाळणे ही सामाजिक तसेच धार्मिक गरज नाही का ?

विवाहास जाणाऱ्या पाहुण्यांनाही हे पटायला हवं की , अशा सोहळ्यात आलेले सर्वच पाहुणे समान आहेत , त्यात दुजाभाव असणे उचित नाही. विवाह विधीतही वधू पक्षास दुय्यम वागणूक रुढी किंवा प्रथा म्हणून दिली जाते. मात्र हे ही कोणत्या धर्मात लिहिलेले नाही. मग या गोष्टीही बदलायला नकोत का ? स्री - चारित्र्याला कमालीचं महत्त्व देणारा भारतीय समाज पुरुष चारित्र्याकडे किती गंभीर लक्ष देतो ?

महिलांना समानता नाकारण्याच्या मनोवृतीविरुद्ध आपली सामाजिक लढाई आहे. लग्नसमारंभात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणणारा कायदा करावा , असा एक मतप्रवाह सध्या जोर धरतो आहे. असा कायदा करताही येईल किंवा हुंडाबंदी कायद्यात दुरुस्ती करून अशी तरतूद करता येईल. परंतु नुसते कायदे करून प्रश्न सुटत नाहीत , तर कायद्याची परिणामकारक आणि त्वरीत अंमलबजावणी जास्त गरजेची व महत्त्वाची असते. त्याहून महत्त्वाची असते कायदा पाळण्याची सामाजिक मानसिकता. अन्यथा नवीन कायदा म्हणजे एक नवीन कुरण एवढाच त्याचा अर्थ असतो. ते अशा महत्त्वाच्या विषयात न होवो !! विवाह समारंभात किती खर्च व्हावा व कसा व्हावा हे सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. असे होत असताना समानतेच्या विचारांना बाधा अशी पोचत असते एवढेच आपण पाहत आहोत.

विवाह व पोटगी विषयाच्या तरतुदी समान असण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विवाहात इतरांनी हातभार लावण्याची वृत्तीही असली पाहिजे. पूर्वी आमची कमी शिकलेली माणसं एकत्र येऊन स्वयंपाकात , जेवणावळीत वाढण्याच्या कामात भाग घेत असत. आता शिकलेली माणसं तसं करताना दिसत नाहीत. ज्ञानाचा अन् शहाणपणाचा संबंध नसतो हेच खरं ! आमच्या पूर्वजांचं शहाणपण आम्हाला प्राप्त होवो ही अपेक्षा !!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive