Monday, January 7, 2013

`आलं` आरोग्यासाठी भलं

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्याला रिलॅक्स व्हायला वेळही मिळत नाही. सतत धावपळ करणारी माणसं फावल्या वेळात शरीराला विश्रांती देण्यासाठी काहीना काही उपाय करत असतात. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी सॉफ्ट म्युझिक ऐकणे, झोपणे, योगासने इ. उपाय केले जातात. असाच एक उपाय कसलीही कसरत न करता घरच्या घरी केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे, “एक आल्याचा चहा”.

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हमखास सापडणारी वस्तू म्हणजे ‘आलं’. आल्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडेंटमुळे शरीरस्वास्थ्य चांगले जपले जाते. आलं घातलेल्या चहाच्या नुसत्या सुगंधानंही अगदी ताजतवानं वाटतं. आल्याच्या चहाने थकवाच नाही तर इतर शारीरिक समस्याही लांब पळतात. पित्तामुळे पाचनप्रक्रियेत खूप बिघाड होतो, अश्या वेळी अर्धा लिंबू, आल्याचा छोटा तुकडा, आणि गरम पाणी एकत्र घेतल्याने पचन क्रिया सुरळीत होते.

आहारतज्ज्ञ एलिस मैकिंटोश यांनी सांगितलं, की आलं स्वाद ग्रंथींना नियंत्रणात ठेवतं. त्यांनी असंही स्पष्ट केलं, की आल्यामध्ये असणारं एंटीऑक्सिडेंट द्रव्य शरीरात तयार होणाऱ्या अपायकारक रसायनांना शुध्द करते. जास्त विचार केल्यामुळे मानवी शरीरात ही रसायन तयार होतात. आलं हा साऱ्या शारीरिक त्रासापासून तणावमुक्त करते.

पोट साफ करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे आलं. आल्यापासून श्वासोच्छवासाचा होणारा त्रासही कमी होतो. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या समस्येवेळी आल्याच्या गरम चहामध्ये कापड भिजवून पोटावर ठेवल्याने निवांत वाटते. असे हे गुणकारी आलं रोजच्या वापरात खूप महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive