Sunday, January 6, 2013

भारताने अखेर पाकिस्तानला नमवले

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सलग पराभव स्वीकारावे लागल्याने चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत असलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज (रविवार) कमाल केली. पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात टाकणाऱ्या पाकिस्तानसाठी आज भारतीय गोलंदाजांनी 168 धावांचे आव्हानही असाध्य ठरविले. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही अचूक साथ मिळाली. या सामन्यात 10 धावांनी विजय मिळवीत भारताने 2013 मधील पहिला विजय मिळविला.

केवळ 168 धावांचेच आव्हान असल्याने पाकिस्तानी संघ सहज विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरला. पण भुवनेश्‍वर कुमार आणि पदार्पण करणारा शमी अहमद यांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांना चांगलेच जखडून ठेवले. भुवनेश्‍वरने दोन गडी बाद केले. अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, युवराज सिंग या चपळ क्षेत्ररक्षकांनी पाकिस्तानच्या धावा रोखून धरल्या. त्याचे दडपण येऊन युनूस खानसारखा अनुभवी फलंदाजही आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. मिस्बा उल हकने 39 धावांसाठी 82 चेंडू घेतले. याचेही दडपण पाकिस्तानवर आले.

पाच प्रमुख गोलंदाजांसह खेळणाऱ्या भारताने आज "पार्ट टाइम' गोलंदाजांना संधी दिली नाही. पहिलाच सामना खेळणारा अहमद, भुवनेश्‍वर आणि ईशांत शर्माने अचूक गोलंदाजी केली. रविचंद्रन आश्‍विन आणि रवींद्र जडेजानेही पाकिस्तानच्या फलंदाजांना मोकळीक मिळू दिली नाही.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करण्याची भारतीय फलंदाजांची "सवय' दिल्लीतही कायम राहिल्याने भारताला केवळ 167 धावाच करता आल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून सपशेल अपयशी ठरत असलेल्या वीरेंद्र सेहवागला दिल्लीतील सामन्यासाठी 'विश्रांती' देण्यात आली. त्याच्याऐवजी संघात स्थान मिळालेला अजिंक्‍य रहाणे काहीही कमाल करू शकला नाही. गौतम गंभीरही नेहमीप्रमाणेच आत्मघाती फटका मारून बाद झाला. अचानक सूर हरपलेला विराट कोहली सातच धावा करू शकला. युवराज सिंग (23), सुरेश रैना (31), महेंद्रसिंह धोनी (36) आणि रवींद्र जडेजा (27) हेच फलंदाज थोडेफार स्थिरावले होते. बाकीच्या फलंदाजांनी पाकिस्तानसमोर नांगीच टाकली.

भारत : (43.3 षटकांत) सर्वबाद 167
गौतम गंभीर 15, अजिंक्‍य रहाणे 4, विराट कोहली 7, युवराज सिंग 23, सुरेश रैना 31, महेंद्रसिंह धोनी 36, रविचंद्रन आश्‍विन 0, रवींद्र जडेजा 27, भुवनेश्‍वर कुमार 2, इशांत शर्मा 5, शमी अहमद नाबाद 0
गोलंदाजी : महंमद इरफान 7-1-28-2, जुनैद खान 9-1-17-1, उमर गुल 8-1-45-1, महंमद हफीज 10-0-44-1, सईद अजमल 9.4-1-24-5

पाकिस्तान : (48.5 षटकांत) सर्वबाद 157
नासीर जमशेद 34, कामरान अकमल 0, युनूस खान 6, मिस्बा उल हक 39, उमर अकमल 25, शोएब मलिक 5, महंमद हफीज 25, उमर गुल 11, सईद अजमल 1, जुनैद खान 0, महंमद इरफान 0
गोलंदाजी : भुवनेश्‍वर कुमार 10-2-31-2, शमी अहमद 9-4-23-1, इशांत शर्मा 9.5-0-36-3, रविचंद्रन आश्‍विन 10-1-47-2, रवींद्र जडेजा 10-2-19-1
Peperonata

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive