Wednesday, January 9, 2013

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद

पाक लष्कराचे भीषण क्रौर्य , एकाचे शिर घेऊन पलायन

जम्मू , वृत्तसंस्था

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निषेधपत्रांना पायदळी तुडवत , सीमेवरील लष्करी तळांवर वारंवार हल्ले करून युद्धबंदी झुगारणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी क्रौर्याची परिसीमा गाठली . काश्मिरातील पूंछ जिल्ह्यातील भारतीय हद्दीत प्रवेश करीत पाक सैनिकांनी दोन भारतीय जवानांना ठार केले . सर्व लष्करी संकेत धुडकावत या दोन मृतदेहांची अवहेलना करीत , त्यांचा शिरच्छेद केला . हे क्रौर्य इथेच थांबले नाही तर , त्यापैकी एका सैनिकाचे शिर या सैनिकांनी आपल्यासोबत पाकमध्ये नेले .
रक्त गोठवणारी थंडी , दाट धुके आणि घनदाट जंगलाचा फायदा घेत पाक लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या जवानांनी मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान कृष्णघाटी भागातील मेंधार सेक्टरमध्ये घुसखोरी केली . भारतीय हद्दीत १०० मीटरपर्यंत हे जवान आत शिरले . त्याचवेळी भारतीय लष्कराच्या गस्त ीपथकातील चार जवानांनी त्यांना हेरले . दोन्ही पथकांमध्ये सुमारे अर्धा तास तुफान चकमक उडाली . पण मोठ्या संख्येने भारतात घुसलेल्या पाक जवानांच्या गोळीबारात लान्सनाईक हेमराज लान्सनाईक सुधाकर सिंह शहीद झाले . यानंतर पाक जवानांनी दोघांच्या मृतदेहाची विटंबना करीत धडापासून शिर अलग केले त्यापैकी एकाचे शिर घेऊन पुन्हा पाकमध्ये पलायन केले . जाताना त्यांनी भारतीय जवानांकडील शस्त्रे दारूगोळाही पळवला . या हल्ल्यात आणखी दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत . उधमपूरमधील भारतीय लष्कराच्या उत्तर विभागाने दोन जवान ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला , तरी त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा मात्र कोणताही उल्लेख केलेला नाही .

पाकचा कांगावा

पाकच्या हाजी पीर सेक्टरमधील तेथील लष्करी तळावर दोन दिवसांपूर्वी भारताने हल्ला केल्याचा कांगावा पाकच्या लष्कराने केला होता . या हल्ल्यात एक पाक जवान ठार एक जखमी झाल्याचे सांगत पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उपउच्चायुक्तांना पाचारण करीत त्यांच्याकडे निषेध नोंदवला होता .

कॅ . सौरभ कालिया यांच्या छळाची आठवण

पाक लष्कराच्या या क्रौर्याने कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांच्या छळाच्या दुःखद स्मृती पुन्हा ताज्या झाल्या . तब्बल २२ दिवस पाक लष्कराने छळ करीत सौरभ यांचे हात - पाय अलग केले होते . त्यांचे डोळे - कान फोडण्यात आले होते . सिगारेटचे चटके दिलेला छिन्नवि छिन्न झालेला त्यांचा मृतदेह भारतीय हद्दीत मिळाला होता . मंगळवारच्या घटनेने पाक लष्कराचे हेच पाशवी रूप पुन्हा समोर आले .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive